Horticulture Management : शास्त्रोक्त व्यवस्थापनातून फळगळ आणली नियंत्रणात

संत्रा पट्ट्यात फळगळीच्या समस्येने बागायतदार जेरीस आले आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यातील काजळी (देऊरवाडा) येथील मयूर देशमुख यांनी शास्त्रोक्त व्यवस्थापनाच्या बळावर फळगळ रोखण्यात यश मिळविले आहे. तसेच कीड-रोग नियंत्रणासोबतच उत्पादकता वाढविण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.
Management Of Fruit Blight
Management Of Fruit Blight Agrowon

काजळीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊरवाडा या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. देऊरवाडामध्ये नृसिंह महाराजांचे मंदिर आहे. हिरण्यकश्‍यपूंचा वध केल्यानंतर काजळी-देऊरवाडा गावाच्या सीमेवरील मेघा आणि पूर्णा या नद्यांच्या संगमावर त्यांनी रक्‍ताने माखलेले हात धुतल्याची आख्यायिका आहे. या दोन्ही गावांतील एकाही घरावर कवेलू आढळत नाही. कवेलूचा आकार नृसिंहाच्या नखासारखा असल्या कारणाने त्याचा घरावरील वापर टाळण्यात येतो.

Management Of Fruit Blight
Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर

मयूर देशमुख यांची ४५ एकर शेती. एम.ए.डी.एड.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीऐवजी त्यांनी घरच्या शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. काका विनोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर यांनी शेतीची सूत्रे हातात घेतली. तसेच बंधू वेदांत देशमुख यांचेही मार्गदर्शन त्यांना मिळते. संत्रा बागेचे शास्त्रोक्‍त पद्धतीने व्यवस्थापन करून कीड-रोग नियंत्रणासोबतच उत्पादकतेत सातत्य राखले आहे.

संत्रा बागेचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन ः
देशमुख यांच्याकडे १ वर्ष वयापासून १५ वर्षे वयाची संत्र्याची सुमारे ४ हजार झाडे आहेत. प्रामुख्याने आंबिया बहरातील फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साधारण ऑक्टोबर अखेरीस बाग ताणावर सोडली जाते.

हा ताण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाटपाणी देत तोडला जातो. जानेवारी महिन्यात फुलधारणा आणि फेब्रुवारीमध्ये फळधारणा होण्यास सुरुवात होते. ही फळे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान फळे तोडणीस येतात. बागेला प्रामुख्याने पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाते. एका रांगेत १४ झाडे असल्यास त्यातील पहिल्या झाडापासून बाराव्या झाडापर्यंतच पाटपाणी दिले जाते. त्यानंतर शेवटच्या दोन झाडांना आपोआपच ओलावा मिळतो. तसेच पाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते, असा त्यांचा अनुभव आहे.

झेंडूचे आंतरपीक ः
बागेमध्ये दरवर्षी झेंडू लागवड केली जाते. त्यामुळे मित्रकिडींची संख्या वाढून फवारणी खर्चात बचत झाली. झेंडू फुलांच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याने अधिक फायदा होतो. साधारण १ जूनला झेंडू लागवड केल्यानंतर गणपती, नवरात्र आणि दसरा या सणांच्या काळात फुले तोडणीस येतील अशा प्रकारे नियोजन केले जाते.

Management Of Fruit Blight
Orange Growers : संत्रा रस्त्यावर फेकत शासनाचा निषेध

संत्रा बागेची छाटणी ः
संत्रा झाडांच्या कॅनॉपीचा विस्तार योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्याकरिता झाडाला सर्व बाजूंनी पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असतो. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रिया सुरळीत पार पडून झाडामध्ये पुरेसा अन्नसाठा तयार होतो. याचा झाड निरोगी राहण्यास आणि फळांचा दर्जा सुधारण्यास मदत होते, असे मयूर देशमुख सांगतात.

त्याच अनुषंगाने ताण तोडण्याच्या २० ते ३० दिवस आधी कात्रीच्या साह्याने झाडाच्या मध्यभागातील अतिरिक्त फांद्याची छाटणी केली जाते. छाटणीवेळी झाडांना होणाऱ्या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी छाटणीनंतर संपूर्ण झाडावर बोर्डो मिश्रणाची फवारणी आणि खोडाला बोर्डो पेस्ट लावली जाते. बोर्डो मिश्रणाच्या वापरामुळे बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते. या वर्षी संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. मात्र शास्त्रोक्त व्यवस्थापन पद्धतींच्या बळावर फळगळीवर नियंत्रण मिळविण्यात मयूर देशमुख यशस्वी ठरले आहेत.

वन्यप्राण्यांच्या नियंत्रणासाठी देशी जुगाड ः
संत्रा बागेच्या परिसरात हरिण, रानडुक्करांसह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या बागेत एक वर्ष वयाची १४७५, तर दोन वर्षे वयाची ४०० झाडे आहेत. लहान झाडांना वन्यप्राण्यांनी खेटल्यामुळे फांद्या तुटून जखमा होतात. या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.

वन्यप्राण्यांचा धोका टाळण्यासाठी देशी जुगाड अवलंबले आहे. यासाठी साडेचार फूट उंचीच्या बांबूवर ४ इंचावर चार खिळे आरपार लावले जातात. खिळे लावताना त्यांचे अणकुचीदार टोक दुसऱ्या बाजूने बाहेर येईल याची खात्री केली जाते. त्यानंतर हे बांबू जमिनीत अर्धा फूट रोवून झाडाला बांधले जातात. म्हणजेच खिळे लावलेला बांबू अर्धा फूट जमिनीत आणि ४ फूट जमिनीवर राहतो. झाडाला खेटल्यावर बांबूवरील खिळ्यांमुळे वन्यप्राणी जखमी होतात. त्यामुळे झाडांचे होणारे नुकसान रोखण्यात यश आले आहे.

Management Of Fruit Blight
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

स्पेनमधील तज्ज्ञांची बागेला भेट ः
महाऑरेंजच्या वतीने २०१७-१८ मध्ये ‘संत्रा बागांचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन’ याविषयावर मार्गदर्शनासाठी स्पेनमधील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले. या वेळी तज्ज्ञांनी मयूर यांच्या संत्रा बागेस भेट देत व्यवस्थापन पद्धतीचे कौतुक केले.

कपाशी, कांदा लागवडीतही मास्टरकी ः
संत्र्यासोबतच कपाशी आणि कांदा लागवडीत सातत्य राखले आहे. पीक फेरपालटीवर विशेष भर असतो. दरवर्षी सुमारे २० एकरांवर कपाशीची लागवड, तर ५ एकरांवर कांदा लागवड असते. कपाशीची एकरी १५ क्‍विंटलपर्यंत, तर कांद्याची एकरी १०० ते १२५ क्‍विंटल उत्पादकता राखली आहे.

संत्रा बागेत फळगळ टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी, पाण्याचा योग्य निचरा, वाफसा अवस्थेत सातत्य, बोर्डो फवारणी या बाबी महत्त्वाच्या आहेत. मध्यभागातील फांद्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी छाटणी महत्त्वाची ठरते. छाटणीनंतर बोर्डो मिश्रणाची फवारणी आवश्यक आहे.

बोर्डो मिश्रण तयार करताना १०० लिटर पाण्यात १ किलो चुना आणि १ किलो मोरचूद असे प्रमाण घ्यावे. हे मिश्रण माती किंवा प्लास्टिकच्या भांड्यात तयार करावे. पाण्याच्या प्रमाणानुसार मोरचूद आणि चुन्याचे प्रमाण वाढवावे.
- डॉ. डी.एम. पंचभाई, (अधिष्ठाता, उद्यानविद्या विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
---------------
- मयूर देशमुख, ९७६५०२०७०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com