
Washim Zilha Parishad News : जिल्हा परिषदेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प (Budget 2023) सभापती सुरेश मापारी यांनी सादर केला.
या वर्षी ५ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले असून यामध्ये सर्वाधिक ३ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद बांधकाम विभागासाठी केली आहे. कृषी विभागासाठी (Agricultural Department) केवळ ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
वाशीम जिल्हा परिषदेचे सन २०२२-२३ मध्ये सात कोटी ४१ लाख रुपये जमा झाले होते. तसेच अखर्चित असलेले पाच कोटी १० लाख रुपये असे एकूण १२ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न होते.
त्यामध्ये २०२३-२४ साठी १२ कोटी ४६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने सादर केले. या अर्थसंकल्पामध्ये रिसोड व मंगरुळपीर येथे बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर व्यापारी संकुल उभे करण्यासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा मार्ग व पुलांच्या दुरुस्तीसाठी ८० लाख, जिल्ह्यातील यात्रा व्यवस्थापनासाठी ६० लाख तर स्मशानभूमींकरीता १६ लाख रुपये प्रस्तावित केले आहेत. ग्रामीण भागातील शाळा दुरुस्तीसाठी १६ लाख, मेळाव्यासाठी १ लाख व शाळेच्या मैदानांसाठी १६ लाख प्रस्तावित आहेत.
पीडित रुग्णांसाठी दहा लाख, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मागासवर्गीय वस्तीतील अभ्यासिकेसाठी ५५ लाख रुपये, तर दिव्यांगाच्या योजनांसाठी ११ लाख ५० हजार तरतूद आहे.
महिला व बालकल्याण विभागातील अभ्यास दौऱ्यासाठी ३ लाख, महिला मेळाव्यासाठी ३ लाख व प्रावीण्यप्राप्त मुलींच्या अर्थसहाय्यासाठी ५ लाखांची तरतूद आहे.
कृषी विभागासाठी अत्यल्प तरतूद
या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागासाठी केवळ ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावर जि़ल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत तरतूद वाढविण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांना इतर मदत दिल्यापेक्षा पाणंद रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच जिल्हा परिषद सदस्य आर.
के. राठोड यांनी शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास व शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता सामूहिक कुंपण व झटका मशिनसाठी तरतूद करण्याची मागणी केली. मात्र, सभागृहाने या दोन्ही मागण्यांची दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.