
Akola News : बहुतांश बाजार समित्यांचे (Market Committee) उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही अडचणी आहेत. असे सर्व असले तरी याच बाजार समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संचालक बनण्यासाठी मोठी रस्सीखेच झाल्याचे दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षक असे पॅकेज दिल्याच्या चर्चाही सध्या खमंगपणे होत आहेत.
वेगवेगळ्या बाजार समित्यांची २८ व ३० एप्रिल, अशा दोन दिवसांत निवडणूक घेतली गेली. या वेळी प्रत्येक बाजार समितीत प्रचंड चुरस तयार झाली होती. अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, पातूर बाजार समित्यांत जोरदार लढत झाली.
निवडणुकीपूर्वी धक्कादायक निकाल येतील असे चित्र होते. मात्र सहकारातील दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवण्यात यश मिळवले. अकोल्यात शिरीष धोत्रे यांचे पॅनेल विजयी झाले. अकोटमध्ये रमेश हिंगणकर यांनी सहकारात आपणच दिग्गज आहोत हे विरोधकांना पुन्हा एकदा दाखवले.
मूर्तिजापूरमध्ये तिडके गट जिंकला. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, चिखली, बुलडाणा, मलकापूर, मेहकर, जळगाव जामोद या बाजार समित्यांत उत्सुकता ताणली होती.
चिखली बाजार समितीत ११ माजी संचालकांचे अर्जच रद्द ठरवल्याने आता पुढे काय निकाल येईल याची चर्चा रंगली होती. मात्र माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एकहाती निकाल खेचून नेला. सत्तारूढ भाजप आमदार श्वेता महाले यांचे पॅनेल पराभूत झाले.
बुलडाण्यात उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनीही पॅनेलसह विजय साकारला. खामगावमध्ये माजी आमदार दिलीप सानंदा यांनी भाजप आमदार आकाश फुंडकर यांचे पॅनेल पराभूत करून सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले.
मलकापुरात मात्र सत्तारुढ महाविकास आघाडीची सत्ता खाली खेचण्यात भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यशस्वी झाले. काँग्रेस आमदार राजेश एकडे यांचे पॅनेल तेथे पराभूत झाले. मेहकरमध्ये खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकरांनी आपले कसब पणाला लावत विरोधकांचे मनसुबे उधळले.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे पॅकेज दिले गेले. कुठे मतदारांना सहली करवून आणण्यात आल्या. प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी या कसरती यंदा मोठ्या प्रमाणात झाल्या. विजयासाठी साम, दाम, दंड अशा सर्व प्रकारांचा वापर केला गेला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.