Ethanol Production : इथेनॉल निर्मितीतून इंधन उपलब्धतेकडे...

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर वाढू लागल्याने केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढविण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. इथेनॉलचा वापर केल्यास इंधन खर्चात बचत होते.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

शशिकांत सांब

भारतात साखर कारखाने (Sugar Factory) उभे राहू लागले तसे हे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. सन १९३२ नंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजराथ इत्यादी राज्यांत साखर कारखाने उभे राहू लागले. साखर तयार (Sugar Production) होताना मळी हा उपपदार्थ तयार होतो.

मळीमध्ये (Molasses) शर्करेचे प्रमाण भरपूर असते. मळीमध्ये २२ टक्के पाणी आणि ५० ते ५५ टक्के पिष्टमय पदार्थ असतात. याशिवाय जीवनसत्त्व बी-६, मँगेनीज, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम यांसारखी खनिजे असतात.

साधारणपणे १९३८ मध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संयुक्त समितीने मद्यार्क इंधन म्हणून वापरण्याची शिफारस केली. यामुळे अनेक रासायनिक उद्योगांची (Chemical Industry) उभारणी होऊ लागली. शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क मिळू लागले.

याशिवाय क्रूड ऑइलपासून तेल शुद्धीकरण केंद्रामध्ये जे पेट्रोल तयार होते, त्यामध्ये इथेनॉल वापरले जाते. बहुतांश आसवनी साखर कारखान्यांना संलग्न आहेत. काही आसवनी प्रकल्प स्वतंत्रपणे उभारलेले आहेत.

अल्कोहोल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापराचे असेल तर ते जलविरहित करण्यासाठी पुन्हा उर्ध्वपातन करावे लागते. हे तयार होताना जे द्रव्य शिल्लक राहते, त्याला स्पेंटवॉश म्हणतात. हे द्रव्य प्रदूषण करणारे असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प चालवावा लागतो.

त्यापासून खत निर्मिती शक्य आहे. जसे जसे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर वाढू लागले तसे तसे सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढवण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली.

Ethanol Production
Baramati Agro Sugar Factory : बारामती ॲग्रो कारखान्यालाच ऊस देण्याचे आवाहन

इथेनॉलचा वापराचे फायदे ः

१) भारतीची विकसित होणारी अर्थव्यवस्था, वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात होणारे शहरीकरण, बदलत चाललेली जीवनशैली, वाढत चाललेली खर्च करण्याची क्षमता इत्यादी कारणांमुळे ऊर्जेची गरज वाढत आहे.

देशाच्या इंधन गरजेच्या ८४ टक्के म्हणजेच सुमारे २२४ कोटी टन इंधनाचा पुरवठा हा आयातीवर अवलंबून आहे. या तेलाच्या आयातीसाठी २०१८-१९ मध्ये आपण १११ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. २०४० पर्यंत भारत जगातील सर्वांत मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक असण्याचा अंदाज आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात आयात करणे देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाही. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजेसाठी पर्याय शोधणे अत्यावश्यक आहे. यासाठी अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत असलेले सौर ऊर्जा, हायड्रोजन वायू, पवन चक्की, इथेनॉल, जलविरहित इथेनॉल इत्यादी पर्यायी व्यवस्थेचा वापर करण्याचे धोरण केंद्र सरकार राबवीत आहे.

Ethanol Production
Ethanol Production : इथेनॉलमुळे कारखान्यांच्या उत्पन्नात १२ टक्क्यांपर्यंत वाढ शक्य

२) इथेनॉल हे एक कृषी उप-उत्पादन आहे जे प्रामुख्याने उसापासून साखर तयार करण्याच्या प्रक्रियेतून किंवा साखर उत्पादन कमी करून उसापासून करता येते. तसेच तांदूळ, ज्वारी मका इत्यादींपासूनसुद्धा मिळू शकते.

पेट्रोलवरील वाहने चालवताना कमी जीवाश्म इंधन जाळण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करता येते. रस्ते वाहतूक क्षेत्रातील साधारणपणे ९८ टक्के इंधनाची गरज ही जीवाश्म इंधनाद्वारे पूर्ण होते. जगभर तेलाच्या किमतीत सतत वाढ होत आहे.

मागील काही वर्षांत हे दर कमालीचे वाढले आहेत. म्हणून जर पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवले तर तेल आयातीचा खर्च कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेस बळ मिळेल.

३) साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादन वाढवणे हा एक पर्याय आहे. त्यादृष्टीने साखर कारखान्याची वाटचाल सुरू झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये अंदाजे ३५ लाख टन साखरेचा वापर झाला तर साखर कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पाला १८,००० कोटींचे उत्पन्न झाले.

बलरामपूरसारख्या साखर कारखान्यांनी त्यांच्या काही युनिटमध्ये साखर उत्पादन बंद करून उसाच्या रसावरील प्रक्रियेतून इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढवण्याचे ठरविले आहे.

अनेक कारखान्यांनी बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग अवलंबला आहे. देशांमध्ये साखरेचे अतिरिक्त साठे आहेत. सध्या साखर निर्यातीचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतात. साखरेचे साठे विकून पैसे मिळण्यास कारखान्यांना मोठा कालावधी लागतो.

याउलट इथेनॉलचे पेमेंट तेल कंपन्यांकडून लवकर मिळते. आता ऑइल कंपन्यांनी इथेनॉलला दिलेले दर हे प्रोत्साहन देणारे आहेत. याचा फायदा साखर कारखान्यांना होत आहे.

Ethanol Production
Ethanol Project : केंद्राची नव्या ३४ इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता

४) आपल्याकडे साधारणपणे दोन वर्षे पुरेल एवढी साखर आणि तीन वर्ष पुरेल एवढा गहू, तांदूळ साठा आहे. खाद्य निगम दरवर्षी खराब झालेले धान्य विकते. ते साधारणपणे १० ते ११ रुपये किलो दराने मिळते. तांदळाच्या कण्या १० ते १२ रुपये किलो दराने मिळतात.

एक टन तांदळाच्या कण्यापासून अंदाजे ४०० किलो इथेनॉल मिळते. या प्रकारे इथेनॉल उत्पादन केल्यामुळे खराब धान्याचा योग्य वापर सुरू झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना परवडणारा दर मिळणे शक्य होईल. धान्यापासून मद्यार्क बनविल्यानंतर शिल्लक राहिलेला चोथा पशुधान्य तयार करण्यासाठी वापरला जातो.

५) पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्यामुळे वाहन प्रदूषण कमी होते. इथेनॉलमुळे कार्बन मोनॉऑक्साइडचे उत्सर्जन कमी होते. भारतातील शहरे वाहन प्रदूषणामुळे ग्रस्त आहेत. त्यामुळे इथेनॉलचा २० टक्क्यांपर्यंत मिश्रण करण्याचा फायदा प्रदूषण घटविण्यासाठी होईल.

Ethanol Production
Sugar Production : देशात २२८ लाख टन साखर उत्पादन; १७ कारखान्यांचा हंगाम संपला

६) सध्या इथेनॉल वापर पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी असल्यामुळे विक्रीसाठी ऑइल वितरण करणाऱ्या सरकारी उद्योगांवर विक्रीसाठी अवलंबून राहावे लागते. परंतु आता केंद्र सरकारने फ्लेक्स इंजिनाच्या वाहनांना परवानगी दिली आहे.

यामुळे इथेनॉलचा वापर केल्यास इंधन खर्चात बचत होईल. अशी वाहने बाजारात येऊ लागली आहेत. याशिवाय श्रीलंका आणि बांगलादेशाने इथेनॉल आयात करण्यात स्वारस्य दाखविले आहे.

७) देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी, इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, परदेशी चलन वाचवण्यासाठी पर्यावरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाचा प्रचार करीत आहे.

८) १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नोव्हेंबर २०२२ या निर्धारित वेळेच्या ५ महिने आधीच पूर्ण झाले. गेल्या ८ महिन्यांमधील या उद्दिष्ट पूर्तीने भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवली तसेच परदेशी चलनाच्या स्वरूपात त्याचा लाभ झाला.

हरित वायू उत्सर्जनामध्ये घट झाली. शेतकऱ्यांना देखील याचा आर्थिक लाभ झाला. सरकारने केलेल्या या सर्व उपाययोजनेमुळे इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम २०२५-२६ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठण्याच्या मार्गावर आहे.

९) पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी १ डिसेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ च्या साखर हंगामासाठी उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या वाढीव दरावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.

यात ‘सी’ हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ४६.६६ रुपयांवरून प्रतिलिटर ४९.४१ रुपये अशी वाढ केली आहे. ‘बी’ हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ५९.०८ रुपयांवरून प्रतिलिटर ६०.७३ रुपये वाढ केली आहे.

उसाचा रस, साखर किंवा काकवी यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ६३.४५ रुपयांवरून प्रतिलिटर ६५.६१ रुपये वाढ केली आहे. या दराबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी सूचना मिळत असते. तेल कंपन्यांनी दिलेल्या चांगल्या दरामुळे इथेनॉल विक्रीतून साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढू लागले आहे.

संपर्क ः शशिकांत सांब, ९८८१२४५६३६, (लेखक जैव ऊर्जा विषयातील अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com