Indian Youth: नववर्षात युवा पिढी समोरील आव्हाने

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर सरकारने या युवाशक्तीसाठी नवीन वर्षामध्ये योग्य धोरण अवलंबिले पाहिजे.
Indian Youth
Indian YouthAgrowon

देशातील लोकसंख्येत १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचे (Indian Youth) प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. या युवा पिढीच्या (Young Generation) बळावर २०३० पर्यंत आपली अर्थव्यवस्था (Indian Economy) २० ट्रिलियन डॉलरची होणार अशी भाकिते सरकारकडून करण्यात आली होती.

आता केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठायचे असेल तर सरकारने या युवाशक्तीसाठी नवीन वर्षामध्ये योग्य धोरण अवलंबिले पाहिजे. हे धोरण अवलंबताना सद्यःपरिस्थितीचा विचार केला पाहिजे.

महागाई

भारतातील टॉप टेन श्रीमंत लोकांच्या यादीकडे बघितलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की समाजात आर्थिक विषमतेची दरी खूप प्रमाणात वाढली आहे. समाजातील आर्थिक विषमतेचा परिणाम येथील अर्थव्यवस्थेवरती सुद्धा झाला आहे.

सध्याच्या आर्थिक नीतीमुळे श्रीमंत लोक अधिक श्रीमंत आणि गरीब लोक अधिक गरीब होत आहेत.

परिणामी, देशातील एकूण संपत्तीपैकी ८० टक्के संपत्ती ही केवळ १० टक्के लोकांकडे आली आहे. महागाईचा दर (Inflation Rate) आणि जीडीपी रेट यासोबतच भारताच्या आयात आणि निर्यात यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आहे.

परिणामी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत चालले आहे. नॅचरल गॅस, क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल याच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत.

Indian Youth
Rural Economy : ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी शेतीपूरक उद्योग वाढण्याची गरज

बेरोजगारी

सध्या विद्यार्थ्यांचा कल हा शासकीय नोकरी सोबतच इंजिनियरिंग, आयटी इंडस्ट्री, सॉफ्टवेअर इंडस्ट्री याच्याकडे आहे. या इंडस्ट्रीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे इंजिनियरची देशामध्ये असलेली आवश्यकता आणि दरवर्षी इंजिनियरिंग उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये खूप तफावत आहे.

त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना रोजगार भेटत नाही ते विद्यार्थी बेरोजगार होतात. त्यासाठी शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांतील स्कील डेव्हलपमेंट याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सरकारी नोकऱ्या

भारतातील युवकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातच सरकारी संस्थांचे खाजगीकरण होत असल्यामुळे भविष्यात प्रशासकीय अधिकारी यांची आवश्यकता कमी भासणार आहे.

एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये बसणाऱ्यांची संख्या आणि मिरीटमध्ये येणाऱ्यांची संख्या लाखो विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे शेकडो विद्यार्थ्यांना यश प्राप्त होते. परीक्षेच्या प्रयत्नांमध्ये युवकांचे बरेचसे वय परीक्षा देण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी निघून जाते. त्यातून त्यांना यश प्राप्त होते त्या विद्यार्थ्यांचे करियर बनते.

परंतु जे विद्यार्थी वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत परीक्षा देत राहतात, तरी त्यांना यश प्राप्त होत नाही, असे युवक मानसिकदृष्ट्या खचतात. कायम शासकीय नोकरी वरती अवलंबून राहिल्यामुळे ते स्वतःवरील विश्‍वास गमावून बसतात. सरकारने याचाही विचार करावा.

Indian Youth
Indian Economy : सार्वजनिक उपक्रमांची दुभती गाय आटणार?

व्यवसाय

युवकांनी नवीन व्यवसाय सुरू करावा यासाठी सरकारने निश्‍चित असे धोरण आखले पाहिजे. एकीकडे निरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, एबीजी शिप्यार्ड, नीलेश पारेख यांच्यासारखे उद्योगपती भारतातील बँकेचे कर्ज घेऊन भारताबाहेर पळून गेले.

या सर्व उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाची रक्कम जेवढी आहे, त्यामध्ये भारतीय बेरोजगारांपैकी कित्येक युवकांना आपला उद्योग सुरू करता आला असता, याचा सरकारने विचार केला पाहिजे.

आपण जर रोजगार उपलब्ध करून देत नसू, तर आपण उद्योजक निर्माण केले तर ते नवीन उद्योजक युवकांना रोजगार देऊ शकतील आणि पुढील रोजगार उद्योजकातूनच निर्माण होईल. त्यामुळे नवीन उद्योजक निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

सोशल मीडियाची गुलामगिरी

बेरोजगार युवा वर्ग हा सोशल मीडियाच्या गुलामगिरीत अडकलेला आहे. मोठमोठ्या कंपन्या फक्त मोबाईलचे इंटरनेटचे डाटा पॅक यांवर स्वस्त ऑफर्स देऊन तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया वरती कसा खर्च होईल, याचे गणित करत असतात.

त्यामुळे तरुण खऱ्या प्रश्‍नांपासून दूर असून, देशाच्या उन्नतीमध्ये त्यांचा रोल काय नवीन व्हिडिओज रिल्स याच्यातून काय साध्य होणार? याचा विचार झाला पाहिजे. भारतातील युवा वर्ग सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे आणि याचमुळे सोशल मीडियाच्या स्पर्धेतून गुन्हेगारी वाढत चालली आहे.

सोशल मीडियाचे व्ह्युज, फॉलोवर्स, सबस्क्राइबर, लाइक्स, कॉमेंट्स यातून मिळणारे उत्पन्न या स्पर्धेतून कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करण्यातच तरुणाई व्यस्त आहे.

राजकारण

जनमताचा आदर न करता देशातील राज्यांमध्ये सध्या चालू असलेले मोडा-तोडीच्या राजकारणात प्रत्येक पक्षाचा असलेला आपापला अजेंडा यात युवा वर्ग पिसला जात आहे. युवा वर्गाला एकजूट न राहता जात, धर्म आणि आरक्षण यामध्ये विभाजित झाला आहे. त्यामुळेच राजकारणी युवकांचा वापर धार्मिक दंगली आणि पक्षाच्या अजेंडासाठी करत आहेत.

कुणाच्या ना कुणाच्या भाषणामुळे किंवा एखादी व्यक्ती म्हणते म्हणून युवा त्याच्यावरती विश्‍वास ठेवून आपले मत व्यक्त करतो. त्याच्या प्रत्येक दिवसाची वाटचाल दुसऱ्याच्या influence खालीच असते, मग त्यांचे वैयक्तिक मत कुठे आलं?

आपले विचार आपले मत हे स्वतःची सत्य परिस्थिती स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी स्वतःचे भविष्य कुटुंब याचा विचार घेऊन असावे. परंतु युवकांचे दिवसातील आचरण दुसऱ्यांचा विचार आणि दुसरा म्हणतो किंवा त्याचे वागणे बघून ठरते.

सुशिक्षित युवकांना काम भेटले नाही तर महागाई आणि बेरोजगारी यामुळे आता हेच तरुण गुन्हेगार आणि व्यसनाधीन होतील. त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर ते गुन्हेगारी, अपराध, लूटमार, चोरी, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल फ्रॉड करण्यासाठी करू शकतात.

याचा विचार सरकारने करावा; जेणेकरून त्यांच्या ताकदीचा सकारात्मक वापर होऊन नवीन उद्योजक निर्माण होतील. पाण्याला योग्य दिशा दिली तरच त्याचा वापर चांगल्या कामासाठी होतो राजकारण्यांनी हे लक्षात ठेवावे.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com