Indian Police : सावधान ! पोलीसदल कात टाकत आहे

अलीकडेच दोन घटनांमध्ये पोलिसांनी दाखविलेली विलक्षण तत्परता त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढविणारी म्हटली पाहिजे. ही तत्परता व्यापक प्रमाणात आणि सातत्याने दाखविली तर देशाच्या कायदा-सुव्यवस्थेचे चित्र आमूलाग्र बदलून जाईल.
Indian Police
Indian PoliceAgrowon

दिल्लीत पोलीस दलाकडून (Delhi Police) मागच्या आठवड्यात कर्तव्यदक्षतेच्या (Dutiful) दोन घटना घडल्या. यापुढे सर्वच प्रकरणात पोलिसांना असा प्रामाणिकपणा दाखवावा लागेल. त्यामुळे देशातल्या कायदा- सुव्यवस्थेत (Law and Order) बाधा येणार नाही व वाचाळवीरांची जीभही चुळबूळ करणार नाही.

पोलिसांमध्ये हे बदल आधीपासूनच असते तर त्यांनी देशहितासाठी मौलिक कार्य केल्याच्या नोंदी झाल्या असत्या आणि देश आर्थिकदृष्टया रसातळाला जाण्यापासून वाचविल्याचे श्रेयही त्यांना मिळाले असते.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा वर्षांत ३८ कुख्यात गुन्हेगारांनी देशातून पलायन केले आहे. हे चोरटे देशातील पैसा घेऊन सरकारच्या नाकावर टिच्चून भुर्रकन उडून गेलेत.

त्यात विजय मल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi), मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आदींचा समावेश आहे. ही नामावली नवी नाही. परंतु प्रश्न असा आहे की, हे महाभाग जेव्हा देश सोडून पळून जाण्याची योजना आखत होते, तेव्हा देशातील गुप्तचर यंत्रणांना याचा थांगपत्ताही लागला नसेल काय? त्यांनी पलायन केल्यानंतर लाठी मारत बसतानाची सरकारची केविलवाणी अवस्था देशाने पाहिली आहे.

‘कुठवर पळणार! कॉलर पकडून आणतो की नाही पाहाच’, सरकारकडून नियमित उच्चारले जाणारे हे वाक्यही आता लोकांच्या अंगवळणी झाले आहे. परंतु पोलीस आता आक्रमक झाले आहेत. यापुढे असे काही चालणार नाही.

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. संपूर्ण देशात आता गृहविभागाचे असे चित्र पाहायला मिळेल, अशी आशा करावी. दिल्लीतून याची सुरूवात झाली आहे.

विमानतळावर गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निमलष्करी दलाच्या सुमारे दोनशे जवानांनी इंडिगोच्या विमानास घेरले. विमानात एखादा कुख्यात ‘डॉन’ असावा, असे दृश्य निर्माण झाले. विमान उडू शकले नाही.

Indian Police
Women Police : पोलीस महिलांना देणार ‘पुन:धैर्य’

आसामच्या एका गावात तक्रार होताच दुसऱ्या दिवशी दोन हजार कि.मी. लांब अंतरावर असलेल्या दिल्लीत विजेच्या गतीने हे पोलीस पोहचले. अशीच चपळता उत्तरप्रदेश पोलिसांनी दाखवली.

कानपूरपासून ५०० कि.मी. दूर असलेल्या दिल्लीत महिला-पुरुष पोलिसांचा ताफा धडकला. उत्तर प्रदेशातील सामाजिक सलोखा बिघडवण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या महिलेला जेरबंद करण्याचा घाट होता.

पोलिसांनी थेट तिच्या घरी कसे जायचे म्हणून शक्कल लढवली. ‘आती क्या चौक मे...’ असा फोन केला. नकार मिळताच पोलीस घरी धडकले. हातात नोटीस थोपवली. ‘तीन दिवसात उत्तर दे; नाहीतर पाहून घेऊ’, असा इशारा दिला.

उत्तरप्रदेश सरकारचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या आरोपी महिलेसोबत पोलिसांनी चेहऱ्यावर हास्य आणत एक छानसा फोटोही काढून घेतला. वर उल्लेत दोन्ही घटना मनस्तापदायक आणि देशाला आणीबाणीकडे नेणाऱ्या आहेत, असा आरोप कॉँग्रेसकडून मोदी आणि योगी सरकारवर होत आहे.

पण काँग्रेसही अशा कृत्यापासून दूर कधी होती? ‘जिसकी लाठी उसकी भैस’ असाच वापर सत्ताधाऱ्यांकडून होत गेला आहे.

आंदोलनास बसलेले योगगुरू रामदेव यांना दिल्लीतून पळवून लावणारे आणि त्यांना सलवार कुर्ता परिधान करायला लावणारे कॉँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचे सरकार होेते, हे कसे विसरायचे?

ते गीत का झोंबले?

आता मोदी -योगी सरकार जर त्याच मार्गाने जात असेल तर विरोधकांच्या किंचाळण्यास अर्थ उरत नाही. परंतु याचा सर्वसामान्यांवर विपरीत परिणाम होतो. देशात भीतियुक्त वातावरण निर्माण होते. पहिली घटना मंगळवारची आहे.

प्रख्यात लोकगायिका नेहा सिंग राठोड हिच्या ‘यूपी मे का बा -२’ या गीताने म्हणे समाजात द्वेष पसरविण्याचे काम केले आहे. कानपुरात बुलडोझर चालला. इथल्या दीक्षित कुटुंबातील दोन महिलांच्या मृत्यूसाठी तिने प्रशासनाला घेरले.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील विदारक चित्र तिने गाण्यातून मांडले. ‘आग लागली तर तिथे भेद होणार नाही; हिंदूही जळतील आणि मुस्लिमही जळतील’, या वास्तवाकडे तिने बोट दाखवले. या गीतासाठी तिला देशद्रोही असल्याप्रमाणे वागणूक देण्यात आली.

कानपूरचे पोलीस तिला शोधत दिल्लीत आले. नेहाचा पती हिमांशूला फोन करून भ्रामक माहिती देऊन बाहेर बोलावण्याचा प्रयत्न झाला. एका गीताने यांची खुर्ची डळमळते आणि त्वरेने कारवाई केली जाते.

परंतु महंत बजरंग मुनी मुस्लिमांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने करतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला १२ दिवस लागतात आणि पुढच्या दहा दिवसातच ते मोकाट सुटतात.

इकडे आपल्या कलेच्या माध्यमातून वास्तव मांडणाऱ्या नेहाचा मानसिक छळ होतो आणि पती हिमांशूला नोकरी गमवावी लागते. राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे!

Indian Police
Insurance Company : विमा कंपनीविरुद्ध करणार पोलीस कारवाई

दुसरीही घटना संताप आणणारी आहे. गुरुवारी कॉँग्रेसच्या महाअधिवेशनाला रायपूरसाठी विमानात बसलेले कॉँग्रेसचे नेते पवन खेडा यांना दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले. त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावात मुद्दामपणे खोडसाळपणा केला. दामोदरदास ऐवजी गौतमदास असे नाव उच्चारले.

मोदी आणि गौतम अदानी यांचे संबंध सांगण्याची त्यांना लहर आली होती. नंतर ते हसलेही आणि क्षमाही मागितली. परंतु भाजपच्या लोकांनी ही बाब गांभीर्याने घेत पवन खेडा यांच्या विरोधात उत्तरप्रदेश, आसाममध्ये तक्रारी नोंदविल्या.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व सरमा यांना मोदींवर भक्ती दाखविण्याची आयतीच संधी चालून आली. त्यांनी आसामच्या पोलिसांना पवन खेडा यांची मानगूट पकडून आणण्याचे फर्मानच सोडले. त्यानंतरचा संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यापुढे आहे.

खेडा देश सोडून पळून जात असल्याप्रमाणे कारवाई झाली. लोकशाही आणि घटनेची लक्तरे टांगण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.

खरं तर खेडा यांनी जे केले ते चुकीचे आहे. परंतु हे आजचे आहे का? दोन्ही बाजूंचा स्तर घसरला आहे. याआधी राजकीय टीका समजून कोणीही मनावर घेत नव्हते; परंतु अलिकडे मोदी-योगींना त्यांच्यावरील टीका सहन होत नाही. स्वत: मोदी यांनी महिला नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली आहे.

सोनिया गांधी यांना ‘जर्सी काऊ’, ‘कॉँग्रेसची विधवा’, सुनंदा पुष्कर यांना ‘शशी थरुर यांची ५० कोटींची गर्लफ्रेन्ड’, तर राज्यसभेत रेणुका चौधरी यांच्या हास्याची तुलना शुर्पणखेशी केली गेली होती. ममता बॅनर्जी यांना ‘दीदी ओ दीदी’ असे संबोधण्यात आले, तर डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख एकदा ‘रेनकोटमध्ये आंघोळ करणारे’ असा केला गेला.

अलिकडेच नेहरू हे आडनाव का लावत नाही, असा कुत्सित सवाल राहुल गांधी यांना केला गेला. सोनिया गांधीनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले. राहुल गांधींनी तर ‘चौकीदार चोर है’ हे वाक्य घरोघरी पोहचवले. काहींनी तर आणखी खालची पातळी गाठत मोदींसाठी रावण, भस्मासूर, उंदीर, नाली का किडा असे शब्दप्रयोग वापरले.

परंतु पवन खेडांप्रमाणे किती जणांना विमानातून उतरविण्यात आले होते? जेव्हा हा राजकीय तमाशा सुरू होता तेव्हा सगळ्यांच्या नजरा टीव्हीच्या पडद्याकडे खिळल्या होत्या. त्याचेवळी अदानींच्या कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात घसरण सुरू होती.

हे वृत्त आपल्यापर्यंत पोहोचू नये, याची काळजी घेतली गेली असे समजायचे का? अदानींच्या मुद्यावर संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी, हेच तर खेडा यांचे म्हणणे होते. सरकारने पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर आसूड उगारत नेमका हा विषय अलगदपणे बाजूला सारला.

एका वादग्रस्त वक्तव्यासाठी आक्रमक झालेल्या पोलिसांना यापुढे प्रत्येक प्रकरणात परीक्षा द्यावी लागेल आणि त्यात पासही व्हावे लागेल. मग टीका करणारे विरोधी गटाचे असोत वा सत्ताधारी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com