बदलत्या पाहुणचार पद्धती

गेल्या शतकात कौटुंबिक जीवन एवढे बदलले आहे की त्याचा परिणाम पाहुणचार आणि आतिथ्य यावर सुद्धा झाला आहे. पूर्वी मुक्कामाला येणारे जवळचे नातेवाईक व सगेसोयरे यांचा पाहुणचार मोठ्या प्रमाणावर होत असे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

गेल्या शतकात कौटुंबिक जीवन एवढे बदलले आहे की त्याचा परिणाम पाहुणचार आणि आतिथ्य यावर सुद्धा झाला आहे. पूर्वी मुक्कामाला येणारे जवळचे नातेवाईक व सगेसोयरे यांचा पाहुणचार मोठ्या प्रमाणावर होत असे. लग्न समारंभ, मुंज, साखरपुडा किंवा जवळच्या नातेवाइकांचे निधन झाल्यावर मुख्यतः पाहुणे व नातेवाईक मुक्कामाला येत. आताच्या सारखे अर्ध्या तासात भेटून, बोलून लगेच निघून जाण्याची घाई त्या वेळी कोणालाही नसायची.

आयुष्याला वेग नक्की कधी आला हे सांगता येणे अवघड आहे. परंतु १९३० च्या आसपास महाराष्ट्रात सुरू झालेल्या कापड गिरण्या आणि त्यामुळे निर्माण झालेले रोजगार व स्थलांतर, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली विकासकामे, १९९० नंतरचे खासगीकरणाचे वारे आणि त्यातून निर्माण झालेल्या नोकऱ्या असे टप्पे सांगता येतील. कूळ कायदा येईपर्यंत दरवर्षी जमीनमालक कुटुंबासह सुगीच्या हंगामात कुळाकडे म्हणजे स्वतःच्या शेतजमिनीत मुक्कामाला जात असे.

Rural Development
Agriculture Policy : शेतकऱ्यांना गृहीत धरणे बंद करा

मॅट्रिकच्या परीक्षेला कुळांची मुले मुक्कामाला मालकाच्या वाड्यावर शहरात जात. लग्नासाठी आलेले नातेवाईक आरामात आठवडाभर राहत असत व घरातील बायकासुद्धा हसत खेळत एकत्र स्वयंपाक करीत. आनंदाने चार, पाच दिवस एकत्र राहत. पंचमीच्या सणाला माहेरी आलेल्या मुलींसाठी वाड्यावस्त्यांवर हौसेने झोके बांधले जात आणि वर्षभर कष्ट करणाऱ्या व संसाराचे ओझे पडलेल्या मुलींना माहेर सुखावून जात असे. आई जिवंत असेपर्यंत हे लाड चालत असत. कमी वयात लग्न झालेल्या मुलींना त्या वेळी किमान वीस, पंचवीस वर्षे असा आनंद मिळत असे.

Rural Development
Agriculture Produce : शेतमालाची किंमत कशी निश्चित होते ?

शहरे आकाराने मोठी झाली तशी एकाच शहरात माहेर आणि सासर असे चित्र दिसू लागले. कधी कधी दोघेही इतर राज्यांत, देशांत किंवा शहरांत नोकरीच्या निमित्ताने गेल्यावर सासर आणि माहेर दोन्हीही दूरचे झाले. लांब गेलेल्या घरातल्या लोकांना रेल्वे स्टेशनवर बैलगाडी जुंपून घेऊन जायला येणारी माणसे हळूहळू कमी झाली. त्याची जागा सुरुवातीला टांगा, त्यानंतर टॅक्सी, आणि आता बस, रिक्षा, टॅक्सी, कार यांनी घेतली आहे.

कोणत्यातरी निमित्ताने आपल्या मूळ गावी आल्यानंतर आपली शाळा, मास्तर, वर्गमित्र, मैत्रिणी यांना भेटणे होत असे. आता मात्र जीवनमान झपाट्याने बदलले आहे. अचानक निधन झालेल्या नातेवाइकांकडे जाताना सुद्धा अंत्यविधी नक्की किती वाजता आहे हे विचारून तोपर्यंत पोहोचण्याचा जेमतेम प्रयत्न होत आहे.

अनेक लोकप्रतिनिधी एकाच मुहूर्तावर असलेल्या गावातील पाच-सहा लग्नांना हजेरी लावू लागले आहेत. कोणाच्या तरी लग्नात अगोदर नवरा- बायकोला भेटून व फोटो काढून, दुसऱ्या लग्नात पहिल्या मंगलाष्टकाला उपस्थित राहून आणि तिसऱ्या लग्नात शेवटच्या मंगलाष्टकाला हजर राहताना पुढाऱ्यांची दमछाक होत आहे. बहुतेक ठिकाणी प्रवासाचा जाण्या-येण्याचा वेळ वाढत गेला आहे, त्या प्रमाणात एकमेकांना देण्याचा प्रत्यक्ष वेळ कमी होत आहे.

कुटुंबे छोटी झाल्यामुळे, शिक्षणामुळे, चांगल्या नोकऱ्या मिळाल्यामुळे, शेती परवडत नसल्यामुळे, शेती विकल्यामुळे, भूसंपादन झाल्यामुळे आणि उन्हातान्हात कष्ट करण्यापेक्षा सावलीत बसून जास्त वेतन मिळत असल्यामुळे शहरी आणि नागरी संस्कृतीमध्ये वाढ होत आहे. प्रवासाची चांगली साधने झाल्यामुळे व रस्त्यांचे जाळे सुधारल्यामुळे देखील दुसऱ्या ठिकाणी नातेवाइकांकडे मुक्काम करण्याची गरज संपुष्टात येत आहे.

एरवी कोणत्याच सुख दुःखाच्या प्रसंगाला हजर न राहिल्यामुळे कामानिमित्त एखाद्या गावी गेल्यावर लॉज, हॉटेल किंवा अन्य पर्याय उपलब्ध होत आहेत. शक्यतो कोणताच पर्याय नसेल, तरच नातेवाइकांकडे मुक्कामाला जाण्याचा पाश्‍चात्त्यांचा विचार हळूहळू भारतात पण मूळ धरू लागला आहे. जी गोष्ट मुकामाची तीच गोष्ट पाहुणचाराची पण झाली आहे. शहरातील छोट्या घरांमुळे नातेवाइकांकडे मुक्काम करणे गैरसोयीचे ठरू लागले आहे.

त्याचबरोबर अचानक घरी पाहुणे येणार असतील, तर अल्प काळाची पूर्वसूचना मिळत असल्यामुळे पाहुणचाराला घरचे पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे प्रमाणदेखील कमी होऊ लागले आहे. जवळच्या मिठाईच्या दुकानातून रेडिमेड खाद्य पदार्थ आणून पाहुणचार केला, तरी परस्परांना वाईट वाटेनासे झाले आहे. कधी कधी तर शहरात घराच्या बाहेर पाहुण्याला हॉटेलमध्ये खाऊ घालून परस्पर वाटेला लावले जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

आता पूर्वीप्रमाणे चहापान हे नाममात्र राहिले आहे. विशेषतः डायबेटिसमुळे निम्मे पाहुणे गोड खात नाहीत. ‘अतिथी देवो भवो’ अशी परंपरा असलेला या देशात अतिथीला पण वेळ नाही आणि यजमानालाही वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. जीवनाचा वेग वाढत असताना अप्रत्यक्षरीत्या अतिथीला देव मानण्याच्या संस्कृतीवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. रस्ते रुंद आणि गुळगुळीत झाले आहेत, तरी मानवी मने अरुंद होत आहेत.

इमारतीच्या उंच्या वाढल्या तरी माणसे खुजी होऊ लागली आहेत. माहेरचा रस्ता, शाळेचा रस्ता, गल्लीतला रस्ता, मंदिराचा रस्ता आता अनोळखी होऊ लागला आहे. प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत ‘‘माझ्या रस्त्याला मी ओळखले नाही, की त्याने मला ओळखले नाही, कोण जाणे! त्याच्या उशाची टेकडी कापली होती. तो रस्ता खूप म्हातारा होऊन वारला असावा. आता त्याची जागा एका डांबरट रस्त्याने घेतली होती, आणि तो आपल्या नावाची पाटी लावून पडला होता. मी ती पाटी वाचायला गेलो नाही.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com