Human Life Style : बदलती जीवनशैली, आहार आणि पशुपालक

वैदिक-अवैदिक, शाकाहार-मांसाहार या विषयांवर आपल्याकडे एका विशिष्ट पठडीत चर्चा होतात. पशुपालकांच्या शेकडो जाती आहेत. बायोमासचं रूपांतर दूध, प्रथिने, हाडं आणि कातडी यांमध्ये करण्यासाठी पशूंची गरज असते.
Human Life Style
Human Life Style Agrowon

सुनील तांबे

Cattle Herder Lifestyle : वैदिक-अवैदिक, शाकाहार-मांसाहार या विषयांवर आपल्याकडे एका विशिष्ट पठडीत चर्चा होतात. पशुपालकांच्या शेकडो जाती आहेत. बायोमासचं रूपांतर दूध, प्रथिने, हाडं आणि कातडी यांमध्ये करण्यासाठी पशूंची गरज असते.


‘‘गावी कोंबड्या पाळायचे. परंतु कापायचा वा बळी द्यायचा कोंबडा. कारण कोंबड्या अंडी देतात. पाहुणेरावळे आले तर नाइलाजाने खुराडं साफ करायला लागायचं. सणावाराला वा नवस फेडायला कोंबडाच कापायचो,’’ असं एका मित्रानं सांगितलं.

बोकडाचं मांस उत्तम समजलं जातं. शेळीचं मांस वातड. शेळी गेली जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड, ही म्हण त्यातूनच आली असावी. कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या लोकांना मुंबईतलं मटण रास येत नाही. कारण मुंबईत अनेकदा शेळीचं मटण बोकडाचं म्हणून देतात, असं दर्दी लोक सांगतात. त्यामुळे गावच्या धनगराकडून बोकडाचा वाटा घेणं बेस.

शेळ्यामेंढ्यांचे कळप पाळायचे तर पशूंची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कलिंग वा पशुहत्या गरजेची असते. अन्यथा, पशुपालकांचं आर्थिक जीवन विस्कटून जातं. त्याचा सांस्कृतिक आविष्कार बोकडाचा बळी देणं, जत्रांमध्ये बोकड कापणं हा असावा. बहिरमच्या जत्रेत मटण हाच नैवेद्य.
पशुपालकांच्या जीवनाशी सुतराम संबंध नसलेल्या लोकांनी प्राणिहत्येच्या विरोधात चळवळ सुरू केली. अर्थात, अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक पदर त्या चळवळीलाही होताच.

Human Life Style
बदलती जीवनशैली अन् वाढते आजार

वास्तविक मांसाची बाजारपेठ फारच मर्यादित होती. कारण मांसाचं उत्पादन घरोघरीच व्हायचं. कोंबड्या पाळायच्या. पण कापायचा कोंबडा. रोज कोंबडी खायची तर आधुनिक पोल्ट्री फार्मशिवाय शक्य नाही. आख्खा बोकड एका कुटुंबाला संपणं शक्य नव्हतं.

त्यामुळे एका बोकडाचे वाटे काढून विकायचे. तेही रविवारी वा सणासुदीला. पूर्वीच्या काळी गावात मटणाच्या खाणावळी होत्या. एक बोकड कापला की दिवसभर खाणावळ चालायची.

खाणावळीसाठी लागणाऱ्या कोंबड्या रोज मिळणं कठीण होतं. कारण पोल्ट्री फार्मची संख्या कमी होती.

Human Life Style
बदलती समाजव्यवस्था आणि कृषी पर्यटन

१९८० च्या दशकात हायवेवरच्या ढाब्यांवर कोंबड्यांची खुराडी असायची. आठवडी बाजारातून कोंबड्या आणून ठेवायच्या. रोज दोन कोंबड्या कापायच्या. तेवढंच गिऱ्हाईक असायचं. क्रयशक्ती कमी होती त्या काळातली ही गोष्ट. ढाब्यावर अंडीही रोज नसायची.

अंडी, ऑम्लेट, मासे, कोंबडी, बीफ, पोर्क ही चैन केवळ शहरात असायची. ढाब्यांवर मासेही जवळच्या नदीतले असायचे. मासे खाण्याचा ठरावीक हंगाम असायचा. पंजाबात आजही मासे केवळ हिवाळ्यात खाल्ले जातात. त्या काळी वीज सर्वदूर पोहोचलेली नव्हती.

त्यामुळे शीतगृहांची संख्या कमी होती. हजारो ढाबे कंदील, ढिबऱ्या, पेट्रोमॅक्स यांच्या प्रकाशावर चालायचे. अशा परिस्थितीत मांसाहार सोडा, पण शाकाहारावरही मर्यादा होत्या.

गावोगाव अमूलचं दूध, क्रीम, लोणी, तूप मिळत नव्हतं. त्यामुळे मांसाहारी व शाकाहारी दोघेही कुपोषित होते पूर्वी. स्वातंत्र्यापूर्वी सरासरी आयुर्मान ५५ वर्षं होतं. म्हणून तर वयाची साठी साजरी करण्याची प्रथा होती.

आर्थिक विकास झाला म्हणजे लोकांच्या खिशात पैसे खुळखुळू लागण्याएवढी संपत्ती निर्माण झाल्यावर प्रथिने, फॅट्स आणि साखर यांचा खप वाढला. त्यातून लाइफ स्टाइल व्याधी आल्या, उदा. मधुमेह. मांसाहार आणि शाकाहार (मिठाई) यांना चांगले दिवस आले.

भाज्या, फळे यांचाही खप वाढला. म्हणून तर वेगन म्हणजे जनावरांचं दूध व दुधाचे पदार्थही न खाण्याची चळवळ सुरू झाली. सुबत्ता आल्यानंतरच आरोग्याबाबत माणूस संवेदनशील होतो. पर्यावरणाचा विचार करू लागतो.

मात्र हे लाभ पशुपालकांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यांच्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल झाले नाहीत. त्यांच्या आर्थिक जीवनातून बोकडाचा बळी हे प्रकरण मात्र हळूहळू हद्दपार होऊ लागलं.

सांस्कृतिक जीवनातही पशुबळीचं महत्त्व कमी होऊ लागलं. वैदिक-अवैदिक, शाकाहार-मांसाहार या चर्चेमध्ये आर्थिक विकास, त्यामुळे बदललेली जीवनशैली, आहार यांचंही भान ठेवलं तर बरं होईल.
-------------
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com