बदलते ग्रामीण लोकजीवन

१९५३ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एन्सायक्लोपिडिया ऑफ ब्रिटानिया’ या कोशामध्ये कृषी संस्कृतीशी निगडित असणारा ग्रामीण समुदाय म्हणजे ‘लोक’ अशी व्याख्या करण्यात आली आहे. शहरी संस्कृतीपेक्षा स्वतंत्र संस्कृती असलेला आणि आर्थिक, विकास व शिक्षण या बाबतीत मागे राहिलेल्या लोकांचा समूह म्हणजे ‘लोक’ अशी सुद्धा व्याख्या समाजशास्त्रज्ञांनी केली आहे.
Gaon
GaonAgrowon

१९५३ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एन्सायक्लोपिडिया ऑफ ब्रिटानिया’ या कोशामध्ये कृषी संस्कृतीशी निगडित असणारा ग्रामीण समुदाय म्हणजे ‘लोक’ अशी व्याख्या करण्यात आली आहे. शहरी संस्कृतीपेक्षा स्वतंत्र संस्कृती असलेला आणि आर्थिक, विकास व शिक्षण या बाबतीत मागे राहिलेल्या लोकांचा समूह म्हणजे ‘लोक’ अशी सुद्धा व्याख्या समाजशास्त्रज्ञांनी केली आहे. गेल्या शंभर वर्षात हे लोकजीवन झपाट्याने बदलल्याचे लक्षात येते.

१९०१ मध्ये ब्रिटिश प्रशासकांनी भारताचा जनगणना रिपोर्ट लिहिला. त्या वेळी एकत्र भारताची लोकसंख्या २९.४ कोटी एवढी होती. ९० टक्के लोक ग्रामीण भागात व केवळ १० टक्के लोक शहरामध्ये राहत होते. ही जनगणना होण्यापूर्वी १८९६ ते १९०० या चार वर्षांत प्रचंड दुष्काळामुळे सुमारे ५० लाख लोक मयत झाले होते. तेवढेच लोक प्लेगमुळे मयत झाले. त्या वेळी १० हजार पुरुषांमध्ये केवळ ६८ पुरुष आणि ७ स्त्रिया शिक्षित होत्या.

लोकजीवनामध्ये आचार-विचार, दररोजच्या जगण्यातील रीती-रिवाज, कपडे, राहणीमान, सण-वार, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थिती या सर्वांचा समावेश होतो. गेल्या १०० वर्षांत लोक जीवनात एवढा बदल झाला आहे, की आताच्या पिढीला ५०-६० वर्षांपूर्वी अशी एखादी गोष्ट पूर्वी होती असे म्हटले तरी विश्‍वास बसणार नाही.

झपाट्याने झालेले शहरीकरण आणि शहरी संस्कृतीचा झालेला परिणाम आपल्याला पदोपदी व प्रत्येक गावात पाहायला मिळतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शेकारावी लागणारी गवताच्या छप्परांची घरे जवळपास संपुष्टात आलेली आहेत. आता तर सर्रास 'आरसीसी'ची घरे पाहायला मिळतात. एकाच वाडीवर राहणारी एकमेकांची नातेवाईक मंडळी भावकीतून बाजूला होऊन आपापल्या शेताच्या वाटणीत घरे बांधून राहू लागली आहेत.

१९४०-५० पर्यंत वाकड्या-तिकड्या लाकडाच्या मेडी उभ्या करून, उभारलेले जनावरांचे गोठे आता कालबाह्य होत आहेत. शास्त्रीय पद्धतीने सिमेंट कोबा करून गव्हान करून जनावरांचे गोठे उभारले जात आहेत. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळी गावात आल्यावर हक्काने रस्त्यांची, सिमेंट बंधाऱ्यांची मागणी केली जात आहे. हळूहळू गावामध्ये लोकसंख्येच्या राजकीय दबावामुळे या गोष्टी घडत आहेत. शेतकऱ्यांची घरे आता किचन, बाथरूम यांसह अत्याधुनिक टाइल्स लावून बनवली जातात. वाडी-वस्ती वर टीव्ही केव्हाच पोहोचला आहे आणि मोबाईल, इंटरनेट डाटा पॅकमुळे जगात अर्धा तासापूर्वी प्रसारित झालेला व्हिडिओ गुराख्याच्या मोबाईलवर दिसू लागला आहे.

लोक संस्कृती, शेतीजीवनाचा व निसर्गाचा घनिष्ठ संबंध आहे, तरीही शहरी संस्कृतीचा प्रभाव ग्रामीण भागावर पडत आहे. प्रत्येक सणावारासाठी गावी जाणारी माणसे आता गावी जात नाही. किंबहुना, कोणत्याही एकावेळी गावातलीच १०-२० टक्के माणसं नोकरीसाठी, सरकारी कामासाठी, हॉस्पिटल मधल्या उपचारासाठी, शिकण्यासाठी किंवा अन्य कामासाठी शहरांमध्ये दिसतात. शेतीशी संबंधित असलेले सण भोगी, अमावास्या, पूनव, गावच्या जत्रा यामध्ये सुद्धा बदल होत आहेत. ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी चारचाकी वाहनांनी काही तासांसाठी जाऊन परत शहरात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

परंपरेचा भाग म्हणून झाडांची पूजा, शेतीच्या अवजारांची पूजा वैयक्तिक पातळीवर आली आहे. लोकमनाने स्वीकारलेल्या मरीआई, म्हसोबा, काळूबाई या दैवतांची सार्वजनिक व नियमित पूजा अर्चा करणे गावातील लोकांना अवघड होऊ लागले आहे. असे म्हणतात, की शहरीकरण झाले की सामूहिकता कमी होते आणि वैयक्तिक गोष्टींना महत्त्व प्राप्त होते. पूर्वीच्या गावेागावच्या देवळांमधील काही ठिकाणी जुन्या मूर्ती बदलल्या आहेत व आकर्षक, संगमरवरी, घडीव मूर्ती नव्या मंदिरामध्ये बसवल्या जात आहेत.

लोकगीते म्हणी, वाक्प्रचार, उखाणे आणि लोककथा या देखील लोकसाहित्यातील महत्त्वाच्या परंपरा असून, गावोगावी झालेल्या तथाकथित आंतरराष्ट्रीय शाळा, कॉन्व्हेंट शाळा यांच्या प्रभावाखाली लोकसाहित्याचे पिढ्यान् पिढ्या होणारे संक्रमण जणू खंडित झाल्यासारखे वाटत आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या मुलांना म्हणींचा आणि वाक्प्रचारांचा अर्थ समजून सांगताना आईवडिलांची दमछाक होत आहे. लोक कलांमधील लावणी, भजन, तमाशा, दशावतारी खेळ, नमन खेळ, वगनाट्य या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. लोकांच्या वापरातील गोधडी, गाडगे, मडके, घागर, हांडे कमी होऊन प्लॅस्टिकची बादली, पाणी शुद्धीकरणासाठी ॲक्वागार्ड, मिक्सर अशी आधुनिक साधने घरात दिसू लागली आहेत. फळाची विक्री डझनावरती न होता आता किलोवर होऊ लागली आहे. चिपटे, आठवा, पायली ही मोजमापे कमी होऊन दशमान पद्धती चांगलीच रुजली आहे. बलुतेदारी नष्ट झाली आहे. शेतजमिनीत आता कुळे नाहीत. कंत्राटी शेती येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन होत आहेत. छोट्या गावांमध्ये बँकेच्या शाखा उघडल्या आहेत. प्रत्येक जण अर्थव्यवस्थेला जोडला जात आहे. जनावरे कमी झाली आहेत. अन् गायराने अतिक्रमणांनी व्यापली आहेत. जनावरे चरायला नेण्यासाठी चराऊ रान संपुष्टात येत आहे.

कधी कधी वाटते खुरपण्यासाठी सुद्धा कंपनीचा ड्रेस देऊन माणसे भरती करावी लागतील आणि बेकार असलेले सुशिक्षित मुले सुद्धा शेतकऱ्यांकडे थेट काम करण्याऐवजी कंपनीचे नोकर म्हणून निम्म्या पगारात तेच शेतीतले काम करतील. २०११ च्या जनगणनेमध्ये ७५ टक्के शिक्षित लोकसंख्या आणि १२१ कोटी एकूण लोकसंख्या झालेल्या या देशात ग्रामीण लोकजीवन झपाट्याने बदलले हे मात्र नक्की!

- शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com