लोककलेचे बदलते जग

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अगदी इतिहास काळापासून विद्या, कला आणि कारागिरी यांचे दर्शन पावलागणिक होत असे. कारागिरीमध्ये वस्तू, वास्तू, वस्त्र इत्यादी कलापूर्ण पद्धतीने निर्माण करून आनंद मिळविण्याचा माणसाचा प्रयत्न होता.
Maharashtra Folk Art
Maharashtra Folk ArtAgrowon

गेल्या १०० वर्षांमध्ये लोककलेचे (World Of Folk Art) जग सुद्धा बदलले आहे. १९९५ मध्ये ग्रामीण महाराष्ट्राला इंटरनेटचा (Internet Revolution) स्पर्श झाला आणि सगळे जगच जणू डिजिटल होऊन मोबाईलच्या आवाक्यात आल्यासारखे झाले. जग हे एखादे खेडे झाल्यासारखे जवळचे वाटू लागले आहे. असे असले तरी इंटरनेट च्या जमान्यात सगळ्यात जास्त दुष्परिणाम कशावर झाला असेल तर तो म्हणजे लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोककला यांच्यावर! स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत लोककलांचा दैनंदिन जगण्यामध्ये अविभाज्य भाग होता. सर्व लोककला या एका पिढीतून दुसऱ्या पिढीला संक्रमित होतात. त्यामुळे परंपरा आणि परिवर्तन या दोघांचा मेळ लोककलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जसजसा समाज बदलला तसतसा लोककलेमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

Maharashtra Folk Art
इथेनॉलमुळे ऊस, साखरेला दर मिळेल : शेखर गायकवाड

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अगदी इतिहास काळापासून विद्या, कला आणि कारागिरी यांचे दर्शन पावलागणिक होत असे. कारागिरीमध्ये वस्तू, वास्तू, वस्त्र इत्यादी कलापूर्ण पद्धतीने निर्माण करून आनंद मिळविण्याचा माणसाचा प्रयत्न होता. बलुतेदार आणि आलुतेदारसुद्धा कलाक्षेत्रामध्ये मागे नव्हते. राजाश्रय मिळाल्यानंतर घराघरांत व गावागावांत लोककला, कलाकुसर व कारागिरी यामध्ये वाढ होत गेली. सर्कस, कुस्ती, शाहिरी, तमाशा, भेदीक, कीर्तने, महोत्सव, चित्रकला यांना राज्यातील अनेक संस्थानिकांनी मदत केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील या शाहिरांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवून टाकला होता.

मुंबईची लावणी, माझी मुंबई, अकलेची गोष्ट, लोकमंत्र्याचा दौरा अशा महत्त्वाच्या कलाकृतींद्वारे डफावर थाप मारत आपल्या बुलंद आवाजाने अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केले. ‘सुटलाय वादळी वारा’ असे म्हणणारे शाहीर अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला मोठी धार दिली. भाऊ नारायणगावकर, विठाबाई, दत्ता शिरोलीकर, रंगनाथ शिंदवेकर, भाऊ टाकळीकर अशा लोकांनी तमाशा कलेत लोकांचे मनोरंजन केले. चेहरा रंगवून, पोटाला चाकू-सुऱ्या लावून फिरणारे, देवाच्या नावाने दक्षिणा मागणारे, तारेवर डोंबाऱ्याचा खेळ खेळणारे कलावंत गावोगावी जाऊन लोकांचे मनोरंजन करत असत. वारली, गोंड, आणि आदिवासी जमातीमध्ये दगडांवर, गुहेमध्ये, घरामध्ये साधी-साधी चित्रे, भूमितीच्या आकाराच्या द्वारे तयार करून वारली कलेचा वारसा जोपासण्यात आला. मराठी लावणीसुद्धा हळूहळू बहरत गेली. स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्या, अंगाई गीते, कांडप करताना म्हटली जाणारी कांडप गीते आता फारशी कानावर पडत नाहीत. यात्रा आणि जत्रासारख्या उत्सवांमधील मिरवणुका, नृत्य मात्र परंपरेचा भाग म्हणून टिकून आहे. शहरीकरण फार मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे लोककलेचे सुद्धा शहरीकरण होऊ लागले आहे.

Maharashtra Folk Art
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड

ग्रामीण भागातील वैयक्तिक स्वरूपाच्या आविष्कारामधून दिवसभर फिरुनही फारसे पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर वैयक्तिक लोककलांना मर्यादा आल्या आहेत. कसरतीचे खेळ करणारे डोंबारी, गारुडी, दरवेशी आता मोठ्या शहरांमधून फिरताना दिसत आहेत. कमी लोकसंख्या असणाऱ्या गावात पूर्ण दिवसभर राबूनही लोकांची क्रयशक्ती कमी असल्यामुळे, लोक फार पैसे या लोककलावंतांना देऊ शकत नाहीत. टिंगरीच्या तालावर गाणं म्हणत गावोगावी फिरणारा टिंगरीवाला आता दिसत नाही. कलापथके आता दिसेनासे झाले. पोतराज, पिंगळ्या, गोंधळी, अभावानेच आढळतात. कोकणातील दशावतार आणि लग्नाचा जागरण गोंधळ यांचे स्वरूप बदलले असले तरी या लोककला आपले महत्त्व टिकवून आहेत. बारसे, डोहाळे जेवण, विवाह व त्या निमित्य होणारे कौटुंबिक कार्यक्रम यांना मार्केटिंगचे वारे लागले आहे. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, संगीतबारी, गझलगायन, शास्त्रीयगायन, चित्रकथी, तमाशा, हाजेरी या सगळ्यांना कोरोनाच्या काळात मोठा फटका बसला आहे. चित्र, शिल्प, काष्ठशिल्प, खेळणी व भांडी निर्मिती, दगडी व मातीच्या मूर्ती घडविणे यामध्ये सर्व अत्याधुनिक साधनांचा वापर होत आहे. जुन्या व नव्या प्रतीकांचा समावेश करून या तरुण पिढीला आवडेल अशा पद्धतीने त्यात बदल घडवला जात आहे. पारंपरिक पैठणी सुद्धा आता नवे डिझाइन घेऊन सेमी पैठणी नावाने प्रसिद्ध पावत आहे. संगीत, काव्य, नाट्य, कव्वाली या सर्वच कलांच्या क्षेत्रात बदल घडत आहेत.

ओटीपी प्लॅटफॉर्म (ओपन टेलिकॉम) आल्यापासून १९८० पासून सगळ्यात प्रभावी असलेला टीव्हीसुद्धा मागे पडलेला आहे. शहरी भागात तर आता टीव्हीच्या चॅनेलचा अतिशय मर्यादित वापर होत आहे. सर्व गोष्टींचे मार्केटिंग करण्याच्या या जमान्यामध्ये करमणुकीच्या या बाजारात लोककला टिकाव धरू शकल्या नाहीत. लोककला हा पोट भरण्याचे अनेक लोककलावंतांचे साधन होते. सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये असलेल्या लोकरंगभूमी या संस्थेने याच जिल्ह्यातील चार तालुक्यात केलेल्या पाहणीमध्ये पारंपरिक कलांचा वारसा टिकवून ठेवणारी २००० कुटुंबे आढळून आली व त्यामध्ये एकूण १७ लोककला प्रकार आढळून आले. या कुटुंबांमध्ये पुढच्या पिढीमध्ये मात्र आता लोककलेची सूत्रे देण्याची इच्छा दिसत नाही. कित्येक शतके अनेक लोककलांचा जातिव्यवस्थेशी व धार्मिक रूढींशी संबंध होता. या सर्व लोककला अधिक मानवतावादी होण्याची तज्ञांना प्रतीक्षा आहे. स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीच्या जगात कुटुंबे व नातेसंबंध दुरावल्याची भावना देखील वाढीला लागली आहे. अशा वेळी लोककला या नवीन स्वरूपात नव्या पिढीला पाहायला मिळाव्यात आणि त्या देखील सर्व भाषांमध्ये! तरुणांना, लहान मुलांना, आबालवृद्धांना त्यांनी सामावून घ्यावे अशी सुद्धा रास्त अपेक्षा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com