चरित्र आणि चारित्र्य

जन्माला आलेल्या प्रत्येकाची वेगळी कहाणी असते. ज्यात जन्माला आल्यापासून आजपर्यंत आयुष्यात घडलेल्या बऱ्या वाईट घटना असतात.
चरित्र आणि चारित्र्य
Mashagat ArticleAgrowon

जन्माला आलेल्या प्रत्येकाची वेगळी कहाणी असते. ज्यात जन्माला आल्यापासून आजपर्यंत आयुष्यात घडलेल्या बऱ्या वाईट घटना असतात. यशापयश, मानापमान, सुख-दुःखाच्या डोंगरदऱ्या पार करत, संपर्कात आलेली बरी वाईट माणसे असतात. सृष्टीची अनेक रूपे बघत कृतकृत्य झालेले क्षण. मिळालेले बरे वाईट अनुभव त्यातून मिळालेले आयुष्याचे धडे. हातून कळत नकळत घडलेल्या काही चुका, त्यातून काही दुखावलेली मने. आवर्जून किंवा सहज घडलेले काही परोपकार, समाजसेवा. कुणाच्या दुःखावर घातलेली मायेची फुंकर. कृतज्ञतापूर्वक सुखावलेली मने. तर कधी कृतघ्नपणा आणि विश्‍वासघाताचे झटके सहन करत प्रत्येकाचे स्वतःचे एक चरित्र तयार झालेले असते. आयुष्याचे सुखासीन किंवा हलाखीचे असे चरित्र स्वाभाविकपणे घडत जाते. आपले चरित्र चांगले घडावे असे जरी प्रत्येकाला वाटत असले तरी ते आवाक्याबाहेरचे असते. आपला जन्म कुठे व्हावा? आपले रंगरूप कसे असावे? हे आपल्या हातात नसते. तसेच आयुष्यात घडत जाणारे आपले चरित्र आपल्या हातात नसते.

चरित्र घडत जाते आणि चारित्र्य घडवावे लागते. चारित्र्यवान बनणे हे प्रत्येकाला शक्य आहे. त्यासाठी स्थल, काल, वय किंवा आर्थिक स्थिती असे कोणतेही बंधन नसते. सच्चाईने हसतमुखाने परोपकार करत जगणारा एखादा कफल्लक मनुष्यसुद्धा चारित्र्यवान असतो. ती खरी संपत्ती असते जी पिढ्यान् पिढ्या टिकणारी असते. चारित्र्यवान माणसांची चरित्रे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. चारित्र्यवान माणसाचे आयुष्य जितके खडतर असते तितकेच ते अधिक प्रभावी आदर्श घेण्यायोग्य ठरते.

चारित्र्यवान व्यक्ती आलेल्या प्रत्येक संकटातून शिताफीने मार्ग काढत असतो. आपले ईप्सित साध्य करण्यासाठी नीतिमूल्ये पायदळी तुडवीत प्रसंगी कोणत्याही थराला जाणारे मोठे होतात. मात्र चारित्र्यवान बनू शकत नाहीत. स्वतःच्या कोषात असणारे, सुखासीन आणि कृतिशून्य आयुष्य जगणारे चारित्र्यवान होऊ शकत नाहीत. मुलगा भरपूर कमावू लागला की तो बापाला ‘आता आराम करा’ असे सांगू लागतो. परंतु बहुतेकांना काम केल्याशिवाय चैन पडत नाही. आजोबांचे कार्यरत राहणे हे नातवाला कार्यप्रवण बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरते. अचानक येणारी संपत्ती बहुतेकांना कृतिशून्य बनवते. त्या संपत्तीने त्यांच्या कलागुणांचा कर्तबगारीचा गळा घोटलेला असतो. त्यांचे चरित्र त्या क्षणी थांबलेले असते. पुढच्या पिढीला त्याच्याकडून आदर्श घेण्याजोगे काही उरत नाही. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची आठवण निघत नाही. काळाच्या पडद्याआड अशी माणसे लुप्त होऊन जातात. माणुसकी असणारा प्रत्येक माणूस चारित्र्यवान असतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत असणाऱ्या चारित्र्यवान माणसांना जग कायम लक्षात ठेवते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com