Hapus Mango Season : हापूस आंब्याच्या सुवासाचे वैशिष्ट

हापूस ही आंब्याची अशी एकमेव जात आहे की, ज्यामध्ये ५५ वेगवेगळी वायुरूप रासायनिक संयुगे तयार होतात. यामध्ये १९ मोनोटर्पिन्स, ११ सेस्क्विटर्पिन्स, ६ नाॅनटर्पिन हायड्रोकार्बन्स,४ अल्कोहोल्स, ३ अल्डीहाईड्‌स, ८ लँक्टोन्स, २ फ्युरानोन्स तर आणखी २ वेगळीच संयुगे आहेत. या सगळ्यांचे मिश्रण हे हापूस आंब्याचा सुवास आणि स्वादाचे वैशिष्ट्य आहे.
 Mango
Mango Agrowon

डॉ. विद्या गुप्ता

Mango Season Update : आंब्याचा उगम खूपच जुना म्हणजे क्वाटर्नरी युगातील. भारतीयांसाठी विशेष उल्लेख करण्याजोगी गोष्ट म्हणजे हा उगम भारतीय उपखंडामध्ये, भारत- म्यानमार तसेच जवळील प्रदेशात झाला आहे. आंब्याच्या जवळपास ६९ जंगली प्रजाती आहेत.

यापैकी बहुतेक प्रजाती आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशात पसरलेल्या आहेत. पण काही मात्र २७ अंश उत्तर आणि पॅसिफिकमधील कॅरोलिन बेटांपर्यंत विस्तारल्या आहेत. सद्यःस्थितीतील आंबा म्हणजे शास्त्रीय भाषेत ‘मँजिफेरा इंडिका’. हा सुद्धा खूप जुना म्हणजे जवळजवळ चार हजार वर्षांपूर्वीचा सर्वात प्रथम लागवडीखाली आणलेला उष्णकटिबंधीय फलवृक्ष आहे.

भारतात आंब्याच्या एक हजाराहूनही अधिक जाती आहेत. सगळ्यांच जाती लागवडीखाली आहेत आणि त्या आहारात आहेत, असे मात्र नाही. भारत हा आंब्याच्या उत्पादनात, उत्पादनक्षेत्रात आणि निर्यातीत प्रमुख देश आहे. भारताचे राष्ट्रीय फळ हे आंब्याचे स्थान वादातीत व अबाधित आहे.

आपल्याकडे आंब्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. आंब्याचा स्वाद, चव, पोषणमूल्ये, विविध खाद्यपदार्थांमधील वापर व वर्षातून दोन ते तीन महिने उपलब्धता यामुळे सर्वच भारतीयांच्या मनात आंब्याला एक अढळस्थान आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निरनिराळ्या आंब्याच्या जाती अतिशय कौतुकाने खाल्ल्या जातात;

उत्तर भारतात दशहरी, बिहारमध्ये सफेदा, ओडीशात मल्लिका, गुजराथमध्ये केसर, आंध्रात बैंगनपल्ली, कर्नाटकात बदामी, गोव्यात मलगोबा-माणकुराद, अशी कितीतरी उदाहरणे आहेत. परंतु मात्र या सगळ्यांमध्ये कोकणातील हापूस आंब्याचे स्थान वेगळे आहे.

 Mango
Kesar Mango : हापूस आंब्याची कसर केसर भरुन काढणार

या सर्वच जातींची आकार, रंग, स्वाद, पिकण्याचा व टिकण्याचा काळ अशी खूपच वेगवेगळी आणि स्वतःसाठी स्वतंत्र अशी परिमापके आहेत. भारतात आणि जगभरात अनेक संशोधकांनी खूप पूर्वीपासून या मानकांचा अभ्यास केला आहे.

परंतु नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले की ते वापरून ज्ञानाची व्याप्ती खूप सखोल करता येते. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत माझे पीएचडीचे विद्यार्थी/ विद्यार्थिनी, सहकारी आणि मी मिळून गेल्या वीस वर्षांत या बाबत विशेष संशोधन केले, अजुनही नवनवीन गोष्टी पुढे येत आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

आंब्यातील चयापचय प्रक्रिया, त्यांचा पर्यावरणीय संबंध, हापूसमध्ये आढळणारा साका आणि त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये आम्ही अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा, ओमिक्स (OMICS) तंत्रज्ञानाचा अवलंब करून महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. हे हापूस आंब्याच्या समृद्धीसाठी वापरण्याचे प्रयत्नही चालू आहेत.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वेगवेगळ्या संशोधकांच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले आहे; त्याबद्दल शास्त्रीय लेख लिहिले तसेच स्वामित्वहक्क मिळवले आहेत.

एका उत्तरात पुढचे प्रश्न दडलेलेच असतात. असे पुढचे कितीतरी काम अजूनही शिल्लक आहे,त्याबाबतही संशोधक विविध पातळीवर अभ्यास करत आहेत.

विविध सुवासाच्या जाती

भारतातील २२ आणि इतर देशातील पाच आंबा जातींच्या पृथःकरणामध्ये त्यांच्या पिकण्याच्या क्रियेमध्ये जवळजवळ ८५ वेगवेगळी वायुरूप रासायनिक संयुगे आढळून आली. माणसाच्या नाकातील या रसायनांना ओळखणारे रिसेप्टर गट आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या वासाची जाणीव करून देतात.

निवडलेल्या २७ जातींमध्ये मुख्यत्वे करून मोनोटर्पिन्स किंवा सेस्क्विटर्पिन्स या दोन प्रकारांची रसायने सर्वात अधिक दिसून येतात. भारतातील आणि भारताबाहेरील जातींमध्ये या संयुगांचे मिश्रण खूपच निराळे आहे, त्यामुळेच त्यांच्या सुवासामध्ये फार फरकही जाणवतो.

या संयुगांचे प्रमाण आंब्याच्या लंगडा जातीत भरपूर म्हणजे २५०० तर चंद्रमा जातीमध्ये अगदी कमी म्हणजे फक्त १५ मायक्रोग्रॅम प्रति ग्रॅम असते. पण विशेष म्हणजे अल्फा- पायनिन, बीटा- मिरसीन व बीटा-कॅरीओफायलीन ही तीन द्रव्ये आंब्याच्या सर्वच जातींमध्ये आढळतात, म्हणूनच त्यांना आंब्याची ‘चिन्हांक संयुगे’ मानली जातात.

रस-स्वादाचा राजा : हापूस

सोळाव्या शतकात गोव्यामध्ये पोर्तुगिजांनी आंब्यावर कलमे करून एक जात विकसित केली. त्यावेळचा व्हाइसरॉय अल्फान्सो द अल्बुकर्क याच्या सन्मानार्थ त्या जातीचे ‘अल्फान्सो’ म्हणजेच हापूस असे नामकरण केले. समुद्रावरील खारा वारा, दमट हवामान, २४-२७ अंश सेल्सिअस तापमान, जांभा-कातळाची पाणी फार न मुरणारी जमीन हे कोकणातील वातावरण या जातीला अतिशय मानवले.

जवळजवळ संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या कलमी आंब्याची लागवड सुरू झाली. हापूस ही जात आकार, रूप, रंग आणि सुवासाने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

कैरीपासून ते पूर्ण पिकलेल्या म्हणजेच झाडावरून उतरवल्यावर वीस दिवसांपर्यंतच्या फळांचा अभ्यास यातील विविध स्थित्यंतरे स्पष्ट करतो.

 Mango
Mango Amboshi Production : अलिबागमध्ये आंबोशीच्या उत्पादनात घट

आंब्याची हापूस ही एकमेव अशी जात आहे ज्यात ५५ वेगवेगळी वायुरूप रासायनिक संयुगे तयार केली जातात. त्यात १९ मोनोटर्पिन्स, ११ सेस्क्विटर्पिन्स, ६ नाॅनटर्पिन हायड्रोकार्बन्स, ४ अल्कोहोल्स, ३ अल्डीहाईडस, ८ लँक्टोन्स, २ फ्युरानोन्स याचबरोबरीने आणखी २ वेगळीच संयुगे यामध्ये आहेत. या सगळ्यांचे मिश्रण हे हापूस आंब्याचे वैशिष्ट्य.

कलमावरून उतरविल्यानंतर पंधरा दिवसांनी येणारा आंब्याचा स्वाद हा उच्चतम प्रतीचा असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे आंबा पिकताना साधारणपणे १० ते १५ दिवसांमध्येच फक्त लॅक्टोन्स आणि फ्युरानोन्स या संयुंगांची निर्मिती होते. म्हणूनच ही मेटाबोलाईटस हापूस आंबा पिकण्याची ‘चिन्हांके’ मानली जातात. त्यांचा वापर हापूस आंब्याची प्रत ठरवण्यासाठी केला जातो.

महत्वाचे म्हणजे या प्रकारच्या रसायनांची (मेसिफ्युरान, झेड- ऑसिमीन, गॅमा- लॅक्टोन, इत्यादी) सुवास सोडण्यासाठी लागणारी प्रमाणे (ओडर थ्रेशहोल्ड व्हॅल्यू) अगदीच कमी म्हणजे इतर संयुगांपेक्षा १० ते १०० पटींनी कमी आहेत, तरीही व म्हणूनच हीच रसायने पिकलेल्या हापूस आंब्याला त्याचा स्वतंत्र सुवास मिळवून देण्यात महत्वाची आहेत.

कोकणातील दापोली (N17°45` E73°39` 800m MSL), देवगड (N16°31` E73°20` At MSL) आणि वेंगुर्ले (N15°51` E73°39` At MSL) या ठिकाणच्या हापूस आंब्याच्या स्वादमाधुर्यामध्येसुध्दा पिकताना फरक दिसून येतो.

दापोलीत टर्पिन्सचे आणि देवगडमध्ये लँक्टोन्सचे प्रमाण अधिक आहे, तर देवगड व वेंगुर्ला येथे फ्युरानोन्सचे प्रमाण समसमान आहे, मात्र दापोलीत ते कमी आहे. या विशिष्ट मिश्रणांचा उपयोग त्यांना ‘भौगोलिक स्वामित्व’ (जीआय) मिळवून देण्यासाठी झाला आहे.

ही स्वादसंयुगे फळातील स्वादाची जनुके आणि चयापचय क्रिया यांच्या परस्परसंबंधांमुळेच तयार होतात. वातावरण, हवामान, जमिनीचा पोत आणि फळे पिकविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा या परस्परसंबंधांवर खूप परिणाम होऊन स्वादपूर्ण हापूस आंब्याच्या माधुर्यामध्ये फरक पडतो.

काही प्रक्रियांमुळे आंबा लवकर पिकतो, सर्व बाजूंनी एकसासारखा मोहक रंगही येतो, पण त्याच्या स्वादाचे गणितच बदलते, साठवणूक क्षमता बदलते. आर्थिक व व्यापारी समीकरणे महत्त्वाची आहेत, पण हापूस आंब्याचे रस आणि स्वाद हेच गुणधर्म त्याला किंमत मिळवून देतात. म्हणूनच ते टिकवून ठेवणेही फायदा आणि पोषणमूल्ये यांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com