
Nashik Election News : लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना असणारी आचारसहिंता बाजार समित्यांच्या निवडणुकांना लागू झाली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकांना यंदा प्रथमच आचारसंहिता लावली आहे.
नामनिर्देशन पत्र सुरू होण्याच्या तारखेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत ही आचारसंहिता राहील. आचारसंहितेचे पालन होते की भंग केली जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचे अधीक्षण, संचलन व नियंत्रण यांची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची आहे. या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिने आदर्श आचारसंहिता लागू करणे आवश्यक आहे.
जुन्या निवडणूक नियमांमध्ये बाजार समितीसाठी आचारसंहितेची तरतूद नव्हती. मात्र, नवीन बदलामध्ये ती करण्यात आली आहे.
आचारसंहिता अंमलबजावणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषी उत्पन्न बाजार समिती) यांना असतील. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आचारसहिंता लागू केली.
...अशी आहे आचारसंहिता
१) मतदानास सुरुवात होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचार बंद
२) बाजार समितीच्या पूर्वीच्याच योजना, उपविधी किंवा इतर नियमात नमूद कामे किंवा दैनंदिन कामकाजात खंड पडता कामा नये. अत्यावश्यक निविदा काढणे, जाहिराती देणे आदींसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक.
३) बाजार समितीचे सेवक दैनंदिन कामकाज सुरू ठेवतील. संस्थेचा कोणताही सेवक बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभाग घेणार नाही. प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवारासाठी अथवा पॅनेलसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होऊ नये.
४) आचारसहिंता काळात बाजार समितीच्या सेवकांच्या बदल्या करता येणार नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कामकाजाच्या सोईसाठी व निवडणूक कालावधीपुरते निवडणुकीच्या कामकाजासाठी बदली करू शकतील.
५) बाजार समितीच्या खर्चाने पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन समारंभ आदी या काळात आयोजित करता येणार नाहीत.
६) आचारसंहिता कालावधीत, आचारसंहिता लागू असलेल्या बाजार क्षेत्रात किंवा बाजार क्षेत्राच्या बाहेरही संस्थेच्या खर्चाने संचालक मंडळाने दौरे करू नयेत. विश्रामगृहाचा वापर संचालकास, उमेदवारास करता येणार नाही.
७) कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या काळात प्रचार मोहीम, निवडणूक कार्य किंवा निवडणुकीशी संबंधीत प्रचार करण्यासाठी बाजार समितीच्या वाहनांचा वापर होणार नाही.
८) निवडणुकीशी संबंधित व्यक्तीस शस्त्रास्त्रे बाळगता येणार नाहीत. ही बंदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.
९) प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेदेखील प्रचारावर बंदी राहील.
१०) आचारसंहितेच्या कालावधीत संबंधित बाजार समितीच्या सेवेत भरती करण्याच्या दृष्टिने जाहिराती देणे, मुलाखती येऊ नये.
११) बाजार समितीच्या अधिमंडळाचे वार्षिक तसेच संचालक मंडळ व विविध समित्यांच्या (विषय समित्या इ.) बैठका ज्या कायद्यानुसार घेणे बंधनकारक आहे, त्या घेता येतील. परंतु त्यात मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.