
Nandurbar News : अवकाळी पावसाने सोमवारी (ता. १३) सायंकाळी तळोदा शहरासह तालुक्याला पुन्हा एकदा झोडपले असून, गारपीटदेखील झाली आहे. यामुळे तळोदा शिवार, मोड, खरवड, तळवे, आमलाड या भागात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मंगळवारी (ता. १४) तळोदा तालुक्यात भेट देऊन मोड, खरवड येथील शेतशिवार गाठले.
आमदार राजेश पाडवी (MLA Rajesh Padvi) यांच्या भेटीनंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनीही पाहणी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
तळोदा तालुक्यात आठ दिवसांत दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सोमवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसात गारपीटदेखील झाली आहे. या गारपिटीमुळे आधीच नुकसान झालेल्या गव्हाच्या पिकाला अजून मोठा मार मिळाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मोड शिवारातील उज्ज्वला विलास पाटील यांच्या शेताला भेट दिली, तर खरवड शिवारातील रमण वळवी यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली.
धानोरा शिवारातील मोहन ठाकरे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, तहसीलदार गिरीश वखारे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, मोड सरपंच, सदस्य डॉ. पुंडलिक राजपूत नारायण ठाकरे, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, दारासिंग वसावे, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मदतीची आस...
रब्बी हंगामात घेतलेले गहू पीक काढणीवर आले आहे. काही शेतकऱ्यांनी पीक काढलेदेखील आहे. मात्र अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गहू आडवा झाला आहे.
त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे तातडीने दिलासा मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
शहादा तालुक्यात पुन्हा अवकाळीची शक्यता...
शहादा तालुक्यात ६ मार्चला झालेल्या वादळी पावसानंतर पुन्हा १५ व १६ मार्चदरम्यान काही ठिकाणी संभाव्य वादळी, तर काही ठिकाणी तुरळक व हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
वादळी वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन शहाद्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.