ये जवळ ये... !

वनस्पतींसारखेच, किडे, प्राणी आणि इतर सर्व जिवांमध्ये देवासारखा सूक्ष्मजीवांचा वास आहे. त्यांच्याशिवाय जीवन अशक्य आहे. लेडीबर्ड किड्याच्या शरीरातील जिवाणू त्याचे बाळ, नर असेल की मादी ते ठरवते. यावरून किडे आणि जिवाणूंचे सहजीवन लक्षात येईल. माणसाच्या शरीरात देखील साधारणतः दोन टक्के जिवाणू आहेत.
Agriculture
Agriculture Agrowon

घरातून ऐकू येणाऱ्या गोंगाटामुळे, अंगणात बसून पुस्तकात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंटूचं लक्ष विचलित झालं. पुस्तक बाजूला ठेवून तो घरात आला. नेहमीप्रमाणे त्याचे वडील आणि काकांचं भांडण सुरू होतं. त्याचे वडील कुशा कदम आणि काका दादू कदम, या सख्ख्या भावांचं भांडण जुंपलं होतं. या दोघांना वेगळं व्हायचं होतं. एकोप्याने राहणाऱ्या कदम कुटुंबाला घरात सुना आल्यावर वाटणीचे वेध लागले होते. कोणे एके काळी शेकडो एकरच्या वडिलोपार्जित जमिनीचे, दोन पिढ्यांतच चिंचोळ्या तुकड्यात रूपांतर झाले होते. त्याचे अजून तुकडे होऊ नये, असं चिंटूच्या आजोबांना वाटत होतं. चिंटूने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. निकालाची वाट बघत तो त्याच्या आवडत्या पुस्तकाच्या जोडीने सुट्ट्या घालवत होता. रोजच्या भांडणाचा चिंटूला कंटाळा आला होता. पुस्तक बेडवर भिरकावले, सायकल काढली आणि त्याच्या आवडत्या ‘देवा गुरुजीं’च्या घरी तो आला. देवा गुरुजी हे त्याचे विज्ञानाचे शिक्षक. आदर्श शिक्षकाचा राज्य सरकारचा पुरस्कार नुकताच त्यांना मिळाला होता. प्रचंड वाचन आणि आकलनशक्ती असलेल्या देवा गुरुजींनी, चिंटूच्या एकूण देहबोलीवरून प्रकरण ताडलं आणि त्यांनी हसत विचारलं, ‘‘काय रे चिंटू, घरात आज पुन्हा महाभारताचा एपिसोड सुरू झाला का?’’

Agriculture
संडे फार्मर : अभियंत्याने दिली शेतीला पूरक उद्योगाची जोड

हो ना गुरुजी, हे भांडण कधी थांबेल माहित नाही, चिंटू उद्वेगाने म्हणाला. मला कंटाळा आलाय या जगाचाच. टीव्ही, रेडिओ, पेपर, इंटरनेट, जिथं पाहावं तिथं भांडण. सर्व जगच भांडतंय, स्पर्धा करतंय. बघा ना, माणूस एकटं राहू पाहतोय, कुटुंब वेगळी होण्यासाठी झगडताहेत, एका आडनावाची मंडळी आमची 'पट्टी' वेगळी म्हणत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराची मतं आरक्षित करताहेत. गावकुसं तर मोडून पडली, पण काहींच्या मनात ती अजूनही घट्ट रुतून बसलीयेत. दोन गावंदेखील भांडतात. दोन जिल्ह्यांत कुरबुरी सुरू आहेत. दोन राज्यांच्या हद्दीच्या वादाने तर हद्द ओलांडल्याची उदाहरणं ताजी आहेत. दोन देश, खंड यांचीदेखील अखंड भांडणं सुरू असल्याचा इतिहास आणि वर्तमान समोर आहेच. याव्यतिरिक्त जात, धर्म, पंथ, गोत्र, राजकीय-अराजकीय पक्ष, रंग, भाषा अशा एक ना अनेक मुद्द्यांवर आपले-परके वाटले जाऊन भांडणं अव्याहत सुरु आहेत. म्हणजे भांडण हाच निसर्गाचा नियम आहे का हो गुरुजी?

चिंटूची मनःस्थिती हेरून गुरुजी म्हणाले, की हे बघ चिंटू, प्रकृतीचा पिंड भांडण हा मुळीच नाहीये. हो, निसर्गात अस्तित्वासाठीची धडपड आहे. अन्नपाण्यासाठी स्पर्धा आहे. पण भांडण नक्की नाही. झाडं, पशुपक्षी आपल्या पुढच्या पिढ्यांना उपयोगी पडेल म्हणून अन्नाची साठेबाजी करत नाहीत. ते वर्तमानात जगतात. एकदा पोट भरल्यावर सिंहाजवळून हरणाचे पिलू बागडत गेले, तरी तो त्याच्याकडे वाकडी नजर करत नाही. माणूस मात्र आपल्या सात पिढ्यांची मक्तेदारी घेऊन निसर्गाला ओरबाडत साठेबाजी करतोय. याउलट परक्याला सांभाळून, सामावून घेणं, सहजीवनात राहणं हाच निसर्गाचा पिंड आहे.

असं, मग एखादं उदाहर सांगा की गुरुजी, चिंटूने गळ घातली. गुरुजी सांगू लागले, ‘‘हे बघ चिंटू पृथ्वीवर जीवन कसं आलं माहितीये का? ते आलं ‘गोल्डीलॉक’ परिस्थिती मुळे. गोल्डीलॉक परिस्थिती म्हणजे एखादी अभिक्रिया होण्यासाठी हवी असणारी अनुकूल परिस्थिती. त्यात द्रावक, तापमान वगैरेचा समावेश आहे. अशी गोल्डीलॉक परिस्थिती समुद्रात उपलब्ध झाली आणि पृथ्वीवरील पहिला जीव अस्तित्वात आला. पण या जलजीवाला पाणी सोडून जमिनीवर यायला करोडो वर्षे लागली. हवेत प्राणवायूची कमतरता होती. ती भरून काढली ‘सायनोबॅक्टरिया’ या जिवाणूने. ‘सायनोबॅक्टरिया’ हा प्रकाशसंस्लेषक जिवाणू आहे. तो वनस्पतींप्रमाणे सूर्यप्रकाश वापरून अन्न बनवतो आणि ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू वातावरणात सोडतो. थोडक्यात, तो प्रकाश-संश्‍लेषण अभिक्रिया धारक सजीवांचा आजोबा आहे, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे वातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढले आणि जमिनीवरील जीवनासाठी सुयोग्य वातावरण तयार झाले. स्वतः जगतांना इतरांच्या जगण्यासाठी सुयोग्य वातावरण बनवणारा सायनोबॅक्टरिया बघ!’’

‘‘तू गोत्राच्या भेदभावाबद्दल बोलत होतास; पण गोत्राचं सोड, तुला आता नत्राची गोष्ट सांगतो. नत्र पुरवठ्याचा आदिस्रोत देखील सायनोबॅक्टेरिया होता. सुरुवातीला समुद्रात नत्राचा रतीब घालणारा हा नत्रवीर जमिनीवरील वनस्पतींच्या मदतीला धावला. जमिनीवर वनस्पती आल्या खऱ्या; पण मातीत स्थिर झालेला नत्र त्यांना उपलब्ध होत नव्हता. हवेतील नत्र त्यांना खाता येत नव्हता. अशा कात्रीत सापडलेल्या वनस्पतींच्या मदतीला जिवाणू धावून आले. ॲझेटोबॅक्टरसारख्या जिवाणूंनी मुळांभोवतीच्या मातीत, गावकुसाबाहेर वस्ती केली. हवेतील नत्राचा कच्चा माल वापरून, नत्र स्थिर करायचा पिढीजात धंदा त्यांनी मुळांबाहेर थाटला. वनस्पतीने मुळातून सेंद्रिय अम्लांचा, अन्नद्र्याव्यांचा पुरवठा करायचा आणि बदल्यात जिवांणूनी हवेतील नत्र स्थिर करून पिकांना पुरवायचा असा सहजीवनाचा सहवास सुरू झाला.’’

पुढे लाखो वर्षाच्या शेजारांती त्यांना उमगले, की आपण ‘एक दुजे के लिये’च बनलेले आहोत. त्यामुळे अजून जवळ येणे आवश्यक आहे. मग रायझोबियमसारखे काही जिवाणू झाडांच्या मुळांवरील गाठीतल्या खोलीत राहायला आले. त्यामुळे जिवाणूंना अन्नाचा पुरवठा सरळ वनस्पतीच्या मुळांवरील घरात करता आला आणि जिवाणूंनी स्थिर केलेला नत्र शोषून घ्यायला झाडांना सोपं गेलं. मुळांवरील गाठीत जिवाणूला आसरा देण्याचा हा प्रकार द्विदल वनस्पतींनी केला. पण मायकोरायझासारख्या बुरश्यांनी सहजीवनाची अजून वेगळी पद्धत अवलंबली. झाडाच्या आत वास्तव्य करून त्यांनी मुळांबाहेर आपले धाग्यांचे पाइप पसरवून ठेवले. या धाग्यांना बुरशीची मुळे म्हटलं तरी चालेल. या धाग्यांद्वारे मातीतील अन्नद्रव्ये पिकाच्या आत आणण्यासाठी ही पाइपलाइन त्यांनी वापरली. ज्या वनस्पतीत मायकोरायझाचे जाळे जास्त, तिला अन्नाची उपलब्धता जास्त.

चिंटू बाळा, हे तर काहीच नाही, सहजीवनात वनस्पती त्याच्याही पुढे गेल्या. वनस्पतींच्या पेशी प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘क्लोरोप्लास्ट’ म्हणजे ‘हरितलवक’ हा वनस्पतीचा भाग नव्हताच मुळी. तो आहे सायनोबॅक्टेरिया जिवाणू. वनस्पतींनी या प्रकाशसंश्‍लेषण करणाऱ्या जिवाणूला सरळ आपल्या पेशीतच अढळपद दिलं. त्यामुळे आपल्या शरीरात स्वतःचा सोलर जनरेटर बसवून, त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू लागल्या. अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्या.

‘‘वनस्पतींसारखेच, किडे, प्राणी आणि इतर सर्व जिवांमध्ये देवासारखा सूक्ष्मजीवांचा वास आहे. त्यांच्याशिवाय जीवन अशक्य आहे. लेडीबर्ड किड्याच्या शरीरातील जिवाणू त्याचे बाळ, नर असेल की मादी ते ठरवते. यावरून किडे आणि जिवाणूंचे सहजीवन लक्षात येईल. माणसाच्या शरीरात देखील साधारणतः दोन टक्के जिवाणू आहेत. याला सोपं करायचं झाल्यास, पन्नास किलो वजनाच्या माणसाच्या अंगात एक किलो वजनाचे जिवाणू आहेत. त्यांचा समतोल आणि आपली तब्येत एकदुसऱ्याला बांधलेली आहे. जिवाणूंच्या तब्येतीत बिघाड झाला की आपल्या तब्येतीत देखील बिघाड होतो,’’ गुरुजी म्हणाले.

‘‘अंगात एवढे किडे असल्यामुळेच माणूस एवढे किडे करतो,’’ चिंटूने शाब्दिक चिमटा काढला आणि गुरुजींनी हसून त्याला दाद दिली.

ते पुढे म्हणाले, की बघ चिंटू, एवढे लांबचे जिवाणू, वनस्पती, किडे, प्राणी एक-दुसऱ्याच्या जवळ येताहेत. आसरा देतायेत, आपल्यात सामावून घेतायेत. नको असलेलं टाळून हवं तेवढं जवळ करताहेत. यापेक्षा सकारात्मक उदाहरण अजून कोणतं असू शकेल.

‘‘जिवाणू आणि वनस्पतींचं ठिकाय, पण माणसाचं काय?’’ चिंटूनं विचारलं.

‘‘माणसात देखील चांगली उदाहरणं आहेतच की. वेगवेगळ्या जातीधर्मांच्या लोकांत लग्न लागताहेत. आफ्रिकन-युरोपियन जोडप्यांचे कृष्णधवल संसार रंगताहेत. डाव्यांचे उजवे होताहेत आणि उजवे वामांगाला झुकलेत. माणूस निसर्गापासून लांब जातोय म्हणून त्याला या गतिरोधकाचे धक्के जाणवताहेत. पण त्याच्या शरीरात निसर्गाने बांधलेले पंचमहाभूते परत निसर्गात विलीन होण्याअगोदर, एक दिवस त्याला त्याची जाणीव होईल आणि नैसर्गिक जीवन हीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे, हे त्याला कळेल हे निश्‍चित.’’

‘‘पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसेल अशी अपेक्षा करूया,’’ उसासा सोडत चिंटू उद्गारला. ‘ये, जवळ ये!’ असं म्हणत दूरच्याला जवळ घेत निसर्ग पुढे जात असताना, आपल्या घरातील मोठे मात्र जवळच्याला दूर लोटत, निसर्गविरोधी का वागताहेत हा प्रश्‍न चिंटूला पडला होता. गुरुजींचा निरोप घेऊन सायकलवर टांग मारून तो घराकडे निघाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com