Diwali Festival : चला, स्वतःला उजळवूया!

गावात जवळपास सर्वांचीच परिस्थिती एकसारखी. थोडीफार पैशावाली कंपनी तेव्हाही होतीच गावात; नाही असे नाही. त्यांच्या घराला चढायचे डिस्टेंपरचे रंग. पुढच्या वर्षी आपल्याही घराला तोच रंग द्यायचा; म्हणून रडत सांगायची लहान पोरं.
Diwali Festival
Diwali FestivalAgrowon

दिवाळीपूर्वी आई घ्यायची घर आवरायला. पोपडे पडलेल्या भिंतींना ती रात्रीच्या अंधारातही करायची छान गिलावा. दिवसभर काम करून थकलेल्या तिच्या हाताचे माती घ्यायची मुके आणि तिचे हात अधिकच प्रेमळ होत बुजत राहायचे भिंतींना पडलेली भगदाडं. हळूहळू मातीच्या भिंतींना चढायचा गेरूचा रंग. आम्ही काढायचो त्यावर चुन्याने रंगीत नक्षी.

Diwali Festival
Diwali Food Kit : लाभार्थ्यांना दिवाळी किटची प्रतीक्षा

घर नवं व्हायचं दिवाळीच्या स्वागताला. अंगणात टिकावाने खोदून त्यावर पाणी ओतून घेतली जायची भुई. चोपण्यांचा येत राहायचा चपाक-चपाक आवाज. या आवाजाची लागायची गल्लीत स्पर्धा. कारण घरातील लहानमोठ्यांना हेच असायचे काम. गावात जवळपास सर्वांचीच परिस्थिती एकसारखी. थोडीफार पैशावाली कंपनी तेव्हाही होतीच गावात; नाही असे नाही.

त्यांच्या घराला चढायचे डिस्टेंपरचे रंग. पुढच्या वर्षी आपल्याही घराला तोच रंग द्यायचा; म्हणून रडत सांगायची लहान पोरं. आईवडीलही मोठ्या विश्वासाने ''हो!'' म्हणायचे खरे. पण वर्षभरात संसाराबरोबर फिके व्हायचे भिंतींचे रंग. मुलंही जायची विसरून. कुडाच्या भिंती कधीतरी मातीच्या आणि नंतर झाल्यात सिमेंटच्या. काही कुडाच्या भिंतींना आहे अजूनही प्रतीक्षा; त्यांच्या वाट्याला श्रीमंती सिमेंट येण्याची!

आजही दिवाळीच्या महिनाभर आधीच लागतात घरातील आयाबायांना घराच्या साफसफाईचे वेध. घरातल्या अडगळीच्या जागा, कानाकोपरा केला जातो रिकामा आणि काढल्या जातात जुनाट, गंजलेल्या, नकोशा असलेल्या वस्तू भंगारात नाहीतर रद्दीत. भिंतींना चढतात प्लॅस्टिक डब्यातील चमकते रंग. घर आजही सजतं दिवाळीसाठी. पणत्यांनी निघतो उजळून कानाकोपरा.

दिवाळीसारख्या सणाला घर कसं लख्ख हवं ना! घरापेक्षाही मौल्यवान काही आहे का आपल्याकडे? त्याचीही करायला हवी का साफसफाई? तिथंही लावायला हवेत का दिवे? हो तर! नक्कीच आहे. आपलं मन आणि मेंदू...! वर्षानुवर्षे किती साचवतो आपण इथे कचरा. द्वेष, मत्सर यांचे साचून आहेत कधीचे ढीग. या वस्तूंची इतकी झालीय अडगळ, की चांगल्या गोष्टींना आत शिरायला जागा नसल्याने त्या तिथूनच जातात परतून.

जळमटांनी तर व्यापून घेतलीय मनाची खोली आणि पसरलेय तिथे घाणीचे साम्राज्य. खरं तर ही साफसफाई अधिक आहे गरजेची. मन आणि मेंदूच्या तळाशी लावायला हवेत सकारात्मकतेचे, आपुलकीचे, स्नेहाचे आणि आपलेपणाचे असंख्य दिवे. नाहीतर बाहेर कितीही असला प्रकाश तरी आत नांदत राहील अंधार... आणि काळोखात नाही सापडणार आपल्याला रस्ता-‘तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा...!’ चला, स्वतःला उजळूया... एक पणती लावूया..!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com