वडाचा कोंडलेला श्‍वास...

खरं तर तो सांगत होता... ‘माझ्या सावलीत येऊन बसा. तुम्हाला आरोग्य लाभेल. सिमेंटच्या जंगलात आता म्हणे मॉलमध्ये मिळतेय वडाची फांदी.
वडाचा कोंडलेला श्‍वास...
Bunyan TreeAgrowon

‘ये बये... आता किती घट्ट बांधशील मला? जीव कोंडलाय माझा. गळ्याला फास बसलाय. सावित्रीनं बांधला म्हणून तुम्ही बांधलाच पाहिजे का? आधीच आमची प्रजाती धोक्यात आलीय आणि वरून तुम्ही दरवर्षी नित्यनेमानं हे असं आमच्या गळ्याला फास लावून निघून जातात.’ असं म्हणत वडाने त्याच्या भरभक्कम पारंबीने अक्षरशः लोळवलंच एका सुवासिनीला.

कोणी म्हटलं; साडीचा पदर अडकला असेल तर कोणी म्हटलं; पायात साडी आली असेल. सवय नाही ना राहिली आता फारशी साडीची आणि वडाची पूजा करायला जीन्स कशी घालणार? ‘फार नाही ना लागलं’ असं म्हणत एक-दोघींनी तिला उचललं आणि बाजूला नेऊन बसवलं. तिच्या हातातल्या आंब्यांमधून एव्हाना कोई बाहेर आल्या.

जमिनीवर सांडलेला रस फिदीफिदी हसू लागला. सेल्फीचा मूड गेला म्हणून त्या माउलीचा चेहराही कसनुसाच झाला. आजच्या स्टेट्सला काय ठेवायचं; या गहण प्रश्‍नानं तिला ग्रासलं असताना त्या माउलीची मैत्रीण मदतीला धावून आली आणि तिला मदत केली. काहीच क्षणात आपण पडलो होतो; हे विसरून तिने छान सेल्फी काढला आणि इंग्रजीतून तिच्या सत्यवानाचं नावही घेतलं.

वडाचा श्‍वास कोंडलेला होता म्हणून वाऱ्याने त्याला या त्रासातून सोडविण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण फारसा नाही झाला उपयोग. उलट गुंता वाढतच गेला. या प्रथा-परंपरा नीट समजावून न घेतल्याने आमचा वाढलाय तसा! संध्याकाळी वडाने मोठा सोडला सुस्कारा. खूप मोठ्याने ओरडून सांगावं सगळ्यांना, की नका हो मला असं दरवर्षी लटकवत जाऊ फासावर. पण त्यासाठी त्याचा आवाजच नाही निघाला बाहेर.

खरं तर तो सांगत होता... ‘माझ्या सावलीत येऊन बसा. तुम्हाला आरोग्य लाभेल. सिमेंटच्या जंगलात आता म्हणे मॉलमध्ये मिळतेय वडाची फांदी. त्यामुळे माझी फांदी तोडण्यापेक्षा माझी लागवड करा.’ पण आम्हाला कुठं ऐकू येतंय हल्ली कोणाचं बोलणं. जिवंत माणसांचं ऐकायला आम्हाला सवड नाही तर या झाडांचं कोण ऐकणार?

एकेकाळी रस्त्याच्या कडेला वाटसरूवर मायेची सावली धरणारी ही वडाची झाडं आमच्या सुसाट वेगाशी स्पर्धा करताना शहीद झालीत. दरम्यान, सत्यवान वाचविण्यासाठी उभारलेत सुसज्ज दवाखाने. त्यामुळे असा काही प्रश्‍न तयार झालाच तर आजची सावित्री आधी दवाखान्यातच जाईल. म्हणून आता सत्यवानाची चिंता न करता वडाची झाडं वाचविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नाहीतर एक दिवस असाही येईल, की मैदानावर मोठा स्क्रीन लावून त्यातल्या वडालाच माराव्या लागतील फेऱ्या... स्क्रीनला दोरा गुंडाळत!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com