
Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला जोराचा झटका देत कॉँग्रेसने बहुमत मिळवत विधानसभा निवडणुकीत विजय डंका वाजवला आहे. २२४ पैकी १३६ जागांवर विजय मिळवत भाजपला ६२ तर जनता दलाला २१ जागावर रोखलं आहे.
तर सीमाभागातील बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला खातं उघडता आलं नाही. त्यामुळे कॉँग्रेसचा हा मोठा विजय ठरला आहे.
१० मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान पार पडले. आज (ता.१३) सकाळीच मतमोजणी सुरूवात झाली होती.
कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या विजयाचं श्रेय जनतेला दिलं. या विजयानंतर माध्यमाशी बोलताना कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना आनंद अश्रु अनावर झाले. डी के म्हणाले, "हा विजय कॉँग्रेस टीमचा आहे. मला तुरुंगात टाकलं गेलं होतं. तेव्हा पक्ष माझ्यासोबत होता."
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा, प्रचारात स्थानिक मुद्दांवर भर आणि स्थानिक नेत्यांनी कंबर कसून केलेली पक्ष बांधणी यामुळे कॉँग्रेसला बहुमत मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपाला विधानसभेत मोठा फटका बसला आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनी जोरदार पक्ष प्रचार करूनही निवडणुकीत मोठा झटका बसला.
धार्मिक ध्रुवीकरणाच्या आणि जातीय समीकरणावर निवडणुकामध्ये विजय खेचून आणणाऱ्या भाजपाचा मोठा पराभव मानला जात आहे.
भाजपचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकाच्या विजयासाठी कामाला सुरुवात करणार आहोत, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
जनता दलाची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु अवघ्या २१ जागांवर जनता दलाला बाजी मारता आली. त्यामुळे 'किंगमेकर' ठरू शकणाऱ्या जनता दलाचाही सुफडासाफ कॉँग्रेसने केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी (ता.१३) सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देत कॉँग्रेसनं आघाडी घेतली होती. कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवून दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्यात सत्ता स्थापनेत आघाडी घेतली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.