
Nagpur Congress News : विदर्भात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणूक निकालांमध्ये (Market Committee Election Result) मतदारांनी संमिश्र कौल दिला. बहुतांश बाजार समितीमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा रोवला. झरी बाजार समितीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार आणि शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १८ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला.
कळंबमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. या ठिकाणी काँग्रेसने सर्व १८ जागा जिंकत भाजपला धोबीपछाड दिला. काँग्रेसचे प्रवीण देशमुख आणि माजी मंत्री वसंत पुरके हे दोन गट एकत्र आल्याने काँग्रेसला येथे एकतर्फी विजय मिळवता आला.
राळेगावमध्ये काँग्रेसने वर्चस्व राखले असून सत्ता काबीज केली आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, उद्धव सेना अशी लढत येथे रंगली होती. काँग्रेसने सर्वाधिक १४ जागा जिंकल्या तर भाजपला तीन तर उद्धव ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
घाटंजी बाजार समितीमध्ये चुरशीची लढत झाली. येथे पारवेकर गटाने विजयाचा झेंडा फडकविला आहे. दारव्हा बाजार समितीत शिंदे गटाने १८ पैकी १६ तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या.
बोरी अरब मध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी युती प्रभावी ठरली. येथे शिंदे गटाला दहा जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध आले होते. येथे विरोधी काँग्रेस- भाजपला पाच जागा जिंकता आल्या.
आर्णी बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) अशी युती आकाराला आली होती या युतीने बाजार समितीवर आपले वर्चस्व राखले. यामध्ये या तीनही पक्षातील नाराज कार्यकर्त्यांचा सहभाग होता अशी माहिती सूत्रांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांच्या दिग्रस मतदारसंघातील बाजार समितीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी दारव्हा येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
या निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले. १६ जागांवर शिवसेना शिंदे गटाने येथे विजय मिळवला असून महाविकास आघाडीला केवळ दोनच जागा मिळाल्या. गोंदिया जिल्ह्यात दोन बाजार समित्यांकरिता निवडणूक पार पडली. त्यामध्ये सडक अर्जुनी येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तर गोरेगाव मध्ये भाजप प्रणीत पॅनेलने आपली सत्ता राखली आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत गोरेगाव बाजार समितीचे माजी सभापती मलेशाम येरोला यांचा पराभव झाला. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा बाजार समितीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे पॅनेल विजयी झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी मध्ये भाजप, पोंभूर्णा काँग्रेस तर भद्रावतीत शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. गोंडपिंपरी येथे काँग्रेसची तर पोंभूर्णा मध्ये भाजपची सत्ता होती. यावेळी मतदारांनी दोन्ही सत्ता उलथवून लावल्या.
गोंडपिंपरी मध्ये बाजार समितीच्या स्थापनेपासून काँग्रेस सत्तेत होती. मात्र यावेळी पहिल्यांदाच भाजपने या बाजार समितीवर विजय मिळवला. पोंभूर्णा मध्ये भाजपकडे सत्ता होती यावेळी काँग्रेसने या बाजार समितीवर झेंडा फडकविला. भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे.
१८ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसने तर सात जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले. नागपूर जिल्ह्यातील मौदा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या समर्थित गटाने राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या युतीला मतदारांनी नाकारले.
काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर व उद्धव ठाकरे गटाचे देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १६ जागा जिंकत सत्ता काबीज केली. भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यश आले.
अमरावती जिल्ह्यातील सहा बाजार समितीचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये अचलपूर येथे बबलू देशमुख यांच्या पनलने गड राखला. चांदूर बाजार मध्ये बच्चू कडू यांची जादू चालली. वरुड मध्ये खासदार अनिल बोंडे, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे.
दर्यापुरात आमदार बळवंत वानखडे व सहकारी. धारणीत आमदार राजकुमार पटेल व मित्रपक्ष, धामणगाव बाजार समितीमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने दबदबा कायम राखला आहे.
....अशी आली सत्ता
एकूण बाजार समिती- १९
महाविकास आघाडी -५
काँग्रेस -५
भाजप-शिवसेना- २
अपक्ष (संमिश्र-)- ७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.