Pomegranate : डाळिंब, सीताफळ बागेमध्ये संवर्धित शेतीचे प्रयोग

राज्यामध्ये डाळिंब , सीताफळ ही महत्वाची कोरडवाहू पिके आहेत. या फळबागांच्यामध्ये देखील योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन केल्यास संवर्धित शेती शक्य आहे.यातून बागेमध्येच सेंद्रिय घटकांची उपलब्धता करता येईल. बागायतदारांनी याबाबत प्रयोग करणे आवश्यक झाले आहे.
Pomegranate
Pomegranate Agrowon

डाळिंब बागेतील तण व्यवस्थापन ः

डाळिंबाचा बहर (Pomegranate Blossom) वेगवेगळ्या हंगामात धरला जातो. छाटणीमध्ये जे घटक निघतात ते आणि तण व्यवस्थापन (Weed Management) कसे करावे यावर बागायतदारांनी चिंतन करण्याची गरज आहे. डाळिंबाच्या छाटणीनंतर (Pomegranate Harvesting) मिळणाऱ्या जैवभाराला काटे असतात. यामुळे छाटणीचा जैवभार बागेत सर्वत्र इतस्ततः पसरून टाकता येत नाही. हे काटे मऊ असतात; परंतु काटे वाळल्यानंतर इजा होऊ शकते. हे काष्ठमय पदार्थ आच्छादन म्हणून काळजीपूर्वक वापरावे लागतात. बागेत बोधाच्या एका बाजूस लहान चर काढून त्या चरात हा जैवभार टाकल्यास काट्यांचा त्रास होणार नाही. बहर हंगामाचा विचार करून बागेत एखाद्या हंगामात तणे वाढवून मारणे शक्‍य झाल्यास सेंद्रिय खताची गरज बऱ्यापैकी भागविता येते.

१) डाळिंब हे अवर्षणप्रवण भागातील महत्त्वाचे फळपीक आहे. बहुतेक शेतकरी आंतरमशागत करून बाग तणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. युक्तीने तणे वाढवून, मोठी जून करून कशी मारता येतील याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पाणी कमी असेल तर तणे मारून न टाकता ब्रश कटरने कापून टाकावीत. त्यानंतर नवीन कोवळी फूट येईल त्यातून जमिनीवर हिरवे आच्छादन होईल. हिरव्या आच्छादनाने स्वतःसाठी खेचून घेतलेले पाणी हे नेहमीच उघड्या जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे पाणी वापरात बचत होईल.

२) डाळिंबावर प्रामुख्याने तेलकट डागाचा रोग येऊन फळे मोठ्या प्रमाणावर खराब होतात. १५-२० वर्षांपूर्वी भगवा ही जात लागवडीखाली आल्यानंतर सुरुवातीला लोकांना यातून चांगला आर्थिक नफा मिळाला. त्यानंतर डाळिंब बागेखालील क्षेत्र झपाट्याने वाढले. तसे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि हे पीक बेभरवशाचे झाले. ज्या वेगाने डाळिंब बागा वाढल्या त्याच वेगाने कमी होत गेल्या. काही शेतकऱ्यांनी डाळिंबाची सेंद्रिय शेती करून पाहिली. त्यांनाही १०० टक्के रोग निवारण करता आलेले नाही. तीनही हंगामात फळे घेण्याच्या हव्यासापोटी रोग-किडी हाताबाहेर गेल्या का ? यावर अभ्यास होणे गरजेचे वाटते. एक गाव एकच हंगाम असे काही नियोजन करून रोगनियंत्रण करणे शक्‍य आहे का ? याचाही शेतकऱ्यांनी अभ्यास करावा, असे माझे मत आहे.

Pomegranate
Pomegranate : हस्त बहराच्या डाळिंब बागेचे व्यवस्थापन

सीताफळातील संवर्धित शेतीचे प्रयोग ः

राज्यामध्ये गेल्या १० ते १५ वर्षांत सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी ओढ्याकाठच्या पडीक पट्ट्यात हे पीक आपोआप वाढत असे. या झाडांची फळे देखील दर्जेदारअसायची. बऱ्याच वर्षांपासून पुरंदर (जि.पुणे) तालुक्‍यात सीताफळाची व्यापारी तत्त्वावर लागवड आहे. या फळपिकाची पाण्याची गरज कमी आहे. यामुळे अवर्षण प्रवण भागातील हे फळपीक आहे. अलीकडे बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, बीड जिल्ह्यांत सीताफळ एक महत्त्वाचे फळपीक झाले आहे. पुरंदरमध्ये उन्हाळ्यात बहर धरला जातो. पावसाळ्यात याची फळे बाजारात येतात. विदर्भ, मराठवाड्यात पाऊस पडून पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर बहर धरला जातो. पावसाळ्यापूर्वी बागेची छाटणी केली जाते. बागेत सेंद्रिय खत देऊन दोन ओळींत मशागत केली जाते. अशा वेळी बाग तणमुक्त असली पाहिजे अशी पक्की समजूत शेतकऱ्यांमध्ये आहे. पावसाळा अखेरपर्यंत कीडनाशक फवारणीचे काम करावे लागते. विदर्भातील हंगाम ऑक्‍टोबर - नोव्हेंबरअखेर संपतो. जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत ओलीत केले जाते. त्यानंतर बागेला विश्रांती दिली जाते.

पावसाळ्यात बागेतील कामकाज चालू असल्याने या काळात तणे वाढविण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे; परंतु तणापासून खत करण्यासाठी हाच काळ जास्त अनुकूल असतो. बहर संपल्यानंतर जे थोडा काळ पाणी दिले जाते, त्या काळात तणे वाढवावीत आणि पुढे सोडून द्यावीत असा शेतकऱ्यांत मतप्रवाह आहे. छाटणीमुळे तयार झालेले घटक जागेला कसे कुजविता येतील, यावर अनेक शेतकरी फळबागेत अभ्यास करीत आहेत. छाटणीमुळे काष्ठमय घटक भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. हे घटक बोधात आच्छादन स्वरूपात कुजवावेत. यासाठी बोधात कायमस्वरूपी चर ठेवावा. त्यात छाटणीनंतरचे काष्ठमय घटक भरून त्यावर थोडी माती ढकलावी. पुढील वर्षी त्यावर पुन्हा छाटणीचे ताजे घटक टाकता येतो. चरामध्ये हे छाटणीचे घटक टाकल्याने बागेत काम करण्यास अडथळा होत नाही.

पावसाळ्यात संपूर्ण बागेत तणे वाढविण्यापेक्षा पट्टे वाढवावेत. दरवर्षी पट्ट्याच्या जागा बदलाव्यात. तणे जास्त मोठी झाल्यास ब्रश कटरने कापावीत. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास तणनाशकाने मारण्याऐवजी हिरवे आच्छादन राखावे. यामुळे पाण्यात बचत होईल. जमिनीचे तापमान योग्य राखले जाईल. या काळात पर्यायी खाद्य उपलब्ध झाल्याने मिलिबगचा त्रास तणामुळे कमी होतो, असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अशा सेंद्रिय खत व्यवस्थापनामुळे फळ उत्पादनाची प्रत चांगली वाढते, असाही अनुभव शेतकरी सांगतात.

माझ्या शेतीमध्ये सीताफळ लागवड नाही. परंतू राज्यातील प्रयोगशील सीताफळ उत्पादकांशी होत असलेली चर्चा आणि अभ्यासातून मी हे प्रायोगिक मत मांडले आहे. सीताफळ उत्पादकांनी आपापल्या गरजेप्रमाणे या पद्धतीच्या प्रयोगामध्ये योग्य सुधारणा कराव्यात.

लांब अंतरावरील फळबागेत आंतर(मिश्र) पिके ः

फळबागेत सुरुवातीच्या काळात तसेच तूर, कपाशीसारख्या लांब अंतरावरील पिकात अल्प मुदतीचे मिश्रपीक घेण्याची प्रथा आहे. यात सोयाबीन, उडीद, मूग यासारखी कडधान्यवर्गीय पिके घेतली जातात. या ठिकाणी कडधान्याची पिके घेण्यापेक्षा जमिनीसाठी सेंद्रिय खत देणारी फेरपालटाची पिके घ्यावीत. या सर्वांपेक्षा तणे वाढवून योग्य वेळी शिफारशीत तणनाशकाने मारून त्यापासून जमिनीला सेंद्रिय खत मिळवून द्यावे. या संदर्भात लेखमालेत यापूर्वीच्या भागांमध्ये सविस्तर चर्चा केली आहे.

लांब अंतरावरील फळबागेत आंतर(मिश्र) पिके ः

फळबागेत सुरुवातीच्या काळात तसेच तूर, कपाशीसारख्या लांब अंतरावरील पिकात अल्प मुदतीचे मिश्रपीक घेण्याची प्रथा आहे. यात सोयाबीन, उडीद, मूग यासारखी कडधान्यवर्गीय पिके घेतली जातात. या ठिकाणी कडधान्याची पिके घेण्यापेक्षा जमिनीसाठी सेंद्रिय खत देणारी फेरपालटाची पिके घ्यावीत. या सर्वांपेक्षा तणे वाढवून योग्य वेळी शिफारशीत तणनाशकाने मारून त्यापासून जमिनीला सेंद्रिय खत मिळवून द्यावे. या संदर्भात लेखमालेत यापूर्वीच्या भागांमध्ये सविस्तर चर्चा केली आहे.

रब्बी ज्वारीसाठी संवर्धित शेतीचे तंत्र ः

सोलापूर, उस्मानाबाद, बीड आदी पट्ट्यात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणावर घेतली जात असे. मागील १५ ते २० वर्षांत येथे सिंचनाच्या सोयी झाल्याने रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात भरपूर कपात झाली. या भागात पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस हमखास पडत नाही. यामुळे या हंगामात फारसे पीक घेतले जात नाही; परंतु सतत कुळवाच्या पाळ्या मारून जमीन स्वच्छ ठेवली जाते. ४० गुंठ्यासाठी ५ ते ६ कुळवाच्या पाळ्या माराव्या लागतात. यासाठी शेतकऱ्यांना प्रति ४० गुंठ्यासाठी सरासरी आठ हजार रुपये खर्च होतो. अशीच एखादी पाळी मारल्यानंतर मोठा पाऊस झाल्यास जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन नुकसान होते. धूप होऊन नुकसान होऊ शकते, याची शेतकऱ्यांना कल्पना असते; परंतु पाळी न मारल्यास शेतात तण माजते आणि पुढील पेरणी धोक्‍यात येते. यामुळे पाठोपाठ पाळ्या मारून जमीन स्वच्छ ठेवण्याची परंपरा आहे.

१) तण नियंत्रणात आणण्यासाठी एकेकाळी ५ ते ६ पाळ्या मारणे गरजेचे होते. आज बाजारात तणनाशके उपलब्ध आहेत. यामुळे पाळ्या मारण्याची गरज नाही. पावसाळ्यात जमीन पड टाकावी. तणांना मुक्त वाढू द्यावे. रब्बी ज्वारी पेरण्याच्या अगोदर ४० ते ४५ दिवस अगोदर शिफारशीत तणनाशकाची फवारणी करावी. पहिल्या फवाऱ्यात बऱ्यापैकी तण नियंत्रणात येईल. त्यानंतर १५ दिवसांनी चुकलेले, नवीन उगविलेले शिल्लक तण नियंत्रणासाठी परत एकदा तणनाशक फवारून घ्यावे. पेरणीपर्यंत जमीन कोणतीही पूर्वमशागत न करता स्वच्छ होऊन मिळेल. ही जमीन पूर्वमशागत केलेली नसल्याने त्यात पेरणी यंत्र चालणार नाही अशी सर्वसामान्यांची (गैर)समजूत होते; परंतु आमचा अनुभव असा आहे, की वखर पाळ्या मारलेल्या जमिनीपेक्षा या जमिनीत पेरणी जास्त चांगली होते.

२) तणे जागेला कुजून जमिनीत मिसळतात. यामुळे जमिनीला उत्तम दर्जाच्या सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा होतो. ज्वारीच्या क्षेत्रात जमीनधारणा मोठी असल्याने जमिनीला सेंद्रिय खत वापरले जात नाही. सेंद्रिय कर्ब मिळाल्याने आणि तो जागेला सेंद्रिय पदार्थ कुजून तयार झाल्यामुळे जमिनीची सुपिकता चांगली वाढते. महत्वाचे म्हणजे कुळवाच्या पाळ्या मारून स्वच्छ ठेवलेल्या जमिनीपेक्षा जास्त उत्पादन मिळते. उत्तम दर्जाचे मिळते.

३) सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन अगदी फुकटात होते. ज्वारी काढणीनंतर कडबा उपटून न घेता कापून घ्यावा. ज्वारीचे धाट २२५ ते २५० सें.मी. लांब असते. कणीस काढून घेतल्यानंतर जमिनीवरून कडबा कापून तो वैरण म्हणून वापरावा.

४) २२५ सें.मी. उंचीच्या कडब्याच्या धाटापेक्षा बुडखा आणि जमिनीत पसरलेले मुळांचे जाळे याचे खत जास्त चांगले आणि भरपूर मिळते. वैरण झाकण्यासाठी साधने उपलब्ध नव्हती त्या वेळी मुळांसकट कडबा उपटणे भाग होते. आता प्लास्टिक कागदाने कडब्याची गंजी झाकली जाते. यामुळे पावसाने कडबा खराब होत नाही.

५) ज्वारी ४५ सें.मी. अंतरावर न पेरता जमीन चांगली असेल तर ६० सें.मी. ओळीत अंतर ठेवून पेरावी. यामुळे उत्पादनवाढीला फायदा होतो. असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

---------------------------------

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

( लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com