दक्षिण महाराष्ट्रात संततधार पाऊस

ऊस, द्राक्ष पिकांना उपयुक्त ः उन्हाळी सोयाबीनची काढणी लांबणीवर पडणार
दक्षिण महाराष्ट्रात संततधार पाऊस

सांगली, कोल्हापूर ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत गुरुवारी (ता. १९) सायंकाळपासून मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain) हजेरी लावली. अनेक भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. रात्रभर संततधार पाऊस सुरू असल्याने द्राक्ष पिकासह (Grape) ऊस पिकाला पोषक ठरणार आहे; मात्र उन्हाळ सोयाबीनची काढणी (Soybean Harvesting) लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठे महांकाळ, जत तालुक्यांसह इतर तालुक्यांत देखील पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीला उपयुक्त ठरणार आहे. शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी झाली असून, हा पाऊस पिकासाठी पोषक असून राहिलेली पेरणी लांबणीवर पडणार आहे. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे वीज पडून २७ मेंढ्या ठार झाल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वदूर पाऊस पडल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे शेतकरी आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी आणि टोकणीचे नियोजन करण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी वादळी वारेदेखील होते. शुक्रवारी (ता. २०) सकाळपासून अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला; मात्र दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला असून दिवसभर संततधार सुरू होती.

सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांत उन्हाळ सोयाबीनची पेरणी झाली. सध्या अनेक भागांत उन्हाळ सोयाबीन काढणीला आहे. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीनचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून, काढणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शेत मशागतीला वेग, उन्हाळ भात कापणी, सूर्यफूल काढणीत व्यत्यय येणार आहे.

कोल्हापूरमधील कृषी प्रदर्शन पावसामुळे रद्द

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे शुक्रवारपासून कृषी प्रदर्शन सुरू होणार होते. यामध्ये ३०० हून अधिक स्टॉल येणार होते; मात्र गुरुवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शाहू मिल येथील कृषी प्रदर्शन रद्द केले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

....

जत तालुक्यात धुवाधार पाऊस

दुष्काळी पट्टा अशी ओळख असलेल्या जत तालुक्यात गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जत तालुक्यातील वळसंग ते सोरडी या रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे. अनेक ठिकाणी शेतातील बांध फुटले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com