Sugarcane Crop Disease Control : उन्हाळी हंगामात ऊस पिकावरील रोगांचे नियंत्रण कसे करणार?

ऊस लागवड आणि साखर उत्पादन यामध्ये महाराष्ट्र देशात नेहमीच आघाडीवर असतो. राज्यात प्रति हेक्टरी सरासरी ऊस उत्पादकता ही तितकी समाधानकारक नाही.
Sugarcane Crop Disease
Sugarcane Crop DiseaseAgrowon

डॉ. गणेश कोटगिरे, भरत पवार

Sugarcane Cultivation : ऊस लागवड आणि साखर उत्पादन यामध्ये महाराष्ट्र देशात नेहमीच आघाडीवर असतो. राज्यात प्रति हेक्टरी सरासरी ऊस उत्पादकता ही तितकी समाधानकारक नाही.

ऊस अथवा साखरेचे हेक्टरी उत्पादन घटण्याची अनेक कारणे असून, त्यापैकी रोगांचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. उन्हाळी हंगामामध्ये ऊस पिकावर येणारे रोग व त्यांच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना यांचा माहिती घेऊ.

गेल्या काही काळापासून ऊस पिकांवर आढळणाऱ्या रोगांची संख्या आणि प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.

त्यामागे एकाच भागात वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, ऊस बेण्याची कमतरता, अशुद्ध व निकृष्ट बेण्याचा वापर, शिफारशीत नसलेल्या ऊस जातींची लागवड, ऊस बेण्यांची अनिर्बंध ने-आण, समस्यायुक्त जमिनी, सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा असंतुलित व अवेळी वापर, अपुरी पूर्व व आंतरमशागत, किडींचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव, पाण्याचा ताण किंवा अतिपाण्याचा वापर, अतिवृष्टी व पूर परिस्थिती, रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांची उदासीनता, हवामानातील बदल अशी अनेक कारणे दिसून येतात.

यामुळे रोगाच्या वाढीस व प्रसारास पोषक वातावरण होते. ऊस पिकात बुरशी, सूक्ष्मजंतू, विषाणू, फायटोप्लाझ्मा, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, परोपजीवी वनस्पती आणि हवामानातील बदल यामुळे रोग तसेच विकृती तयार होतात. हंगामनिहाय ऊस पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रमाणही कमी अधिक असतो.

Sugarcane Crop Disease
Sugarcane Crushing : ‘क्रांती अग्रणी’ १२ लाख टन ऊसगाळप करणार

उन्हाळी हंगामातील रोग

महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात ऊस पिकास पडणारा ताण ही नेहमीची बाब आहे. उन्हाळ्यात पाण्याचा ताण, हवेचे वाढलेले तापमान, गरम हवा यामुळे पिकाच्या शारीरिक क्रिया मंदावतात. पेशींची वाढ कमी होते. पानांतील हरितद्रव्ये कमी होतात. अन्न तयार होण्याचा व वहनाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. पिकाच्या मुळांना इजा होते.

या कारणांमुळे पीक अशक्त होऊन त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. परिणामी, पीक अनेक रोगांस बळी पडते. तसेच रोगाची तीव्रता देखील वाढते.

उन्हाळ्यात ऊस पिकांवर चाबूक काणी, गवताळ वाढ, मर, रेड रॉट (ऊस रंगणे), मोझॅक, यलो लीफ सिंड्रोम किंवा यलो लीफ डिसीज, लीफ स्काल्ड (पांगशा फुटणे), रटून स्टंटिंग (वाढ खुंटणे) हे प्रमुख रोग आढळतात.

उन्हाळ्यात लागवड झालेले ऊस पीक ताणग्रस्त राहिल्यास पुढे पावसाळा हंगामात या पिकात पोक्का बोंग आणि तांबेरा रोग वाढल्याचे आढळून आलेले आहे.

१. चाबूक काणी किंवा काजळी

रोगकारक बुरशी : स्पोरिसोरियम सिटॅमिनी

महाराष्ट्रात ऊस पिकावर हा रोग सर्वत्र आढळतो. राज्यात लागवडीखाली असणाऱ्या सर्वच जाती या रोगास कमी-अधिक प्रमाणात बळी पडतात. पीकवाढीच्या सर्व अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

लागवड पिकापेक्षा खोडवा पिकात काणी रोगाचे प्रमाण जास्त आढळते, कारण लागवड पिकातील रोगग्रस्त बेटे काढली जात नाहीत. खोडवा पिकाचा सुरुवातीचा काळ उन्हाळ्यात राहतो. या काळात हवेतील व जमिनीचे तापमान वाढून रोगास पोषक वातावरण तयार होते. या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव जास्त होतो. खानदेश आणि मराठवाडा भागात रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे.

लक्षणे

काणी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला व शेंड्याकडे निमुळता होत गेलेला पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो, तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू.

रोगामुळे उसाची पाने अरुंद व आखूड राहतात. अशा बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात. कधी कधी खोडवा पिकात रोगग्रस्त बेटात जास्त प्रमाणात फुटवेदेखील आढळतात. उभ्या उसात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कांड्यावरील डोळ्यातून काणीयुक्त पांगशा फुटतात.

रोगग्रस्त बेटे कालांतराने वाळून जातात. त्यामुळे उसाचे उत्पादन व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो. काणी रोगामुळे लागवडीच्या व खोडवा ऊस पिकाचे उत्पादन अनुक्रमे २९ ते ७० टक्क्यांपर्यंत घटल्याची नोंद आहे. साखर उतारादेखील ४ युनिटपर्यंत घटतो. रसाची शुद्धता घटते.

प्रसार : हा रोग मुख्यत्वे प्रादुर्भावग्रस्त बेण्यामार्फत तसेच वारा, पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत पसरतो.

नियंत्रण :

-बेणे मळ्यातील बेणे लागवडीसाठी निवडावे.

-मूलभूत बेणे तयार करण्यासाठी ऊस बेण्यास लागवडीपूर्वी बाष्प उष्ण हवा प्रक्रिया संयंत्राद्वारे ५४ अंश सेल्सिअस तापमानास १५० मिनिटे प्रक्रिया करावी. त्यानंतर बेण्यास कार्बेन्डाझिम बुरशीनाशकाची (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात) प्रक्रिया करावी.

-मूलभूत बियाणे तयार करण्यासाठी उतिसंवर्धित रोपांचा पर्याय निवडावा.

-मध्यम रोगप्रतिकारक जातींची उदा. कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ४३४, कोएम ०२६५, कोव्हीएसआय ०३१०२, को १५०१२ लागवड करावी.

- नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगग्रस्त बेटे मुळासहित काढून शेताबाहेर जाळून नष्ट करावीत. काणीचे फोकारे बाहेर पडण्यापूर्वी बेटांचे निर्मूलन झाले तर रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते. याकरिता, प्रथम काणीयुक्त फोकारे प्लॅस्टीकच्या पोत्यात किंवा पिशवीत काढून घ्यावीत. नंतर बेटे काढावीत.

-साखर कारखान्याच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीने काणीग्रस्त बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावी करता येईल.

-खोडवा पिकाचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने करावे.

- उन्हाळ्यात ऊस पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

२. गवताळ वाढ

रोगकारक घटक : फायटोप्लाझ्मा

प्रसार - गवताळ वाढीसाठी कारणीभूत फायटोप्लाझ्मा हा बेण्याद्वारे व किडीद्वारे (मावा आणि तुडतुडे) पसरतो.

संवेदनशील वाण - को ४१९, कोएम ०२६५, कोसी ६७१, को ८६०३२ व व्हीएसआय ४३४ या जातीत या रोगाचे प्रमाण जास्त आढळते. महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण सरासरी १० टक्क्यांपर्यंत आहे. ते वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Sugarcane Crop Disease
Sugarcane Management : ऊस शेतीचे अभ्यासपूर्ण पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे

लक्षणे -

गवती वाढ रोगामुळे पिकाच्या सुरुवातीच्या काळात ऊस बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसतात. बेटास गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते. बेटांत फुटव्यांची संख्या कधी-कधी १०० पेक्षा जास्त आढळते. रोगामुळे उसाच्या पानांमध्ये हरितद्रव्य कमी प्रमाणात तयार होत असल्याने पाने पिवळी किंवा पांढरी पडतात.

रोगग्रस्त बेटात गाळण्यालायक ऊस तयार होत नाहीत. रोगग्रस्त उसावरील पाने अरुंद व आखूड होतात. पूर्ण वाढ झालेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्यातील पाने पिवळी पडतात. त्याच्या कांड्यावरील डोळ्यातून पिवळसर (केवड्यासारख्या) पांगशा फुटतात. रोगग्रस्त ऊस नंतर पोकळ पडतो व वाळतो.

गवताळ वाढ रोगामुळे ५ ते २० टक्क्यांपर्यंत ऊस उत्पादनात घट येते. खोडवा पिकात रोगामुळे बेटे जास्त प्रमाणात पिवळी पडतात व मरतात. खोडवा पिकात रोगाचे प्रमाणदेखील सुरुवातीच्या काळात जास्त आढळते. रोगग्रस्त खोडवा पिकातील उसांची संख्या कमी झाल्याने उत्पादनात घट येते.

नियंत्रण :

- बेणेमळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी निवडावे.

-बेणेमळ्यासाठी मूलभूत बेणे तयार करण्यासाठी लागवडीपूर्वी बेण्यास बाष्प उष्ण हवा प्रक्रिया ५४ अंश सेल्सिअस तापमानास १.५ तास मिनिटे करावी किंवा उती संवर्धित रोपांचा वापर करावा.

-बेण्यास कार्बेन्डाझिम बुरशीनाशकाची ०.१ टक्का (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या द्रावणात बेणे १५ मिनिटे बुडवून ठेवून नंतर लागवड करावी.

-उसाची उगवण झाल्यानंतर नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगग्रस्त बेटे काढावीत. ती त्वरित जाळून नष्ट करावीत. शक्यतो हा बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम सामूहिक पद्धतीने राबविल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करता येईल.

- उसावरील रसशोषक किडींचा बंदोबस्त वेळीच करावा. त्यासाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

त्यामुळे रोगाचा प्रसार टाळता येईल.

-रोगाचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्या पिकाचा खोडवा घेऊ नये. पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे रोगाचे प्रमाण पुढील पिकात कमी राहील.

संपर्क - डॉ. गणेश कोटगिरे, ८७८८१५३३३२, भरत पवार, ९८९०४२२२७५

संपर्क - ०२०-२६०९०२२६८ - (ऊस रोगशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com