Valentine's Day Special : कापूसच आमचं व्हॅलेंटाइन...

पोटच्या लेकरापेक्षाही कापूस पिकास शेतकरी जीव लावतात. कारण लेकराला शाळेसाठी वेळेवर फीस व कपडे देणं होत नाही.
cotton
cottonAgrowon

Cotton, Valentine Day : शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांत कापसाची (Cotton Market) देश-विदेशात चालू असलेली चर्चा उपलब्ध साठा, वापर आणि एकूण उत्पादन (Cotton Production) यावरच आहे. पण खरं तर या पांढऱ्या सोन्यावर कोरडवाहू (Dryland Agriculture) पट्ट्यातील खास करून मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचं बरंच काही अवलंबून आहे.

त्याचे कारणही तसेच आहे, कापसासारखं (Cotton Crop) दुसरं महत्त्वाचं आणि भरवशाचं दुसरं कोणतंच पीक इथल्या शेतकऱ्यांसाठी नाही.

तीन वर्षांपूर्वीचा दुष्काळ व त्यानंतर सतत पडणारा अधिकचा पाऊस या कालावधीत दुसरी कुठलीच पिकं हवी तशी तग धरू शकली नाही, जशी कापूस पिकात पाहायला मिळाली.

अजून एक महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचे व यावर्षीचे बाजारभाव यामुळे पांढऱ्या सोन्याची लोकप्रियता अजून जास्तच वाढून गेली आहे. कापूस पीक अत्यंत खर्चीक आहे पण कोरडवाहू भागात या पिकाला पर्याय म्हणून अजून तरी दुसरं पीक उपलब्ध नाही.

बरेच शेतकरी कपाशीला पर्यायी पीक म्हणून सोयाबीनला पसंती देतात. मात्र, सोयाबीनला अजून तरी नगदी पीक म्हणणे आम्हा शेतकऱ्यांना कठीणच जातेय. खरिपातील इतर पिकांत १०० टक्के जोखीम आहे जसे की मूग, उडीद, सोयाबीन, तीळ, तूर आदी.

cotton
Cotton Export : कापूस निर्यात सुरळीत; सुतगिरण्याही फायद्यात

या सर्व पिकांत १०० टक्के नुकसान होऊन शेतकऱ्यांचं कमी पावसाने किंवा काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने नुकसान होऊ शकते. डोळ्याने १०० टक्के दिसणारे उत्पन्न क्षणार्धात कधी शून्य होईल, हे सांगताच येत नाही. त्यामुळेच मूग, उडीद, बाजरी पिकांच्या क्षेत्रात घट होत आहे.

कापूस पिकावरती निम्म्या महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांचं, कृषी क्षेत्रातील खासगी नोकरदारांचं, कृषी निविष्ठा तयार करणाऱ्या कंपन्यांचं आणि दुकानदारांचं सगळं अर्थकारण अवलंबून आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पोटच्या लेकरापेक्षाही कापूस पिकास शेतकरी जीव लावतात. कारण लेकराला शाळेसाठी वेळेवर फीस व कपडे देणं होत नाही. परंतु कापूस पिकास वेळेवर फवारणी, खत नियोजन करणे, आंतरमशागत आदी कामे मात्र वेळेच्यावेळी करावे लागतात. अन्यथा कापसाच्या उत्पादनात मोठी घट पाहण्यास मिळते.

गुलाबी बोंड अळीमुळे कापूस पिकाचे जास्त नुकसान होताना दिसत असताना सुद्धा शेतकरीवर्ग इतर पिकांकडे वळलेले नाहीत. कारण कापसाचे पैसे शेतकऱ्यांच्या दृष्टीने एकरकमी (एकठोक) हातात येतात.

त्या पैशातून शेतातील पाइपलाइन, विहीर, सावकारी आणि उधारीवर घेतलेले खते, कीडनाशकांचे पैसे सुद्धा चुकवली जातात. गावोगावी कापूस पिकात लागवडीपासून वेचणीपर्यंत तयार झालेले रोजगार इतर पिकात पाहण्यास मिळत नाही.

बऱ्याच कापूस पट्ट्यात शाळकरी मुलांपासून ते वयस्कर माणसं सुद्धा कापूस वेचण्यासाठी उत्सुक असतात. लहान मुलांत ही उत्सुकता जास्त प्रमाणात दिवाळीत पाहण्यास मिळते. त्याचे कारण असे की त्या पैशातून स्वतः साठी कपडे घेण्यासाठी मुलांची धडपड असते.

दिवाळीत आपल्या शेतकरी बापांचे असलेले हलाखीचे दिवस पाहून नवीन कपडे असो वा इतर खर्च मुलं जास्त अट्टहास करीत नाहीत. म्हणूनच कापूसच आमचं व्हॅलेंटाइन!

सचिन आढे, कापूस उत्पादक शेतकरी, जालना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com