
डॉ. कैलास दौंड
माणसांचे जगणे कित्येक युगांपासून शेतीनिष्ठ राहिले आहे. या शेतीनिष्ठ जगण्यामध्ये वेळोवेळी सहजपणे अनेक बदल झालेले आहेत.
सुरुवातीला केवळ अन्नधान्ये आणि कडधान्ये यांचेच उत्पादन घेणारा शेतकरी नगदी पीक म्हणून तेलबियांच्या उत्पादनाकडे (Oilseed Production) आणि त्यानंतर ऊसपिकाकडे (Sugarcane crop) वळला. त्यातून त्याला बऱ्यापैकी आर्थिक बळ मिळू लागले.
काही शेतकऱ्यांनी फळबागा (Orchard Plantation) फुलवल्या. बागायती शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी (Dryland Farmer) यांच्यातील दरी कमी करण्यासाठी किंवा किमान आर्थिक गरजा भागवता याव्यात म्हणून कोरडवाहू शेतकरीही नगदी पिकाच्या (Cash Crop) शोधात राहिले आहेत.
कोरडवाहूचे प्रश्न आणि बागायतीचे प्रश्न वेगवेगळे आणि भिन्न तीव्रतेचे असले तरी या प्रश्नाचे मूळ एकच आहे ते म्हणजे आर्थिक.
करडी, जवस, तीळ, कारळे, सूर्यफूल अशा तेलबियांची पिके आणि कपाशीचे पीक तो घेऊ लागला. आता तर केवळ कुटुंबाला खायला पुरेल एवढे अन्नधान्य पिकवून उर्वरित शेतीत कापूस लावण्याचा बहुसंख्य शेतकऱ्यांत प्रघात पडला आहे.
त्यामुळे त्याच्या हाती थोडा पैसाही येऊ लागला. सुधारित बियाणे आल्यानेही शेती फायद्याची ठरली.
विदर्भ, मराठवाडा आणि आता नगरमार्गे पश्चिम महाराष्ट्रात हे कापूसपिकाचे लोण पोहोचत आहे. कापूस पिकाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या.
त्यामुळे सहाजिकच ऊस पिकाशी त्याची तुलना करण्याचा मोह कोरडवाहू भागातील लोकांना होऊ लागला. कापसाचे भरात आलेले पीक आशा पल्लवित करू लागले. जात्यावरील लोकगीतात अशा काही ओव्या दिसतात.
‘काय करीती बाई बड्या उसाच्या थळाला
बाई पिकली कपाशी मागं टाकीती गुळाला.’
तसे पाहिले तर कापसाचे पीकही खर्चिक झाले आहे. कीड पडू लागली की फवारणीला उशीर करून चालत नाही. उगवण झाल्यानंतर खतांच्या काही मात्रा द्याव्या लागतात.
बीटी बियाण्यांची उत्पादकता घटत आहे. कापूस फुटल्यावर त्याची वेचणी करावी लागते. वेचणीसाठीही पाच ते दहा रुपये किलो अशी मजुरी द्यावी लागते.
शिवाय ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी, निंदणी याचाही खर्च वाढतोच. मात्र तरीही आर्थिक आधारासाठी याच पिकाचा आधार वाटतो. विदर्भात तर सीतादही नावाने कापूस वेचणीचा शुभारंभ करतात.
कापूस शेतात असतानाच सुंदर दिसतो आणि असतोही. तो बाजारात नेताना आणि नेल्यावर अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. कापसाच्या या प्रश्नांना भिडणारी कापूसकाळ कादंबरी येऊनही जवळपास पंधरा वर्ष होत आहेत.
तरीही परिस्थिती बदलली आहे असे नाही उलट त्याची तीव्रता वाढली आहे. कापूस एकाधिकार खरेदी योजनेत शेतकऱ्यांना काही वेळा खूप दिवस ताटकळत बसावे लागायचे.
आता इतर व्यापारी ही कापूस खरेदीसाठी गावोगाव फिरत आहेत तर काही लोक जिनिंगसाठी कापूस घालत आहेत. मात्र कापसाचा शेतकऱ्याला परवडतो असा मोबदला मिळेलच याची खात्री नाही.
पूर्वी देखील कापूस विकल्यानंतर अडत्याकडून पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला अनेक हेलपाटे मारावे लागत असत, असे एका लोकगीतातून सूचित होते या गीतातील स्त्री म्हणते.
‘बाई कापसाचा भाव माझ्या मालनीला पुसा
बाईचा गं बाळराजा, आडत्या जातू आठा दिसा.’
पीक कपाशीचे असो की कोणतेही जो शेतकरी सजग राहून योग्य त्या वाणाची निवड करील, वेळेवर निंदणी खत आणि देखभाल करील त्याचे पीक चांगले येते.
जागरूक शेतकऱ्यांना व्यवस्थित भावही मिळू शकतो; मात्र त्यासाठी आपले पीक उत्तम असावे आणि बाजार प्रक्रियेचा थोडाफार अनुभवातून आणि विवेक बुद्धीतून आदमास असावा लागतो.
शेतकऱ्याला त्याच्या प्रत्येक नियोजनात, त्याच्या प्रत्येक कामाच्या धावपळीत मदत करणारी त्याची अर्धांगी असते. जेव्हा शेतात पीक चांगले आलेले असते आणि कापसाच्या वेचणीचा हंगाम सुरू झालेला असतो.
तेव्हा कापूस वेचता वेचता त्या घरधनीनीचे संपूर्ण शिवार वाटांवर देखील लक्ष असते. अशाच एका वाटेने आलेल्या माणसाच्या चालण्यावरून त्या स्त्रीला खात्री पटते की तो दुरून येणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आपला भाऊच आहे आणि याचा तिला आनंद होतो.
हीच भावना स्त्री गीतातून व्यक्त होते ती अशी-
‘बाई कापूस येचिते हाती पळ्हाटी धरूनी
बाई बंधवाची मह्या, चाल ओळखीते दुरुनी’
अशाप्रकारे शेती कामे करता करता आणि नातेसंबंध जपता जपता कळत नकळतपणे अनुभवांची सुद्धा देवाण-घेवाण होत असते. ती देवाण-घेवाण जीवनाला आणि शेतीला पुढे नेण्यासाठी उपयुक्त असते एवढेच!
(लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.