Animal Farming : गायीचे गाव सार्सी झाले विकासकामांत उपक्रमशील

सार्सी (जि. अमरावती) या गावात गायीचे मोठे महत्त्व असून, घरटी गोपालन होते. गावात गायीचे समाधी मंदिरही आहे. सोबतच म्हशींच्या संगोपनातूनही गावातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला मोठी चालना दिली आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

Amravati Rural Story : अमरावती जिल्ह्यात सार्सी (ता. तिवसा) नावाचे गाव गायी, म्हशी व दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. साधारण १८०० च्या शतकात सार्सी (ता. तिवसा, जि. अमरावती) गावात साथीच्या रोगाचा प्रसार झाला होता. गावात एक गाय होती. ती बेलाच्या झाडाखाली सातत्याने बसायची.

तिच्या अंगावर बेलपत्रे पडायची. तिच्यामुळे रोगाचे निवारण झाले अशी आख्यायिका सांगितले जाते. याच श्रद्धेतून गाईचे समाधी मंदिर बांधण्यात आले. त्यातूनच पुढे गावाला सार्सी (गाईचे) अशी ओळख मिळाली. मंदिर संस्थानतर्फे जानेवारीत पौष पौर्णिमेला यात्रेचे आयोजन होते.

वीस हजारांहून अधिक भाविक त्या वेळी उपस्थित असतात. संस्थेची १५ एकर जमीन आहे. या मंदिराला शासनाने क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. गावात आख्यायिकेतील वंशावळीतील गायीला थेट घरातील गादीवर बसण्याचा मान आहे.

गावात घरटी गाय

सार्सी गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार ४५ आहे. गावात आजच्या घडीला तीन हजारांवर जनावरे आहेत. गायींबरोबर म्हशी व शेळ्यांचेही संगोपन होते.

पंचायत समिती तिवसा येथील गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव म्हणाले, की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून २५ गोठे तयार झाले आहेत. सहा जनावरांच्या क्षमतेसाठी ७१ हजार १६८ रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. पशुपालकांनी स्वतःकडील रकमेचा वापर करून चांगले गोठे उभारले आहेत. शेळी संगोपनासाठी दोन शेड्‌स आहेत.

खासगी कृष्णार्पण तसेच मदर डेअरीचे केंद्र आहे. या माध्यमातून दिवसाला ११०० लिटर दूध संकलन होते. प्रक्रियाजन्य पदार्थही तयार करून तिवसा, नेर, तळेगाव या गावांमध्ये विक्री होते. संकलित शेणाचा वापर शेतीत होतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत झाली आहे.

Rural Development
Cow Conservation : गोवंश संवर्धन करणे काळाजी गरज

गावची शेती पद्धती

गावातील उपजीविकेचे मुख्य साधन शेतीच आहे. सोयाबीन, कपाशी ही खरिपात तर गहू, हरभरा यांसारखी पिके रब्बी हंगामात घेतली जातात. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ३५ विहिरींचे काम झाले आहे. येत्या वर्षात २४ विहिरी प्रस्तावीत आहेत.

सिंचनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी अप्पर वर्धा योजनेच्या पाण्याची उपलब्धता व्हावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. सार्वजनिक गोदाम, शेततळी, नाला खोलीकरण, ५२ हेक्‍टरवर सीसीटी अशी कामे प्रस्तावीत आहेत.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून दोन हजारांपर्यंत वृक्ष लागवड झाली आहे. सीताफळ, आवळा, कवठ, चिंच, बांबू, बोर आदींचा त्यात समावेश आहे.

उत्पन्नाचा स्रोत म्हणून २२५ पर्यंत बांबू रोपांची लागवड झाली आहे. वृक्षांची देखभाल करण्यासाठी गावातील दहा जणांना कंत्राटी तत्त्वावर काम देण्यात आले आहे. नाडेप खताचे ३८ डेपो आहेत.

स्वच्छता व पाणी उपक्रम

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दहा शोषखड्डे खोदण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत खड्ड्यांमध्ये गावातील कचरा संकलित केला जाईल. त्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

प्रत्येक कुटुंबाला कचरा संकलनासाठी डस्टबिनचा पुरवठा करण्यात आला आहे. सांडपाण्याच्या नाल्याची वेळोवेळी स्वच्छता होते. प्रवीण देशमुख, पाणीपुरवठा कर्मचारी प्रशांत बबनराव ओहळे नियोजनात दक्ष आहेत.

जलजीवन योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी सुमारे साडेछत्तीस लाख रुपये क्षमतेची योजना राबविली जात आहे. बत्तीस लाख रुपये निधीतून जीवन प्राधिकरण अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम प्रस्तावित आहे.

‘हर घर जल’ उपक्रम अंतर्गत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविले जाते. पाणीपुरवठ्यासाठी विहिरीतील पाण्याचा उपयोग होतो. दोन सार्वजनिक स्वच्छतागृहे असून, त्यातील एकाचे बांधकाम झाले आहे तर एक प्रस्तावीत आहे. गावातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्रीटीकरण झाले आहे अशी माहिती सरपंच रीना पुरुषोत्तम मंजू यांनी दिली.

उपक्रमशील शाळा

गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपले जावे यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून परसबागेसारखा उपक्रम राबविण्यात आला आहे. पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांचे उत्पादन होते.

शालेय पोषण आहारात त्यांचा वापर होतो. शुद्ध पाण्यासाठी ‘आर.ओ.’ प्लांट बसविण्यात आला आहे. चिमुकल्यांसाठी अंगणवाडी असून, तिची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.

संपर्क ः रीना मंजू- सरपंच, ग्रामपंचायत, सार्सी ७२१८७१३२३९

Rural Development
Cow Monitor System : जनावरावर लक्ष ठेवण्यासाठी काऊ मॉनिटर सिस्टीम
रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात गोठे बांधण्याच्या योजनेची अंमलबजावणी सार्सी गावापासून झाली. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. या गावात पशुपालकांची संख्या मोठी असून, त्यातून त्यांना अर्थाजर्नचा चांगला पर्याय मिळाला आहे.
जी. के. मांगूळकर सचिव, ग्रामपंचायत, सार्सी ९६७३२६००१९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com