Crop Advisory : भात, नागली, कंद पिकांचे व्यवस्थापन कसे कराल?

भात, नागली, वेलवर्गीय पीके, हळद आणि कंद पिकात काय व्यवस्थापन करावे याचा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे.
Rice cultivation
Rice cultivationAgrowon

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण विभागात दिनांक २४ ते ३० जुलै दरम्यान पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार भात, (Rice) नागली, वेलवर्गीय पीके, हळद (Turmeric) आणि कंद पिकात पुढील व्यवस्थापन करावे. असा सल्ला (Crop Advisory) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे.

पिकावर कीड व रोग नियंत्रणासाठी फवारण्यात येणारे कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी अधिक प्रभावी होण्यासाठी फवारणीच्या द्रावणात स्टिकर म्हणजेच चिकटणारा पदार्थ आणि स्प्रेडर मिसळून फवारणी करावी. सर्व पिकातील खते देण्याची आणि फवारणीची कामे पावसाची ३ ते ४ तास उघडीप असतानाच करावीत.

Rice cultivation
GM Rice-भारतात जीएम भात नाहीः कृषिमंत्री तोमर

भात पिकातील व्यवस्थापन
- भात खाचरातील बांधावरील गवत काढून बांध तणमुक्त ठेवावेत. जेणेकरून किडीच्या खाद्य वनस्पतींचा समूळ नायनाट केल्याने भात पिकावरील किडींच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यास मदत होईल.
- २५ ते ३१ जुलै दरम्यान पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने भात खाचरामध्ये पहिल्या ३० दिवसापर्यंत पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमी पर्यंत नियंत्रित करावी. भात रोपांची पुनर्लागवड राहिली असल्यास पूर्ण करून घ्यावी.
कसे कराल भात पिकातील खेकड्यांचे नियंत्रण?
- बांधावरील खेकड्यांच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषाचा वापर करून खेकड्यांचे नियंत्रण करावे.
- एक किलो शिजलेल्या भातामध्ये ५० ग्रॅम गूळ अधिक ७५ टक्के पाण्यात मिसळणारी अॅसिफेट पावडर ७५ ग्रॅम टाकून विषारी आमीष तयार करावे. या मिश्रणाच्या साधारणपणे शंभर गोळ्या तयार करून प्रत्येक बीळाच्या आत तोंडाशी एक गोळी ठेऊन बीळ बुजवावे. दुसऱ्या दिवशी जे बीळ उकरले जाईल अशा बीळात परत अमिष ठेवावे.
- विषारी अमिषाचा वापर सांघिकरित्या व एकाच वेळी केल्यास खेकड्यांचे नियंत्रण करण्यास मदत होईल. (लक्षात ठेवा सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत) किंवा दहा तास भिजवलेले चिंचोके बिळामध्ये ठेवून बीळ बुजवावे.

Rice cultivation
Cotton Production: देशातील कापूस उत्पादन १२ टक्क्यांनी वाढणार

नागली
- नागली पिकाची पुनर्लागवड करुन घ्यावी. पुनर्लागवाडीच्या वेळेस प्रतिगुंठा ९०० ग्रॅम युरिया आणि २.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६६० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला १५:१५:१५ द्वारे खते द्यावीत. खताची मात्रा फेकून न देता ठोंब्यातून द्यावी.
- रोपे उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने उथळ आणि उभी लावावीत. ३० दिवसांची रोपे एका ठोंब्यात दोन याप्रमाणे दोन ओळीत २० सेंमी आणि दोन रोपात १५ सेंमी अंतर ठेवून लावावेत.

वेलवर्गीय पिके
नत्र खताची दुसरी मात्रा प्रतिवेल दहा ग्रॅम युरिया लागवडीनंतर एक महिन्यांनी द्यावी. नत्राची मात्रा देतेवेळी गवत काढून बुंध्याजवळची माती भुसभुशीत करून पिकांना मातीची भर द्यावी.
- वेलवर्गीय पिकामध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. नियंत्रणासाठी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी मेटॅलॅक्झील (८ टक्के) अधिक मॅंकोझेब (६४ टक्के) या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी करावी.

हळद
- हळद पिकास नत्र खताची पहिली मात्रा ८५० ग्रॅम युरिया प्रतिगुंठा लागवडीनंतर दीड महिन्यांनी द्यावी.
- खते हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात टाकून मातीने झाकून घ्यावीत. पिकाला मातीची भर द्यावी.

कंद पिके
- रताळी, कनगर, घोरकंद, करांदे, सुरण इत्यादी कंदवर्गीय पिकास नत्र खताची दुसरी मात्रा ८५० ग्रॅम युरिया प्रति गुंठा लागवडीनंतर एक महिन्यांनी द्यावी.
- नत्राची मात्रा देतेवेळी गवत काढून बुंध्याजवळची माती भुसभुशीत करून पिकांना मातीची भर द्यावी व कणगर पिकास आधार द्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com