Monsoon
MonsoonAgrowon

पूर्वमोसमी पावसाचा पिकांना दणका

विविध फळबागांचे नुकसान; अंतिम टप्प्यातील ऊस तोडणी खोळंबणार

पुणे ः तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात गुरुवारी (ता. १९) दुपारनंतर काही ठिकाणी पूर्व मोसमी पावसाने (Pre-Monsoon Rain) हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने (Rain) पिकांना दणका (Crop Damage) दिला आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळी देखील काही ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच होत्या.

राज्यात पावसामुळे केळी, पपई, द्राक्ष, डाळिंब, लिंबू, केळी आदी फळबागांसह उन्हाळी पिके आणि भाजीपाला पिकांना जोरदार फटका बसला आहे. नगर, सोलापूर, सातारा, अकोला, बुलडाणा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घालत शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा जोर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अधिक होता. कोल्हापूरातील आजरा येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सोलापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :
कोकण : दोडामार्ग ४०, वैभववाडी ३०, कणकवली, सावंतवाडी, चिपळूण प्रत्येकी २०, लांजा, कुडाळ, मुलदे, खेड, गुहागर, संगमेश्वर प्रत्येकी १०. मध्य महाराष्ट्र : आजरा ७०, सांगली ६०, चंदगड, हातकणंगले, गगणबावडा, कवठेमहांकाळ, कोल्हापूर प्रत्येकी ५०, कसबेडिग्रज, पन्हाळा, सोलापूर प्रत्येकी ४०, गडहिंगलज, गारगोटी, सातारा प्रत्येकी ३०, पंढरपूर, मिरज, पारनेर, कराड, मोहोळ, राधानगरी, करमाळा, कडेगाव प्रत्येकी २०, शाहूवाडी, नगर प्रत्येकी १०.

ढालगावात वीज पडून २७ मेंढ्या ठार
सांगली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठे महांकाळ, जत तालुक्यांसह इतर तालुक्यांत देखील पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीला उपयुक्त ठरणार आहे. शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी झाली असून, हा पाऊस पिकासाठी पोषक असून राहिलेली पेरणी लांबणीवर पडणार आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे वीज पडून २७ मेंढ्या ठार झाल्या. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

पावसाचा हापूस आंब्याला फटका
रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा हंगामावर परिणाम होणार आहे. जिल्ह्यात गुहागर, संगमेश्‍वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांत गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. तर अन्य तालुक्यांमध्ये शुक्रवारी (ता. २०) पहाटे हलका पाऊस झाला. रत्नागिरीत शुक्रवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच आहे.पावसामुळे दर्जा घसरल्याने कॅनिंगचा आंब्याचा दरही कमी होणार आहे.

साताऱ्यात ऊस तोडणी खोळंबली
सातारा, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात गुरुवारी (ता.१९) रात्री अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच कोरेगाव, वाई, जावळी, माण तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण तालुक्याला सर्वाधिक पावसाने झोडपले आहे. सातारा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडणीची कामे ठप्प झाली होती. सध्या शेतात उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या भुईमूग भिजून काढणीत व्यत्यय आला आहे. सातारा तालुक्यात ऊस तोडणीची कामे ठप्प झाली आहेत.

वऱ्हाडात केळी, लिंबू, पपई बागांना फटका
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी फळबागा मोडून पडल्या. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात वीज पडून तीन जनावरे दगावली. तर अकोला जिल्ह्यात सातपुड्याच्या कुशीत असलेल्या काही गावात गुरुवारी (ता. १९) सायंकाळच्या सुमारास पूर्वमोसमी पाऊस व वादळाने हजेरी लावली. जोरदार वादळामुळे तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी, खैरखेड, खंडाळा, बेरी, बोरव्हा आदी भागात सुमारे १५० ते २०० एकरांवरील केळी बागांना फटका बसला. पपई, लिंबूची झाडे तुटून पडली तर कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. शिवाय झाडे मध्यभागातून तुटून एकाचे दोन झाले. चितलवाडी येथे लिंबूची जुनी झाडे उन्मळून पडली. तसेच लोणार तालुक्यातील तांबोळा वीज पडून तीन गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पंढरपुरात केळी बागांना फटका
पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढ्यात या पावसाने आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब या फळपिकांचे, तर काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांदा आणि भाजीपाल्याचे नुकसान केले. अगोदर उष्णतेमुळ केळीला फटका बसला तर आता पावसानेही फटका बसला आहे. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. शुक्रवारीही पुन्हा पहाटेपासून पावसाने सुरुवात केली. दिवसभर थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरूच राहिली. पंढरपूर तालुक्याच्या बहुतांश भागात नुकसान झाले. पटवर्धन कुरोली, खेडभोसे, शेवते, पेहे या भागात पावसाचा जोर राहिला.काही भागांत सध्या काढणीस आलेला कांदा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. मंगळवेढा तालुक्यात द्राक्ष व आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com