
अभिजित डाके
सांगली जिल्ह्यात १० हजार ३२२ शेततळी (Farmponds) साकारली आहेत. त्यामध्ये अंदाजे १० हजार ८९० टीसीएम शाश्वत असा पाणीसाठा होत असल्याने दुष्काळी स्थितीत द्राक्ष, डाळिंब उत्पादकांना हक्काचे पाणी मिळाले आहे. शेततळ्यांमुळे पिकांना ‘जलाधार’ मिळाला आहे.
दुष्काळी भागातील बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर, विहीर व कालव्यांवर अवलंबून आहे. विहिरींचे पाणी उन्हाळ्यात कमी पडते. कालव्याला वेळेवर पाणी येत नाही. त्यामुळे फळबागा व अन्य पिकांसाठी वर्षभर पाणी पुरेल यासाठी शेततळे हा महत्त्वाचा पर्याय शेतकरी स्वीकारत आहेत. सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे कृष्णा आणि वारणा नदी असल्याने बागायती आहे. तर पश्चिमेचा भाग म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष असणारा दुष्काळी टापू आहे.
जिल्हा कृषी विभागाने २०१६-१७ पासून आजअखेर जोरदार कामगिरी करत उच्चांकी संख्येने शेततळी घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. मागेल त्याला शेततळे योजना तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेततळ्यांचे महत्त्व, फायदे पोहोचविण्याचे काम
केले. सामूहिक शेततळे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान याद्वारेही शेतकऱ्यांनी शेततळी घेतली. कोट्यवधी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील तासगाव, खानापूर, आटपाडी, जत तालुक्यांसह कवठेमहांकाळ या तालुक्यांना सातत्याने शेतीसाठीच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागे. पावसाची अनिश्चितता वाढत असल्याने त्यावर अवलंबून कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम व्हायचा. याच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि डाळिंबाचे क्षेत्र आहे.
कमी पावसामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ न झाल्याने त्याचा परिणाम शेतीवर व्हायचा. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांतून नियमित उपसा होऊ लागल्याने शेतकरी बागायती पिकांकडे वळले. द्राक्ष, डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली. मात्र योजनांचे वेळेत आवर्तन सुरू न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागायचे.
या सर्व पार्श्वभूमीवर शेततळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहेत. ‘वॉटर बॅंक’ शाश्वत शेतीसाठी आधार ठरली आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंबातून कोरडवाहू शेतीत अर्थकारण उंचावणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. आपले क्षेत्र व पिकांची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाकडे लाखो लिटर पाणी साठवून ठेवण्याची सोय झाली आहे.
तालुक्यांची आघाडी
जिल्ह्यातील जत तालुक्यात सर्वाधिक शेततळी, तर तासगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुष्काळी भागातील शेतकरी विहीर, कूपनिलका, आणि योजनांचे पाणी शेततळ्यात साठवून ठेवतात. जानेवारी-फेब्रुवारीत पाणीटंचाई भासते. उपलब्ध पाण्यावर पिकाचे नियोजन करणे भाग पडते. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याचे काटेकोर नियोजन करून ते पिकास दिले जाते.
तालुकानिहाय शेततळी दृष्टिक्षेप ः
तालुका....शेततळी संख्या
मिरज...१५९६
वाळवा...९२
शिराळा...१९३
तासगाव...२७२६
खानापूर...५१३
पलूस...४६
कडेगाव...९९
आटपाडी...४६२
जत...२९७६
कवठेमहांकाळ...१६१९
एकूण...१०३२२
जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजना प्रभावीपणे राबवली आहे. त्यातून द्राक्ष, डाळिंब आदी पिकांखालील क्षेत्र वाढू लागले आहे.
प्रकाश सूर्यवंशी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली
शेततळ्यांमुळे शाश्वत पाण्याची सोय करणे सोपे झाले. शेततळे म्हणजे आमची ‘वॉटर बॅंक’ आहे. द्राक्ष बागांना नवसंजीवनी मिळाली आहे.
चंद्रकांत लांडगे
मणेराजुरी, ता. तासगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.