वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे दाणादाण

केळीबागा, कांदा शेडचे नुकसान; वीज पडून महिलेचा मृत्यू
वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे दाणादाण
Rain UpdateAgrowon

नाशिक : जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rain) वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Damage To Farmer) केले आहे. बुधवारी (ता. ८) सिन्नर तालुक्यात वीज (Lightning) पडून महिलेचा मृत्यू (women Dead) झाला आहे. तर नांदगाव तालुक्यात केळी बागांसह (Banana) कांदा शेड (Onion Shed) व चाळींचे नुकसान झाले. त्यामुळे या पावसाने सुरुवातीपासून दाणादाण उडविली आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागातील नांदगाव, येवला व लगतच्या सिन्नर तालुक्याला तडाखा दिला आहे. नांदगाव तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या गावांमध्ये सायंकाळी वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने दाणादाण उडविली आहे. आमोदे व बोराळे गावांत केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे आडवी झाली आहेत. तर काही शेतकऱ्यांचे नेटशेड जमीनदोस्त झाले. तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे नुकसान झाले आहे.

बोराळे येथील केळी उत्पादक शंकरसिंग विठ्ठल सिंग सोळुंके यांचे ६ एकर, विजयसिंग विठ्ठल सिंग सोळंके यांचे ४ एकर, दादाभाऊ दगा सोळुंके व बलराम सिंग दादाजी सोळुंके यांचे १० एकर यासह अमोल युवराज देवरे यांच्यासह दोन-तीन शेतकऱ्यांच्या केळी बागांचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेले केळीचे घड तुटून पडले आहेत. दरम्यान, विजेच्या मुख्य लाइनवर वृक्ष उन्मळून पडल्याने आमोदे-बोराळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सलग दुसऱ्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्याने गावातील ग्रामस्थांवर अंधारात राहण्याची वेळ आली. भालुर येथे पुंडलिक पवार यांची राहात असलेली झोपडी वादळात उडून गेली तर माळेगाव येथे घरांचे पत्रे उडाली तर उन्हाळी कांद्याचे नुकसान झाले.

मनमाड परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे ४ ते ५ कांदा व्यापाऱ्यांचे शेड जमीनदोस्त झाले आहे. इंडियन हायस्कूलच्या खोल्यांचे पत्रे उडाले तर औरंगाबाद रेल्वे लाइनवर झाड उन्मळून पडले. मनमाड रेल्वे स्थानकाजवळ औरंगाबाद-मनमाड रेल्वे लाइनवर व्होवरहेड वायरवर झाड उन्मळून रेल्वेलाइन काही वेळ बंद होती. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मिरगाव, पाथरे, सायाळे या भागात पाऊस पडला. येवला तालुक्यातील पूर्व भागात राजापूर परिसरात पावसाने हजेरी लावली होती.

वीज पडून महिलेचा मृत्यू

दुशिंगवाडी (ता. सिन्नर) येथे बुधवारी (ता. ८) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने शेतात चारा काढणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उज्ज्वला प्रदीप ढमाले असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. पावसाचे वातावरण तयार झाल्याने उज्ज्वला ढमाले व जाऊबाई माया प्रकाश ढमाले या दोघी एक किलोमीटर अंतरावर शेतात जनावरांसाठी चारा काढत होत्या. दरम्यान प्रचंड कडकडाट करत वीज कोसळली. त्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com