दया, कुछ तो गडबड है...

आफ्रिकेतील जंगलात, दुष्काळाच्या काटकसरीच्या काळात, सगळं व्यवस्थित सुरू असताना एक विचित्र घटना घडायला लागली. जंगलात मोठ्या प्रमाणात कुडू हरणं मरून पडलेली दिसू लागली. कोणत्याही शस्त्राने किंवा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात ती मेलेली दिसत नव्हती. त्यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. बऱ्याच खटपटीनंतर मृत्यूंचं गुढ अखेर उलगडलं. त्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली.
दया, कुछ तो गडबड है...
African CountryAgrowon

मला लहानपणी, बस स्टॅण्डवर मिळतात तसली पॉकेट बुक्स वाचायची सवय लागली होती. खुनी कौन? गहरा सच वगैरे डिटेक्टिव्ह कहाण्या वाचत बकऱ्या चारताना, शेतात बांधावर बसून, झाडावर बसून, अंगणात खाट टाकून किंवा छतावर चटई टाकून या रहस्यकथा वाचण्यात मी रंगून जायचो. मोठेपणी आपण डिटेक्टिव्ह होऊ असं ठरवलं होतं.

कहाणीतल्या डिटेक्टिव्हने खुन्याला पकडलं, की त्याची कॉलर पकडून मीच त्याला पोलिसांच्या तावडीत देतोय असं दिवास्वप्न मी पाहायचो. गावात एकमेव टीव्ही आला तेव्हा कृष्णधवल ‘व्योमकेश बक्षी’ने त्या विचारांना अजून खतपाणी घातलं.

मोठं झाल्यावर डिटेक्टिव्ह होता आलं नाही. पण ते कसब जागोजागी कामाला आलं. पुण्यात नोकरी शोधण्यासाठी, पीएच.डी. गाइड मिळवण्यासाठी, धंद्यात पडल्यावर लायसेन्स, रजिस्ट्रेशनची कसरत करण्यासाठी माझ्यातल्या डिटेक्टिव्हचं कसब पणाला लागलं. संशोधन, व्यवसाय, वाचन, प्रवास यांसारख्या माझ्या दैनंदिन गोष्टींमध्ये विश्‍लेषणाची सवय लागली.

या सवयीनुसार कीस काढून अभ्यास केलेली अशीच एक सत्यघटना आपल्याला सांगणार आहे. तर मेहेरबान, कदरदान सावरून बसा आणि रहस्यमयी सत्यकथा ऐका.

आफ्रिकन देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. जंगल सफारी, वन्यजीव हे इथलं आकर्षण. आपल्याकडं कृषिपर्यटन असतं ना, तसं त्यांच्याकडे ‘साहस पर्यटन’ असतं. त्यासाठी खासगी जंगलं आहेत. म्हणजे लोकांनी, जंगलात हजारो एकरच्या जमिनीच्या तुकड्यावर खासगी ‘हंटिंग पार्क’ बनवलेत. त्या खासगी जंगलात हजारो वन्यप्राणी फिरत असतात. साहस पर्यटनवाले शिकारीची पॅकेज विकतात.

तुम्हाला कोणत्या प्राण्याची शिकार करायचीय, त्यानुसार भाव ठरतो. म्हणजे हरिण मारायचं असेल तर दोन लाख रुपये मोजायचे. सिंहाच्या शिकारीसाठी मात्र हरणाच्या तीन-चार पट जास्त पैसे मोजावे लागतात. सिंहिणीसाठी जास्त भाव द्यावा लागतो, सिंह त्यामानाने जरा स्वस्तच. सिंह आणि सिंहिणीची जोडीने शिकार करायची असेल तर अंमळ डिस्काउंट देखील मिळतो. घरात मनीम्याव बनणारे, बंदुकीच्या आणि पैशांच्या जोरावर निरपराध जनावरांची शिकार करणारे तिरसिंगराव, मोठा तीर मारला म्हणत, शिकारीबरोबर फोटोसेशन करतात.

आफ्रिकेतल्या अशाच एका शिकारी फार्मवर घडलेली ही रहस्यमय घटना आहे. १९८० च्या दशकातली ही गोष्ट. देशात भीषण दुष्काळ पडला होता. माणसांनाच अन्नपाणी मिळत नव्हतं, तिथं जनावरांचे हाल कोण पुसणार? इथं ‘कुडू’ जातीची हरणं मोठ्या प्रमाणात आहेत. दोन-अडीचशे किलो वजनाच्या या प्राण्याची दुष्काळात होरपळ सुरू होती.

पानांचे काटे करून पाणीबचत करणाऱ्या काटेरी बाभळाव्यतिरिक्त इतर झाडांनी नांगी टाकली होती. कुडू हरणांसाठी काटेरी बाभूळ हेच अन्न उरलं होतं. कुडूंचा कळप काट्यातून बाभळीची बारीक पानं निवडून खात आपला गुजारा करत होता. पावसाळा येईपर्यंत तरी त्यांना असंच भागवावं लागणार होतं.

इथल्या जंगलात, दुष्काळाच्या काटकसरीच्या काळात, सगळं व्यवस्थित सुरू असताना एक विचित्र घटना घडायला लागली. जंगलात मोठ्या प्रमाणात कुडू हरणं मरून पडलेली दिसू लागली. कोणत्याही शस्त्राने किंवा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात ती मेलेली दिसत नव्हती. त्यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. पार्कच्या ज्या भागात कुडू हरणं चरायचं प्रमाण जास्त होतं, तिथं मृत्यूचं प्रमाण अधिक होतं. दुसरीकडच्या भागात मृत्यू आढळून आले नाहीत.

पार्कच्या मालकांनी डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी पोस्टमार्टेम केलं, कसून तपासणी केली. पण त्यांना कोणत्याही परोपजीवीचा किंवा रोगजंतूचा संसर्ग आढळून आला नाही. त्यांनाही कुडू हरणांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नव्हतं. शेवटी शास्रज्ञांच्या चमूला बोलावलं गेलं.

कुडूंची पचनसंस्था गायीसारखी असते. गायीसारखंच ते पोटात अन्न आंबवून पचवतात. मेलेल्या हरणांचं पोस्टमार्टम केल्यावर एक गोष्ट लक्षात आली, की ज्या भागात जास्त कुडू चरायचे, आणि जिकडे मृत्यूचं प्रमाण जास्त होत, त्या भागातील हरणांच्या पोटातील अन्न आंबवण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं होतं.

अन्न पचवण्याचा वेग फारच मंदावला होता. प्रयोगशाळेत नमुने तपासल्यावर मेलेल्या हरणांच्या शरीरात ‘टॅनिन’ या रसायनाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं. काही झाडं स्वतःचा रासायनिक बचाव म्हणून टॅनिनचा वापर करतात. पाने खाणारे किडे आणि रोगजंतूंना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

सामान्यतः झाडामध्ये टॅनिन फारच कमी प्रमाणात तयार होतं. जिवाणू आणि किड्यांच्या नियंत्रणासाठी ही मात्रा पुरेशी असते. पण कुडू हरणासारख्या मोठ्या प्राण्यांसाठी मात्र हे प्रमाण फारच शुल्लक होतं. झाडाची पानं खाऊन हरणांच्या पोटात आलेलं टॅनिन त्यांच्या विष्ठेवाटे बाहेर पडतं. प्राण्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही. पण या केसमध्ये कुडू हरणांच्या पोटात मोठ्या प्रमाणात टॅनिन सापडलं होतं. जास्त टॅनिनमुळे त्यांच्या पोटातील अन्नपचन प्रक्रिया मंद होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.

आता प्रश्‍न हा होता, की झाडांमध्ये कमी प्रमाणात असलेलं हे नैसर्गिक विष, एवढ्या मोठ्या प्रमाणात हरणांच्या पोटात कसं आलं? नैसर्गिकरीत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅनिन झाडांमध्ये तयार होणं अशक्य आहे. मग, एवढं टॅनिन इथं आलं कसं? कुणी टॅनिनची इंजेक्शन देऊन हरणांना मारलं असेल का? कुणी त्यांच्यावर विषप्रयोग तर केला नसेल? बेकायदेशीर शिकारी तर यामागे नसतील? अशा विषारी शंकाकुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. या केसवर मेडिकल डिटेक्टिव्ह बरोबर पोलिसदेखील कामाला लागले.

सध्या शास्रज्ञांच्या हातात दोन पुरावे होते. एक म्हणजे, मोठ्या संख्येने, कळपात चरणाऱ्या हरणांमध्ये बळींची संख्या जास्त होती आणि दुसरा म्हणजे टॅनिनमुळेच मृत्यू झाले होते. एक मत असं होतं, की बाभळीच्या झाडाने हरणांना मारलं. किड्यांना मारणाऱ्या भरपूर वनस्पती निसर्गात अस्तित्वात आहेत. जवळपास ६५० मांसाहारी झाडं जगभरात आपलं अस्तित्व टिकवून आहेत. पण बाभळीचं झाड जास्तीत जास्त काट्याने काटा काढू शकतं किंवा त्याच्यातील पिटुकलं टॅनिन किड्याला पळवू शकतं. पण दोन-अडीचशे किलोच्या कुडू हरणाचा काटा काढायची ऐपत त्याची नक्कीच नव्हती. हे कोडं उलगडणं गरजेचं होत.

आता शास्रज्ञांनी गुन्ह्याच्या जागेवर म्हणजे जंगलात तपास करायचं ठरवलं. त्यांनी बाभळीच्या झाडाच्या काट्यांचे, पानांचे वेगवेगळे नमुने घेतले. प्रयोगशाळेत तपासले. त्यांना धक्काच बसला. एरवीच्या प्रमाणापेक्षा तीन-चार पट जास्त टॅनिन त्या बाभळीच्या झाडात आढळून आलं.

जंगलाच्या ज्या भागात मोठ्या संख्येने हरणं चरायची, त्या भागातील बाभळीत टॅनिन जास्त होतं. कमी हरणांच्या भागात पानातील टॅनिन कमी होतं. म्हणजे झाडाने, मोठ्या प्रमाणात येणारा शत्रू हेरला होता आणि त्याप्रमाणे आपले रासायनिक अस्त्र तयार ठेवलं होतं.

शास्रज्ञांचा इंटरेस्ट आता वाढला होता. त्यांनी जंगलात जाऊन, हरणं चरताना ओरबडतात; तशी बाभळीच्या झाडाची पानं ओरबाडली. त्या पानांचे नमुने घेतले. त्यामध्ये टॅनिन जास्त आढळलं. पण आश्‍चर्य म्हणजे ओरबाडलेल्या झाडापासून पन्नास-शंभर फुटावरील झाडांमध्ये, ज्यांना हातदेखील लावला नव्हता, त्या झाडांमध्येदेखील टॅनिनची मात्र तेवढीच जास्त सापडली. हे कसं झालं? एका झाडाने पन्नास-शंभर फुटांवरील दुसऱ्या झाडाला संदेश तरी कसा दिला? चक्रावलेल्या संशोधकांनी अजून एक प्रयोग केला.

बाभळीच्या झाडाच्या फांद्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधल्या आणि त्यांच्या पानांना ओरबडायचा प्रयोग परत केला. त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधली हवा तपासल्यावर, तिच्यामध्ये इथिलिन गॅस सापडला. आता कुठं त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि रहस्यावरचा पडदा उघडला.

त्याचं झालं असं, की कुडू हरणं चरायला आली की सर्वांत पुढं असलेलं बाभळीचं झाड मोठ्या प्रमाणात टॅनिन तयार करायचं. त्याचबरोबर इथिलिन गॅस तयार करून दुसऱ्या झाडांकडे पाठवायचं. इथिलिन हा हलका वायू आहे. लगेच हवेमार्फत पसरतो. जवळपासची झाडं आपल्या शेजाऱ्याचा हा सांगावा टिपायचे आणि त्यांच्यामध्ये देखील टॅनिनचं आधण ठेवायची लगबग सुरू व्हायची. या हल्ल्याची भनकदेखील नसलेलं कुडू हरिण पोटभर टॅनिनयुक्त चारा खायचे आणि त्यात त्याचा बळी जायचा. अशा पद्धतीने बाभळीच्या झाडांनी आपल्या शेजाऱ्यांना सावध करत शत्रूचा काटा काढला होता.

या सत्यकथेवरून आपण बोध काय घ्यायचा? माणूस, पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्यासह निसर्गातील सर्व जण एक-दुसऱ्याशी संवाद साधतायेत, कामी येतायेत. फक्त त्यांची संवादाची स्टाइल वेगळी आहे एवढंच. त्यांची शब्दावाचून बोललेली भाषा समजून घायचा प्रयत्न आपण करतो का? आपलं शेत, पीक आपल्याशी बोलतं का? जर ते बोलत नसेल, त्याची हाक आपल्याला ऐकू येत नसेल तर मात्र ‘दया, कुछ तो गडबड है...!‘

(लेखक ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा.लि.चे संचालक आणि ड्रीमर अँड डुअर्स या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com