
Murud News : मार्चपासून अपेक्षित मासळी मिळत नसल्याने खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. होडीसाठीचे डिझेल, खाना खर्च, बर्फ, खलाशांची मजुरीही न सुटल्याने तालुक्यात ५५ ते ६० टक्के होड्या समुद्रकिनारी विसावल्याचे चित्र मुरूड, एकदरा, राजपुरीत पाहायला मिळते.
बहुतांशी होड्या समुद्रात न गेल्यामुळे ताजी मासळी बाजारातून गायब झाली आहे. खवय्यांना चढ्या भावाने मासळी घेणे परवडेनासे झाले आहे. वातावरण बदलामुळे खोल समुद्रात जाऊनही मासळी मिळत नसल्याने मच्छीमार चिंतित आहेत.
दादली पद्धतीने मासेमारीसाठी अनुक्रमे दोन, चार वा सहा सिलिंडरच्या होड्या वापरल्या जातात. परंतु मिळणारी मासळी आणि त्यावरील खर्च याचा ताळमेळ नसल्याने होड्या किनाऱ्यावर नांगरल्या आहेत.
उन्हाळी हंगामात जवळा, पॉपलेट व कोळंबी ही मासळी मुबलक प्रमाणात मिळते. त्या अपेक्षेने मच्छीमारांनी उचललेले कर्ज त्यावरील व्याज थकीत झाल्याची पतसंस्थांसह बँकांची तक्रारीही वाढल्या आहेत.
एलईडी पद्धतीने होणाऱ्या मासेमारीमुळे, शक्तीमान दिव्यांच्या प्रकाशात सर्व मासळी आकर्षित होते. त्यामुळे मच्छीमारांना रिकाम्या हाती परतावे लागते. एलईडी मासेमारीला मत्स्य विभागाकडून परवानगी नाही. शिवाय अशा पद्धतीची बोट ५० ते ६० लाखांच्या घरात जाते.
दलाल वा अन्य मार्गाने जरी मुढी गोळा करून होडी घेतली, तरी परवाना मिळत नसल्याने मुरूड तालुक्यांतील मच्छीमार दादली पद्धतीनेच मासेमारी करण्याला पसंती देतात.
सध्या मुरूड बाजारात मासळीची आवक घटली आहे. बाहेरून आणली जाणारी मासळी ज्याला स्थानिक पार्सलची मच्छी नावाने संबोधतात ती विक्री होत आहे. पर्यटन हंगामाला सुरुवात झाल्याने मासळीला मागणी वाढल्याने दरही वधारले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.