मराठवाड्याच्या विकासासाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळावी

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवी समितीची मागणी
मराठवाड्याच्या विकासासाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळावी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनAgrowon

परभणी ः राज्य घटनेतील तरतुदीनुसार सीमावर्ती राज्यांना केंद्र शासनातर्फे देण्यात येणारी आर्थिक मदत मराठवाडा विभागाला सुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी. यासह अन्य मागण्या मराठावाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समितीतर्फे करण्यात आल्या आहेत.

१७ सप्टेंबर २०२२ पासून हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. या निमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत समितीची बैठक रविवारी (ता. १९) घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक विधीज्ञ जी. आर. देशमुख, पुणे येथील मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, संदीपान पवार, प्रा. बाबा उगले, सुधीर बिंदू, सुभाष जावळे, दि. फ. लोंढे, विलास राऊत, उदय वाईकर, यशवंतकुमार कसबे, भूषण मोरे, सुभाष गायकवाड, सुभाष कल्याणकर, रामेश्वर शिंदे, डॉ. धर्मराज चव्हाण, डॉ. दीपक देशमुख आदी उपस्थित होते.

आजच्या युवापिढीला हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याची माहिती असावी याकरिता लढ्याचा इतिहास शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा. राज्य शासनाच्या कार्यालयाप्रमाणे केंद्र शासनाच्या मराठवाडा विभागातील शासकीय कार्यालय, पोस्ट ऑफीस व राष्ट्रीयीकृत बँकांवरही १५ ऑगस्ट प्रमाणे ध्वजारोहणाने मराठवाडा मुक्तीदिन साजरा करण्यात यावा. मराठवाडा विभागात वृक्षरोपण व नदीपात्रालगत बांबू लागवडीची विशेष मोहीम राबविण्यात यावी. मराठवाडा विभागातील नागरिकांकरिता मुंबई येथे निवासस्थानासाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या धर्तीवर मुंबईत मराठवाडा भवन बांधण्यात यावे. राज्य घटनेच्या कलम ३७० (ब) मधील तरतुदी अन्वये मराठवाडा विभागाच्या आर्थिक विकासासाठी वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेसोबतच जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, गोवा, आसामसह सीमावर्ती राज्यांना केंद्र शासनातर्फे देण्यात येणारी आर्थिक मदत मराठवाडा विभागासाठी पण मिळाली पाहिजे, याकरिता केंद्राच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद व्हावी. या मागण्यांसाठी समिती पाठपुरावा करणार आहोत.

औरंगाबाद येथे दोन दिवसीय परिषद

१७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे दोन दिवसीय परिषद आयोजित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आदी मान्यवरांना निमंत्रित केले जाईल. मराठवाडा मुक्ती संग्रामदिन अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठी तरतूद केलेली असून तीन महिने संपूर्ण मराठवाड्यात जनजागरण करून पुढील वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com