Drought : दुष्काळाची परिस्थिती आपणच ओढावून घेतली?

दुष्काळ म्हटलं की अजूनही १९७२ ची आठवण निघते. खरंतर आजच्या पिढीला या दुष्काळाची कल्पना असायचं कारण नाही.
Drought
DroughtAgrowon

अभिजित घोरपडे

दुष्काळ म्हटलं की अजूनही १९७२ ची आठवण निघते. खरंतर आजच्या पिढीला या दुष्काळाची कल्पना असायचं कारण नाही. आता पन्नाशीत असलेले किंवा त्यांच्यापेक्षा वडील असलेल्यांनी हा दुष्काळ (Drought) पाहिला, भोगला.

मला किवा माझ्यासारख्यांना अशा लोकांच्या आठवणीवरच तो समजून घ्यावा लागतो. महाराष्ट्रात अलीकडं २०१२ सालापासून दुष्काळाचं सावट (Drought Crisis) आहे. तेव्हापासून मी आवर्जून दुष्काळी पट्ट्यात जात आहे आणि लोकांच्या आठवणी ऐकतो आहे.

आतासारखं पूर्वी कधी घडलं होतं का, याबाबत लोकांशी बोलतो. माझा अनुभव असा की ही चर्चा कुठूनही सुरू झाली तरी १९७२ च्या दुष्काळापाशीच येऊन थांबते. या दुष्काळाचा प्रभाव अजूनही जुन्या लोकांवर आहे.

खरंतर त्यानंतरही १९७९, १९८७, २००२, २००९ या वर्षांमध्येही देशात तीव्र दुष्काळ पडते, पण आठवणी या १९७२ च्या दुष्काळाच्याच निघतात. त्या दुष्काळाचे वेगळेपणा असे की त्या वर्षी भारतात स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत कमी पाऊस पडला.

तो विसाव्या शतकातील (आणि आतापर्यंतचासुद्धा) दुसऱ्या क्रमांकाला नीचांकी पाऊस होता. भारताच्या हवामान विभागाची अधिकृत आकडेवारी असे सांगते की, १९१८ साली देशात सरासरीच्या ७५.१ टक्के पाऊस पडला होता.

१९०१ सालापासूनच्या नोंदींनुसार हा आतापर्यंतचा सर्वांत नीचांकी पाऊस होता. त्यानंतर क्रमांक लागतो- १९७२ या वर्षाचा. त्या वर्षी देशात सरासरीच्या ७६.१ टक्के इतकाच पाऊस पडला. त्यानंतर २००९ सालचा अपवाद वगळता इतर दुष्काळी वर्षांतही देशात ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. २००९ सालचा पावसाचा आकडा ७८.२ टक्के होता.

ही सर्व पार्श्वभूमी मांडायचं कारण असं की, पावसाच्या आकडेवारीच्या दृष्टीने गेली दोन वर्षे काही विशेष नाहीत. कारण २०१४ साली ८८ टक्के, तर २०१५ साली ८६ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.

आणि अशी सलग दोन वर्षे अपुरा पाऊस पडल्याची उदाहरणंही यापूर्वीही आहेत. आता ज्या मराठवाड्यात दुष्काळाची प्रचंड ओरड सुरू आहे, तिथली आकडेवारीही काहीशी अशीच आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुलोचना गाडगीळ या विषयाचा अभ्यास करत आहेत.

त्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यात १९७२ च्या दुष्काळात सरासरीच्या केवळ ४६ टक्के पाऊस पडला होता, तर गेल्या वर्षी हे प्रमाण ६० टक्के होते. याचा अर्थ आता त्या वेळेपेक्षा पावसाची स्थिती बरी आहे... तरीही आता दुष्काळाची इतकी तीव्रता का?

Drought
Wet Drought : ओल्या दुष्काळाऐवजी पंचनाम्यांचा धडाका हे नाटक

या आकडेवारीवरून हे निश्चित की दुष्काळाच्या तीव्रतेला पावसाच्या प्रमाणाबरोबरच इतरही पदर आहेत. दुष्काळी पट्ट्यातील लोक १९७२ आणि आताचा दुष्काळ याची तुलना करताना एक बाब आवर्जून सांगायचे. ती म्हणजे- तेव्हा पिण्याच्या पाण्याची टंचाई नव्हती. उन्हाळ्यात नद्या वाहत नव्हत्या, पण डोहांमध्ये पाणी शिल्लक होतं.

अगदीच नाही तरी ओढ्या-नाल्यांमधली वाळू हाताने उकरली तर पाझर लागायचा. पिण्यासाठी पाणी मिळायचं. तेही पुरेसं. आता मात्र प्यायच्या पाण्याचीच मारामार आहे. नद्या-ओढ्यांची पात्रं कोरडी पडली. पाझर म्हणावा तर नदीत वाळूच उरली नाही.

भूजलाची पातळी इतकी खाली गेली की, आता विहिरीच काय, खोल बोअर घेतले तरी पाणी लागेल याची खात्री नाही... हा खूपच मोठा बदल आहे. पण त्याच्या मुळाशी नेमकं काय आहे? याबाबत अनेकांची अनेक मुद्दे येतील, पण त्याचा प्रमुख वाटा हा तंत्रज्ञानाला आणि त्याच्या वापरात असलेली बेशिस्त यांचा आहे.

पूर्वी नद्यांमध्ये वाळू उकरली तरी पाझर लागायचा, कारण भूजलाची पातळी चांगली होती. जमिनीत पाणी होतं, पण ते काढून वापरता येत नव्हतं. त्यासाठी लागणारी साधनं उपलब्ध नव्हती.

पुढच्या काळात तंत्रज्ञानात प्रगती होत गेली, तशी जमिनीतून पाणी काढण्याच्या यंत्रणा आल्या. पुढं पुढं वैयक्तिक उपयोगासाठीही त्या परवडू लागल्या.

आता तर त्यांचा वापर शेताशेतात होऊ लागला आहे. पंचवीस-पन्नास हजार रुपयात बोअर घेणं शक्य होतं. विजेसाठी पैसे भरायचे नसल्याने त्याच्या वापरावर पुढं खर्च होत नाही.

मग या तंत्रज्ञानाचा वापर इतका वाढला की लोक खोल, खोल आणखी खोल जाऊ लागले. त्यासोबत तंत्रज्ञानही प्रगत होत असल्याने आता कितीही खोलीवरचं पाणी काढता येऊ लागलं... झालं एवढंच की खोल जाणं शक्य आहे, पण काढण्यासाठी पाणीच शिल्लक राहिलं नाही.

Drought
Fish Drought : मत्स्यदृष्काळ जाहीर करा

कोणतंही तंत्रज्ञान आलं की त्याला जोडूनच ते वापरण्याचे नियम, शिस्त येते. आपल्याकडे या जोडून येणाऱ्या गोष्टींना गाळणी लागल्याने तंत्रज्ञानाने मोठं नुकसान केलं.

मोठाले रस्ते बनलेत पण वाहतुकीची शिस्त नसेल, तर वाहनांच्या वेगामुळे जे होईल तेच इथं घडलं. वेगाने नुसतं पाणी काढूनच घेतलं, ते जपून वापरण्याची किंवा पुन्हा माघारी देण्याची शिस्त लांबच राहिली.

त्यामुळे पाऊस कमी पडला किंवा जास्त पडला तरी उपसा सुरूच राहिला. बऱ्या पावसाच्या वर्षात त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही. लांबचं जाऊ द्या, पण उद्याचा विचार करण्याचीही दृष्टी नसल्याने भविष्यातील परिणाम लक्षात घेतले गेले नाहीत.

बस्स, एखाद्या वर्षी कमी पाऊस पडताच, ओरड करण्यासाठी पार्श्वभूमी तर तयारच होती... त्याचा प्रत्यय प्रत्येक कमी पावसाच्या वर्षात येतोच, या वर्षी पावसाचं प्रमाण आणखी कमी असल्याने ओरड आणखी वाढली.. इतकंच.

Drought
Drought : पूर आणि दुष्काळमुक्तीचा कासाळगंगा पॅटर्न

हे सारं घडत असताना सरकार, राजकीय नेतृत्त्व आणि प्रशासनाची भूमिकाही दूरदृष्टीची किंवा योग्य मार्ग दाखवण्याची उरली नाही. त्यांनी दीर्घकालीन भल्यासाठी लोकांना शिस्त लावण्याऐवजी जे होईल त्याला "चांगभलं" म्हणणंच पसंत केलं.

भूजलाच्या बाबतीत झालं तेच वाळूउपसा, जंगलतोड, नद्या-तलावांचं प्रदूषण, जलस्रोतांवरील अतिक्रमणं या रूपातही पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानाने आपल्याला हे स्रोत बिघडवण्याचा किंवा संपवण्याचा वेग दिला.. त्याचे परिणाम आपण पाहत आहोत, भोगतोसुद्धा आहेत.

दुष्काळी पट्ट्यात फिरताना एकदा माणदेशात गोंदवले या ठिकाणी गेलो होतो. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातलं हे प्रसिद्ध गाव. तिथं माण नदीवर ब्रिटिशकालीन दगडी बंधारे आहेत. आखीव-रेखीव, अजून एकही दगड हलला नाही असे भक्कम आणि दगडी असल्याने आकर्षक.

त्यांना तिथं "तट" म्हणतात. नदीचं पात्र कोरडं होतं आणि परिसर रूक्ष. या तटाजवळ सत्तरीतले एक वयस्कर आजोबा भेटले. वाकलेलं शरीर, हातात काठी आणि डोक्यावर फेटा.

त्याच्याशी बोलू लागलो. विषय अर्थाच दुष्काळाचा. ते म्हणाले, "जमिनीला जळवा लागल्यामुळे हे घडलं." त्यांना काय म्हणायचंय ते आधी समजेना. मग त्यांनी जोर देऊन सांगितलं, "जळवा वं जळवा !"

त्यांनी बोअरवेलचं वर्णन जळवा असं केलं होतं. जळवा जशा माणसाला किंवा जनावरांना चिकटल्या की काही कळायच्या आत शरीरातलं रक्त पिऊन घेतात, तसं या बोअरवेल्सनी जमिनीतलं पाणी पिऊ घेतलंय. त्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे, असं ते सांगत होते. इतकी चपखल उपमा मी आतापर्यंत ऐकली नव्हती. खरंच वापरातील शिस्त नसेल, बोअर या जळवाच ठरतात.

त्यांनीच जमिनीतलं पाणी भसाभसा उपसायला मदत केली आणि अडीनडीच्या वेळी वापरण्यासाठी असलेला जमिनीतील पाण्याचा साठा एरवीच संपवला. मग एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला की ठणाणा करण्याचीच वेळ !

मुद्दा एवढाच की, याचा दोष त्या जळवांना म्हणजे तंत्रज्ञानाला द्यायचा की ते वापरण्याचा विवेक किंवा अक्कल नसण्याला?

जाता जाता उत्तरांच्या अपक्षेने एक प्रश्न विचारतो- पूर्वी माणसाने पाणी, जंगलं, नद्या यासारखी नैसर्गिक साधनं टिकवली. यामागे त्या माणसाचा विवेक हे एकमेव कारण होतं की, वाढलेल्या गरजा आणि तंत्रज्ञानासारखी मोठा विध्वंस करण्याची शक्ती त्याच्या हाताशी नव्हती हेसुद्धा?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com