Evaporation : बाष्पीभवन रोखण्यासाठी डिफ्यूजर तंत्र

गेल्या दोन भागांमध्ये आपण भूजलासंदर्भात माहिती घेतली आहे. पुढे त्याविषयी आणखीही माहिती आपण घेणार आहोत. मात्र सध्या एप्रिल महिना सुरू असल्यामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाची समस्या सर्वांनाच जाणवत आहे. या बाबत अनेक शेतकऱ्यांकडून विचारणा करण्यात आली.
Evaporation
EvaporationAgrowon

सतीश खाडे

Water Management Update : पाण्याचे व्यवस्थापन, पाण्याची बचत किंवा पाण्याचे नियोजन यामध्ये पाण्याचे बाष्पीभवन हा महत्त्वाचे ठरते. शेतातील पाणी कमी होते, तेच मुळी बाष्पीभवनामुळे! या बाष्पीभवनामुळे शेततळे, पाट, शेतामध्ये दिलेले पाणी यांचा अपव्यय होतो. पाण्याच्या स्रोतापासून पिकाच्या मुळांपर्यंतच्या वहनामध्येही निचरा आणि बाष्पीभवनामुळे नुकसान होत असते.

मुळांच्या कक्षेच्या वरील भागामध्ये असलेल्या पाण्याचेही बाष्पीभवन होते. वरील थरातील पाणी बाष्पीभवनामुळे निघून गेले, की केशाकर्षण प्रक्रियेने मुळांच्या कक्षेतील खाली असलेले पाणीही वर येते आणि त्याचेही बाष्पीभवन होते. ही प्रक्रिया जमिनीत पाणी असेपर्यंत सतत सुरूच राहते.

हलक्या जमिनीत ही प्रक्रिया भारी जमिनीच्या तुलनेत वेगाने घडते. त्यामुळे हे बाष्पीभवन टाळणे पाणी नियोजनातील सर्वांत मूलभूत भाग आहे.

बाष्पीभवनाचा वेग मुख्यतः हवेचे तापमान, जमिनीचे तापमान, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा काळ या घटकांवर अवलंबून असतो. महाराष्ट्रातील बाष्पीभवनाचा दर हिवाळ्यात व पावसाळ्यात कमी असला तरी शून्य कधीच नसतो.

मात्र फेब्रुवारीनंतर ऊन चढायला लागते आणि हवा तापू लागली की जमीनही तापत राहते. तापलेल्या हवेचे जितके तापमान असते, त्यापेक्षा पीक असलेल्या जमिनीचे तापमान सहा ते सात अंश सेल्सिअसने कमी असते. तरीही तापलेल्या हवेच्या संपर्कात असलेल्या जमिनीचे तापमान वाढून बाष्पीभवन होत असते.

फेब्रुवारी महिन्यात बाष्पीभवनाचा दर सामान्यतः दिवसाला ८ ते ९ मि.मी. असतो, तर मे महिन्यामध्ये तो १४ ते १५ मि.मी. पर्यंत जातो. म्हणजेच आपल्या टाकीतील वा शेततळ्याच्या पाण्याची पातळीत रोज सात ते आठ मिलिमीटरने घट होत जाते.

तितके पाणी कमी होत जाते. शेतात दिलेले पाणीही (आर्द्रताही) याच वेगाने कमी होते. म्हणजेच शेताला अधिक पाणी द्यावे लागते. या बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवल्यास पाण्याची बचत करता येते.

Evaporation
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध उपाय

शेतातले बाष्पीभवन कमीत कमी होण्यासाठी

१. डिफ्यूजर सिंचन पद्धत.

२. गाडलेल्या सच्छिद्र पाइपने सिंचन.

३. मल्चिंग.

४. पॉलिमर पावडर व पुसा जेल यासारखे उपाय.

५. पाणी देण्याची दिवसातील योग्य वेळ.

६. तीन पदरी शेती.

७. रोपवाटिकेतील रोपांचा वापर.

८. पाणी वाहत असताना निचरा व बाष्पीभवनामुळे कमी होणारे पाणी वाचविण्यासाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार) उपयुक्त ठरते. यात थेट झाडाजवळ पाणी दिले जाते. त्यामुळे पाणी आजूबाजूला पसरून होणारे बाष्पीभवन रोखले जाते.

डिफ्यूजर सिंचन पद्धती

ही पद्धती विशेषतः फळबागेच्या सिंचनासाठी वापरतात. फळझाडाच्या जवळ भाजलेली ९ इंच खोलीपर्यंत मातीची भांडी बसवली जातात. त्यात ड्रीपरने पाणी दिले जाते. हे पाणी जमिनीपासून नऊ इंच खोल जाते.

झाडाची पाणी शोषणारी मुळे जमिनीपासून नऊ इंच ते एक फुटावर असतात. त्यांच्याभोवतीच सरळ पाणी जाते. वरील थरामध्ये पाणी जात नसल्यामुळे बाष्पीभवन होत नाही.

असे सारे अपव्यय टाळले गेल्यामुळे नेहमीच्या ठिबक व तुषार सिंचनापेक्षाही २० ते ३० टक्के अधिक पाणी यात वाचते, तर पाटपाण्याच्या तुलनेत ऐंशी टक्के पाणी वाचते.

सच्छिद्र पाइपद्वारे डिफ्यूजर सिंचन

ही वरील डिफ्यूजर तंत्राप्रमाणेच असली तरी अनेक पिकांमध्ये वापरता येते. यामध्ये मातीच्या भांड्याऐवजी सच्छिद्र पाइप शेतामध्ये सात ते आठ इंच खोलीवर गाडला जातो. त्यातून पाझरलेले खत आणि पाणी त्वरित मुळांना उपलब्ध होते.

या पद्धतीमध्ये पाणी, खते यांची मोठ्या प्रमाणात बचत होते. या पद्धतीमध्ये सच्छिद्र पाइप हे सरळ पंधरा फूट उंचावर उभारलेल्या पाण्याच्या टाकीला जोडता येतात. गुरुत्वाकर्षणामुळे पिकाच्या मुळांच्या क्षेत्रात पाइपमधून पाणी पाझरत राहते. यात पाणी किती लागते, याचा विचार केला तर २० एकर शेतीला प्रति दिन केवळ ५० हजार लिटर पाणी पुरेसे होते.

अगदी विजेचा वापर करायची वेळ आली तरी तीन एचपी क्षमतेचा पंप फक्त दोन तास चालवावा लागतो. या सच्छिद्र पाइपमधून ३ किलो प्रति वर्गमीटर इतक्या दाबाने पाणी वाहते. एक मीटर लांबीच्या पाइपमधून तासाभरात फक्त १.९ लिटर पाणी बाहेर पडते.

-यातून विद्राव्य खतेही देता येतात. खताची ७० टक्क्यांपेक्षा अधिक बचत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुळाभोवती वाफसा अवस्था कायम राहिल्याने मुळांची शोषणक्षमता वाढते.

-यामध्ये वापरले जाणारे पाइप हे त्यात शेवाळ तयार होणार नाहीत, अशा प्रकारचे असतात.

-पावसाळ्यात हे पाइप बाहेर काढून ठेवायचे असल्यास काढून ठेवता येतात.

-हे पाइप जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे उंदीर, वाळवी, बुरशी, क्षार व अन्य बाबींमुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

-मातीत क्षाराचे प्रमाण वाढणे किंवा त्यांची साठवणूक होणे या बाबी टाळल्या जातात.

- माती सतत मोकळी आणि हवा खेळती असल्याने नांगरणी करण्याचीही गरजच पडत नाही.

-गरजेप्रमाणे वरच्या थरामध्ये आपण कल्टिव्हेटर वापरू शकतो.

Evaporation
बाष्पीभवन दराचा विचार करुन करा डाळिंबाला सिंचन

-भात, गहू, ऊस, फळबाग, भाजीपाला अशा व इतर सर्व पिकांना साठी हे वापरू शकतो. पिकाच्या प्रकारानुसार आठ ते दहा इंच खोलीवर व पिकांच्या गरजेप्रमाणे योग्य रुंदीवर पाइप टाकावे लागतात. उदा. भाजीपाल्यासाठी दोन पाइपमधील अंतर तीन फूट, उसासाठी पाच ते सात फूट, फळ झाडांसाठी झाडाच्या दोन्ही बाजूंनी एक एक पाइप आणि दोन्ही पाइपमधील अंतर आठ ते दहा फूट इ.

- यासाठी एकरी खर्च सत्तर हजार रुपयांच्या आसपास येतो. (क्षेत्र आणि कंपनीनिहाय वेगवेगळा असू शकतो.) मात्र ही गुंतवणूक असून, खर्च नाही. कंपन्या याचे आयुष्य २५ वर्षे सांगत असल्या तरी आपण वीस वर्षे इतके धरले तरी एकरी वार्षिक केवळ तीन हजार रुपये गुंतवणूक पडते. मात्र यामुळे खतांचे, नांगरणी व अन्य मशागत, मजुरीचे पैसे वाचतात ते वेगळेच.

बाष्पीभवनाद्वारे किती पाणी उडून जाते, हे पाहिले तर तुम्हाला याचे महत्त्व समजेल.

प्रकल्प --- उडून जाणारे पाणी (टीएमसी)

श्रीशैलम --- ३३

नागार्जुन सागर --- १६

तुंगभद्रा --- २४

उजनी --- २२

इतर सर्व प्रकल्प मिळून --- २५०

महाराष्ट्रातील उजनी धरणातून बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी --- १६ ते १७ टीएमसी महाराष्ट्रातील ३३ टक्के पाणी जमिनीवर पडल्याबरोबर उडून जाते.

बाष्पीभवनाच्या वेगाची तुलना...

उत्तर प्रदेश (पंतनगर) ... ११ मि.मी. (जून महिना) प्रति दिन

राजस्थान (वाळवंट) ... १६ मि.मी. (जून महिना) प्रति दिन

जळगाव ... ५०० मि.मी. एकाच महिन्यात

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र आणि राजस्थान यांचा बाष्पीभवनाचा दर सारखाच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com