दिनेश यांची रेशीम शेती ठरली गावासाठी प्रेरणा

सव्वा एकरात व्ही वन जातीच्या तुतीची लागवड केली. ५५ बाय २२ फूट आकाराचे कीटक संगोपन शेड उभारले. त्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च आला. मेहनत, चिकाटी, इच्छाशक्ती व नेटके व्यवस्थापन यांच्या जोरावर आज तीन वर्षांच्या अनुभवानंतर या व्यवसायात स्थिरता येण्यास सुरुवात झाली आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

गुमगाव (जि. नागपूर) येथील दिनेश लोखंडे या युवकाने काही व्यवसाय केले. त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही न खचता पुढे बायव्होल्टाइन रेशीम कीटक संगोपनाचा व्यवसाय व्यवस्थित नियोजन व व्यवस्थापन करून यशस्वी करून दाखवला. त्यातून आर्थिक यश मिळवण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही रेशीम उत्पादक होण्यासाठी प्रेरणा तयार झाली आहे.

नागपूरपासून २५ किलोमीटरवर गुमगाव आहे. सुमारे १२ हजार लोकसंख्या असून, उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेतीच आहे. शहर नजीक असल्याने कपाशी, सोयाबीन यांच्या जोडीला भाजीपाला उत्पादनावरही गावकऱ्यांचा भर आहे. गावातील दिनेश नारायण लोखंडे यांची बारा एकर शेती आहे. त्यांचीही भाजीपाला शेती होती. पण उत्पादन, खर्च व दर यांचे गणित जुळल्याने त्यांनी ही शेती थांबवली. सन २०१८-१९ मध्ये चार गायींपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. डेअरीही सुरू केली. जोडीला बेकरी व्यवसाय होता. परंतु त्यातूनही जमा- खर्च ताळेबंद जुळला नाही.

नियोजनपूर्वक रेशीम व्यवसायात उडी

अपयशांमुळे खचून न जाता पुढील व्यवसायातून यश मिळवण्याचा दिनेश यांचा निर्धार पक्का होता. आशा अजून पल्लवित होत्या. सन २०१९-२० मध्ये कृषी विभागाच्या व्हॉट्‍सॲप गृपवर रेशीम व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. त्यातून उत्सुकता वाढल्याने थेट उमरेड मार्गावरील जिल्हा रेशीम कार्यालयाला भेट देत क्षेत्र सहायक नंदकुमार हागवणे यांच्याकडून व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. बुटीबोरी येथील संदीप निखाडे काही वर्षांपासून या व्यवसायात होते. त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय या क्षेत्रात पाऊल टाकणे जोखमीचे वाटल्याने वर्षभर त्यांच्या शेतात राबत संपूर्ण व्यवस्थापन शिकून घेतले.

प्रत्यक्ष सुरुवात

आत्मविश्‍वास वाढल्यानंतर दिनेश यांनी व्यवसायाची पद्धतशीर आखणी व नियोजन केले. सव्वा एकरात व्ही वन जातीच्या तुतीची लागवड केली. ५५ बाय २२ फूट आकाराचे कीटक संगोपन शेड उभारले. त्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च आला. मेहनत, चिकाटी, इच्छाशक्ती व नेटके व्यवस्थापन यांच्या जोरावर आज तीन वर्षांच्या अनुभवानंतर या व्यवसायात स्थिरता येण्यास सुरुवात झाली आहे. वर्षाला ते सुमारे आठ बॅचेस घेतात. प्रत्येक बॅच दीडशे अंडीपुंजांची असते. प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ८५ किलो रेशीम कोष अशी उत्पादकता मिळते.

व्यवस्थापनातील बाबी

अंडीपुंजांपासून कोष उत्पादन घेण्यासाठी सुमारे ३० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र आजच्या घडीला बरेच शेतकरी चॉकी खरेदी करतात. त्यामुळे हा कालावधी कमी होतो. परिणामी बॅचचा कालावधी सुमारे आठ ते दहा दिवसांनी कमी होतो. दिनेश देखील चॉकी विकतच घेतात. प्रति शंभर अंडीपुंजांपासून चॉकीसाठी २२०० रुपये याप्रमाणे चॉकी सेंटरधारकाकडून शुल्क आकारणी होते.

आशादायक उत्पन्न

पहिल्या वर्षी व्यापाऱ्यांनी गावातच कोष खरेदी केली होती. आता मात्र कर्नाटकातील रामनगर या प्रसिद्ध बाजारपेठेतच कोष नेण्यात येतात. परिसरातील गावांतील पाच ते सहा शेतकऱ्यांचा एकत्रित माल असल्याने वाहतूक व अन्य खर्च विभागला जातो. अलीकडील काळात प्रति किलो ५००, ६०० ते कमाल ७०० रुपये दर कोषांना मिळाल्याचे दिनेश सांगतात. प्रति बॅच सुमारे ३० हजार ते ४० हजार रुपयांचे ताजे उत्पन्न मिळते. त्यामुळे वार्षिक आर्थिक स्थैर्य मिळवणे शक्य झाले आहे.

तुतीचे लागवडीचे नियोजन

एक बॅच निघाल्यानंतर लगेच दुसरी बॅच घेता यावी यासाठी सव्वा एकरातील तुती लागवडीचे दोन टप्पे केले आहेत. चार बाय दोन फूट असे लागवडीचे अंतर आहे. यामध्ये जमिनीपासून सुमारे अडीच फुटांवर फांद्या फुटणार नाहीत या पद्धतीचे नियोजन केले जाते. त्यामुळे फांद्या वरील बाजूस वाढतात. फुटवे अधिक प्रमाणात येतात व पाला अधिक मिळतो असा दिनेश यांचा दावा आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येते. नागपूर जिल्ह्यात या पद्धतीवर शेतकऱ्यांचा अधिक भर असल्याची पुष्टी जिल्हा रेशीम अधिकारी विजय रायसिंग यांनीही केली आहे. दिनेश यांना त्यांच्यासह क्षेत्र सहायक भास्कर उईके, बकाराम वंजारी यांचेही मार्गदर्शन मिळते.

तापमान नियंत्रण

विदर्भात उन्हाळ्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जाते. त्यामुळे दिनेश यांनी शेडच्या वरील बाजूस मिनी स्प्रिंकलर, तर आतील बाजूस फॉगर्स बसविले आहेत. त्यामुळे बाहेरील तापमान ४५ अंशांच्या पुढे असले तरी शेडमधील तापमान २९ ते ३० अंशांपर्यंत ठेवणे शक्‍य होते. त्यामुळे कोषांची गुणवत्ता राखण्यासाठी ते अनुकूल ठरते.

अनुदानाचे बळ

केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र योजने’तून कीटक संगोपनगृहासाठी एक लाख २६ हजार, तर तुती लागवडीसाठी एकरी साडेसदोतीस हजार अनुदानाची तरतूद आहे. दिनेश यांना सद्यःस्थितीत तुती लागवडीच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे.

शेतकऱ्यांचा वाढला उत्साह

दिनेश यांचे यश पाहून गावातील अन्य शेतकरीही रेशीम शेतीकडे वळले आहेत. नव्याने नऊ शेतकऱ्यांनी रेशीम विभागाकडे नोंदणी केली आहे. चंद्रकांत वामन निवंत, नीलेश हिंगे, विष्णू रामहरी बोरकर, प्रकाश मेंढूले, रवी पाटील, अच्युत आष्टनकर, रिद्धेश्‍वर खटिंग, हबीब शेख आदींचा त्यात समावेश आहे.

संपर्कः दिनेश लोखंडे, ९५५२२३०००४

विजय रायसिंग, ९५२७०७०७९१

(जिल्हा रेशीम अधिकारी, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com