Water Management : चर्चा पाणी व्यवस्थापनावर व्हायला हवी...

मागील दोन लेखांमध्ये पाणी प्रश्‍न जाणून घेतानाच वातावरण बदलाच्या प्रभावामध्ये पाणी व्यवस्थापन आणि आयपीसीसी व अन्य काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांचा आढावा घेतला. मात्र जितकी चर्चा जागतिक तापमान वाढीची होते, तितकी पाणी प्रश्‍नावर होत नाही. पाणी व्यवस्थापनावर फारशी तर नाहीच नाही!
Water Management
Water ManagementAgrowon

आपण जागतिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या संख्या आणि विविध आंतरराष्ट्रीय गटांच्या पर्यावरणासंदर्भात (Environment) होणाऱ्या बैठका व त्यातील प्रस्ताव, ठराव आणि अहवालाची थोडक्यात माहिती घेतली.

मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला पाहिजे, तो म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (Conference Of Parties) (सीओपी) १ ते सीओपी २७ अशा एकूण २७ परिषदेपैकी एकाही परिषदेमध्ये पाणी प्रश्‍नावर (Water Cisis) जेवढी चर्चा व्हायला हवी तेवढी झालीच नाही.

यात प्राधान्याने चर्चा असते, ती वाढते वैश्‍विक तापमान, त्याची १.५ अंश सेल्सिअसची सीमा, वितळणारे बर्फ आणि वातावरणामध्ये सातत्याने वाढत असलेला कर्ब वायू आणि या सर्व दोषांचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा.

Water Management
Climate Change : वातावरण बदल, पाणी यांचा परस्परसंबंध

औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात केलेल्या अमाप चुकांबद्दल विकसित राष्ट्रांकडून १०० अब्ज डॉलर नुकसान भरपाईची मागणी मान्य सुद्धा झाली. यात पर्यावरणाच्या समस्यांवर काम करण्यापेक्षाही या सर्व पैशांच्या खेचाखेचीमध्ये आपल्या वाट्याला किती येणार, याचेच गणित अधिक मांडले गेले.

याला एक सन्माननीय अपवाद होता फक्त यजमान असलेल्या इजिप्तचा. या देशाने पाणी आणि त्याचे व्यवस्थापन हा विषय लावून धरला. त्यांचे पाणीविषयक दालनही भविष्यामध्ये पाणी प्रश्‍नाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते.

आता पुढील २८ वी सीओपी संयुक्त अरब अमिरात (यूएई)मध्ये होणार आहे. त्यात सर्वसामान्यांच्या जीवनाशी भिडलेल्या पाणी या मूळ समस्येवर अधिक विचार होईल का?

Water Management
Flood : लोकसहभागातून पूरमुक्तीचा ‘साखरपा पॅटर्न’

पाण्यामुळे सत्तासंघर्ष वाढणार...

तिसरे महायुद्ध होणार की नाही, याची चर्चा होत असते. ते झालेच तर पाण्यासाठीच असेल असा इशारा आंतरराष्ट्रीय जल अभ्यासक देत आहेत. कधी आपणास वाटू शकते, की एवढा पाऊस पडतो, ढगफुटी होते.

उभ्या पिकासह स्थावर मालमत्ता वाहून जाते. वाटते नको हा पाऊस आता. मात्र त्याच वेळी पृथ्वीवरील अनेक ठिकाणे अशी असतात, की जिथे पावसाचा एक थेंबही पडलेला नसतो. आज आफ्रिका खंड, युरोप, चीनचा वायव्य भाग, अमेरिकेचा पश्‍चिम भाग हेच तर अनुभवत आहे. युरोप २०२२ मधील दुष्काळ हा ५०० वर्षांनंतर प्रथमच अनुभवत आहे.

एकेकाळी जर्मनीमधील ऱ्हाईन नदीमधून जहाजाद्वारे मालवाहतूक होई, आज त्याच नदीत जेमतेम दीड मीटर खोल पाणी आहे. जहाज वाहतुकीसाठी किमान १.२ मीटर तरी खोल पाणी लागते, हे लक्षात घेतले तर त्याचे गांभीर्य आपल्याला जाणवेल. इंग्लंडमध्ये आज प्रचंड मोठा दुष्काळ असून, पाणी वापरावरही प्रथमच नियंत्रण आले आहे.

अफगाणिस्तान, अंगोला, ब्राझील यांचीही स्थिती काही वेगळी नाही. ही जागतिक स्थिती पाहताना आपल्या देशात काय असा विचार मनात आला असल्यास सांगतो. झारखंड, प. बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत या वर्षी मॉन्सूनचा पाऊसच पडला नाही. भारतामधील ५० दशलक्ष लोक प्रतिवर्षी दुष्काळाने पीडित होतात.

Water Management
Water Management : देवळ्यातील मृत ओढा झाला पुनरुज्जीवित

आपल्या सीमेशी जोडलेल्या चीन या राष्ट्राने पाण्यावर लक्ष केंद्रित केल्याच दिसते. ब्रह्मपुत्रा नदीला मिळणाऱ्या एका मोठ्या उपनदीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत स्वतःच्या हद्दीत चीन एक मोठे धरण बांधत आहे.

याचा विपरीत परिणाम ब्रह्मपुत्रा नदीबरोबरच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश यांच्यावर होईल. स्वतःच्या पाणी शाश्‍वतीसाठी व्यवस्थापन करताना अन्य राष्ट्रांवर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार हे विस्तारवादी राष्ट्र करणार नाही. त्याला कोण रोखणार, हाही प्रश्‍न आहे.

बोरी, बाभळी याही गुरूच...

आपल्या देशात पडणाऱ्या दुष्काळासाठी आपण मॉन्सूनच्या वितरणाला दोष देतो. ते काही प्रमाणात खरेही असले तरी एक गोष्ट विसरली जाते, ती म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाऊस पडला नाही म्हणून दुष्काळ असे म्हणताना जेव्हा तो बरसला, त्या पाण्याचे व्यवस्थापन आपण कसे केले? त्यातील किती पाणी जमिनीत मुरवले, असे प्रश्‍न विचारले पाहिजेत. बहुतांश वेळा त्याचे उत्तर नकारार्थी येते, हे भविष्यासाठी धोक्याचे आहे.

आपल्या बांधावर बोरी, बाभळी या वृक्ष भगिनी भूगर्भातील पाण्याचे निदर्शक म्हणून काम करतात. त्या स्वतः पाणी व्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहेत. माझे आजोबा म्हणत, ‘‘ज्याच्या बांधावर बोरी, बाभळी असतात, त्या कोरडवाहू जमिनीतसुद्धा रब्बीचे पीक सेंद्रिय खतांवर उत्तम येते.

या दोन वृक्षाखाली पावसाळ्यात खूप तण येते, हा सुद्धा पाणी व्यवस्थापनाचाच एक भाग आहे. कारण या तणामुळे पावसाच्या पाण्याचा एक थेंबही बांधाबाहेर जात नाही. सर्व पाणी जागेवरच मुरते, तणाची मुळे तंतुमय मोजकेच पाणी घेत असली तरी उरलेले पाणी जागेवर मुरवण्यात मोलाची भूमिका बजावतात.

खोलवर मुरलेले पाणी बोरी, बाभळीचेच असते. हिवाळ्यात गुरे बांधावरील या तणांवर चरतात. म्हणजेच वृक्षांनी केलेल्या या पाणी व्यवस्थापनातून आपण शिकले. असे स्थानिक वृक्ष आपले खऱ्या अर्थाने गुरू ठरू शकतात.

पाणी व्यवस्थापनाचे साधे धडे...

पाणी आणि पाणी व्यवस्थापन या विषयाचा आवाका फार मोठा आहे. मात्र केवळ आकडेवारीच्या जंजाळात अडकून किंवा घाबरून चालणार नाही. त्यातील अनेक गोष्टी हळूहळू समजून घ्याव्या लागतील. उदा. शहरी लोकांचा पाण्याशी संबंध फक्त स्वतः किंवा कुटुंबापुरता असतो. किती वापरावयाचे हे सुद्धा तोच ठरवू शकतो.

पण खेड्यांमधील शेतकऱ्यांचे तसे नसते. त्याचा जीव पाण्याबाबतीत घशाइतकाच शेताशी, जनावरांशी जोडलेला असतो. ‘आधी शिवाराला पाणी, मग घशाला’ असे अनेक शेतकरी मी पाहिले आहेत. पूर्ण रान भिजविल्याशिवाय पाण्याचा घोट न घेणारा अण्णा गडी आमच्याच शेतात होता.

‘‘मालक, आधी यांचा जीव महत्त्वाचा, मग माझा’’ असे म्हणत त्याने पिकांच्या रोपांकडे दाखवलेले बोट आजही मला आठवते. ‘‘पाहा ! रान कसे पटकन भिजते, शेणखत दिले की पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया जात नाही.’’ हा पाणी व्यवस्थापनाचा पहिला धडाही त्यांनीच दिला होता.

अगदी पिकाला पाणी रात्री किंवा पहाटेच द्यावे, हेही पाण्याचे व्यवस्थापनच! पूर्वी विहिरीतून मोटेने उचलून पाटाने शेताला पाणी दिले जाई. पाटाच्या दोन्हीही बाजूला लावलेला शेपू, चुका, मेथी हेही पाण्याचे उत्तम व्यवस्थापन.

पावसाळ्यात पन्हाळीचे अंगणात पडणारे पाणीही माझी आई, आजी रांजणात, टिपामध्ये साठवत. पुढे आठवडाभर वापरत, हेही व्यवस्थापनच.

आमच्या घरी पिण्याचा पाण्याचा आड होता. काठावर दोन तीन पोहरे ठेवलेले असत. जेवढे पाणी हवे तेवढेच पोहऱ्याने घ्यावयाचे. एकदा एक बाई त्यांचा नवा पोहरा घेऊन आल्या. आजीने त्यांना आडावरचाच पोहरा वापरायला सांगितला.

‘‘पण तो गळका आहे ना’’ या त्यांच्या उत्तरावर आजी म्हणाली, ‘‘पोहरा त्याचे अर्धे पाणी आडाला परत करतो. हा पाण्याचा आणि आडाचाही सन्मान आहे. फुकट मिळते म्हणून सगळे लुटू नये, हे ते गळणारे पाणीही सांगते.’’ असा गळका पोहरा हेही पाणी व्यवस्थापनाचे प्रतीक आहे.

घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी देणे हे आमचे बालपणीचे काम. पण पिण्यासाठी तांब्यासोबत फुलपात्र देणे, हाही एक धडाच. असे छोटे छोटे धडे वाचून आपण उत्तीर्ण होऊ शकतो.

पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन दोन-चार घोट पोटात रिचवल्यानंतर फेकून देणारे महाभाग स्वतःला शिकलेले आहेत, असे कसे म्हणू शकतात? पाणी परिषदांमध्ये पाण्याच्या बाटल्या वागवणारे, फेकून देणारे पाणी व्यवस्थापन परीक्षेत कसे उत्तीर्ण होणार?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com