Diwali
DiwaliSeason

आली दिवाळी

जसजसा दिवाळीचा सण जवळ येऊ लागतो तसतशी अबाल वृद्धांच्या मनात दिवाळी सणाची आतुरता वाढू लागते. या दिवसातले वातावरण इतके आल्हादायक आणि ताजेतवाने असते, की प्रत्येकाच्याच उत्साहाला भरते आलेले असते.

सकाळी धुके पडायला सुरुवात आणि दिवसभर रुक्ष वारे वाहायला लागले, की रोज संध्याकाळी गर्जत येणाऱ्या पावसाची भीती कमी होऊ लागते. सकाळच्या हवेत हलकासा गारवा जाणावयला लागला, की हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. एव्हाना खरिपाच्या सुगीची लगबग कमी झालेली असते. शेतातल्या लक्ष्मीने घरात प्रवेश केलेला असतो. जसजसा दिवाळीचा सण जवळ येऊ लागतो तसतशी अबाल वृद्धांच्या मनात दिवाळी सणाची आतुरता वाढू लागते.

Diwali
Animal Care : वाढवा जनावरांची रोगप्रतिकारशक्ती...

या दिवसातले वातावरण इतके आल्हादायक आणि ताजेतवाने असते, की प्रत्येकाच्याच उत्साहाला भरते आलेले असते. पावसाळ्यात अगदी अंथरुणाला खिळलेले जगण्याची आस संपलेले वृद्ध या दिवसांत नवसंजीवनी मिळाल्या सारखे पुन्हा आयुष्याकडे आशादायक नजरेने पाहू लागतात. कंटाळवाणा पाऊस नाही. बैचेन करणारी उष्णता नाही की अंगात हुडहुडी भरवणारा थंडीचा कडाका नाही.

Diwali
Animal New Breed : महाराष्ट्रातील गाय आणि म्हशीच्या नव्या जातींची नोंद

इतक्या दिवस कोंदाटलेले आभाळ मोकळे झालेले असते. शेतात रब्बीच्या पिकांचे कोवळे अंकुर डोकाऊ लागलेले असतात. माळरानातले गवत परिपक्व होऊन सोनेरी दिसू लागलेले असते. त्याचा विलक्षण सुगंध सभोवार दरवळत असतो. वाऱ्याच्या झुळकीने ते सोनेरी गवत इतके छान डोलते की पाण्याच्या लाटाप्रमाणे लहरु लागते. या दिवसांत एक आगळीच स्फूर्ती असते.

जी स्फूर्ती अलार्म न लावता सुद्धा सकाळी लवकर जागे करू लागते. सुगंधी उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान. अगदी पहाटे मंदिरातून ऐकू येणारे काकड आरतीचे मंगल सूर आणि त्या पाठोपाठ चैतन्यमयी दिवसाला जागवत, धुक्यातून हळूहळू वाट काढत, जणू स्मित हास्य करीत येणारा सूर्य आणि त्याच्या स्वागतासाठी चमचमणाऱ्या दवबिंदूंची अगणित तोरणे घेऊन सज्ज असलेली धरणी.

इतक्या दिवस पावसाचे आकांडतांडव आणि आभाळाचे रौद्ररूप अनुभवलेली धरणी, जणू सुटकेचा निःश्‍वास टाकत, या आल्हादायक दिवसांत अगदी आनंदाने मोहरून गेलेल्या युवतीसारखी भासत असते. मनामनात उजळलेला सकारात्मकतेचा प्रकाश सगळीकडे भरून राहिलेला असतो.

प्रत्येक वर्षी दिवाळी जवळ येऊ लागली, की सासुरवाशीण लेकीच्या मनाची चलबिचल वाढू लागते. माहेरच्या दिवाळीतल्या गोड आठवणीने ती व्याकुळ होते. सासर कितीही श्रीमंत असले किंवा लग्न होऊन कित्येक वर्षे लोटली असली तरीही लेकीला दिवाळीचा सण जवळ आल्यावर प्रकर्षाने माहेरची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

‘दिवाळीच्या मुळा लेकी आसावली’ संत तुकोबांच्या अभंगातील ही ओळ दिवाळी आल्यावर स्मरणात येतेच. कारण यात दिवाळीच्या आनंदासाठी आणि आईच्या भेटीसाठी आतुर असलेल्या लेकीच्या मनाची अवस्था अगदी चपखल मांडली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com