
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) नागपूर येथे सुरू आहे. अधिवेशन म्हटलं की गदारोळ, अधिवेशन तहकूब व भावनिक मुद्यांवर भर असे बदलते स्वरूप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाला समृद्ध वैचारिक वारसा आहे. संसदीय आयुधांचा वापर करून अनेक सदस्यांनी अधिवेशने गाजवली आहेत. अधिवेशनात आपला विषय मांडताना भाषिक कोट्या पाहायला मिळत असत. महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण, गांभीर्याने चर्चा सभागृहात होत असे.
आत्ताच्या सभागृहातही अनेक अभ्यासू सदस्य अभ्यासपूर्ण भाषणे करताना दिसतात. राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे कायदे, धोरण याच ठिकाणी तयार होतात. राज्याच्या जनतेच्या आशा-आकांक्षांचे, प्रतिबिंब या ठिकाणी दिसायला हवे. दुर्दैवाने काही काळापासून सभागृहात भावनिक मुद्यांवर चर्चा, गदारोळ दिसून येतोय.
भावनिक राजकारण करून मतपेटी शाबूत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधक दोघेही करताना दिसत आहेत. सोशल मीडियात देखील भावनिक विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मीडियाने देखील एखादा सदस्य अभ्यासपूर्ण भाषण करत असेल तर तो अवश्य दाखवावे. अनेकदा विधिमंडळ सदस्य महत्त्वाच्या विषयावर बोलत असताना संबंधित विषयाचे मंत्री तिथे हजर नसतात. सर्व मंत्र्यांनी पूर्णवेळ सभागृहात हजर राहावे.
मतदार संघातील प्रश्नांची चर्चा सभागृहात व्हावी तसेच अनेक कायदे, धोरणे यावर देखील सभागृहात सखोल चर्चा झाली पाहिजे. राज्याचा विकास हा त्या राज्याने घेतलेल्या धोरणांमुळेच होतो. सभागृहात भावनिक विषय बाजूला ठेवून धोरणात्मक विषयांवर चर्चा व्हावी. सखोल चर्चा, वादविवाद यातून धोरणाला, कामाला, प्रकल्पांना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. विधिमंडळाने मंजूर कामांना सरकार बदलले तरी स्थगिती मिळता कामा नये.
यासाठी सर्व सदस्यांनी अधिवेशन काळात पूर्णवेळ हजर राहावे. विधिमंडळ चर्चेदरम्यान सदस्यांनी गोंधळ घालणे, अध्यक्षांचा माईक ओढणे, घोषणाबाजी, असंसदीय भाषेचा वापर न करता संसदीय आयुधांना योग्य प्रकारे वापर करून आपला विषय मांडावा. वारंवार अधिवेशन तहकूब करावे लागल्यास महत्त्वाचे विषय चर्चा न करता बहुमताच्या बळावर मंजूर होतात. विधिमंडळाने तयार केलेल्या धोरणातूनच राज्य प्रगतीकडे जाईल. सध्या सुरू असलेले अधिवेशन भावनेपेक्षा महत्त्वाच्या विषयांवर, धोरणावर चर्चा करणारे असावे हीच अपेक्षा!
- शिवाजी काकडे, पाथ्री ता. फुलंब्री जि. औरंगाबाद (७८८७५४५५५७)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.