आपण करतो काही असं?

रिचर्ड फाइनमन हे जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ. त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले होते.
आपण करतो काही असं?
मशागत लेखAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

रिचर्ड फाइनमन हे जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ. त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले होते. प्रचंड बुद्धिमान असलेल्या या शास्त्रज्ञाच्या बालपणात डोकावलं तर काय दिसतं? तर त्यांच्या वडिलांनी रिचर्ड लहान असताना रिचर्ड यांच्या पुढ्यात नेहमी पुस्तके, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळे इत्यादी टाकून जात. रिचर्ड या वस्तू न्याहाळत. काही फोडूनही टाकत. पण तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीही मारलं नाही. रिचर्ड खेळणी फोडून त्याच्या आतलं मशिन कसं काम करतं ते पाहत बसत. त्यांना कुतूहल असायचं, की हे खेळण्याच्या आत नेमकं काय आहे? रिचर्ड यांच्या या कुतूहलाची त्यांच्या वडिलांना किंमत होती. पण आपण करतो का हे असं?

रिचर्ड बेकर हा एक वृक्षप्रेमी शास्त्रज्ञ. त्यांच्या घराशेजारी घनदाट असलेल्या वृक्षराजीमध्ये ते फिरायला जात. त्यांचे वडील त्यांना तसं करू देत. रिचर्ड मधमाश्यांची पोळी तासन् तास पाहात बसत. त्यांचे वडील त्यांना झाडे लावायला शिकवत. बाग कशी फुलवायची ते शिकवत. मग प्रश्‍न पडतो, की आजकाल पालक हे असं मुलांमध्ये विविध कौशल्ये विकसित व्हावी म्हणून प्रयत्नशील असतात का? मुलांना घेऊन मोठ्या ग्रंथालयास भेट देतो का? एखाद्या मोठ्या चित्रप्रदर्शनात शिल्प प्रदर्शनात मुलांना घेऊन आम्ही जातो का? मुलांसोबत आम्ही सायकलिंग करतो का? मुले ज्या वयात आहेत त्या वयाला साजेसे सिनेमे आम्ही मुलांसोबत पाहतो का? पावसाळ्यात सकाळी पश्‍चिमेला व संध्याकाळी पूर्वेलाच इंद्रधनुष्य का तयार होतं? या प्रश्‍नांचा शोध मुलांसोबत आपणही घेतला का कधी? वळवाचा पहिला पाऊस पडल्यावर मातीला एक सुंदर असा गंध येतो, जो नंतर पडणाऱ्या पावसानंतर तो वास का येत नाही?

परवा माझ्या एका चुलत भावाचा मुलगा व भाऊ असे दोघेही रस्त्याने जात असताना त्यांना एक अपघात झालेला दिसला. तिथे त्या मुलाच्या कानावर ‘पंचनामा’ हा शब्द पडला. मुलाने भावाला विचारले, की बाबा पंचनामा म्हणजे काय? भावाने त्याच्या परीने उत्तर दिले; पण या उत्तराने मुलाचं काही समाधान झालं नाही. भाऊ मुलाला घेऊन तडक पोलिस स्टेशनला गेला. तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांना विनंती केली मुलाचे तेवढे शंकासमाधान करा म्हणून. पोलिसांनी छान समजावून सांगितले. सर्वप्रथम आपण मुलांच्या कुतूहलाचा सन्मान केला पाहिजे. प्रश्‍न विचारण्यासाठी मोकळं वातावरण दिलं पाहिजे. हा मोकळेपणा तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण मुलांसाठी, त्यांच्या कुतूहलासाठी, त्यांच्या शंकांसाठी, त्यांच्या प्रश्‍नांसाठी लहान होऊ. पण आपण करतो काही असं?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com