
‘‘सर, तुम्हाला काय सारखा त्या गरिबांचा कळवळा येत असतो? आता गरीब पूर्वीसारखे गरीब नाही राहिले. मुंबईच्या तथाकथित झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन बघा. घराघरांत मोटरबाइक, स्मार्टफोन, फ्रीज, टीव्ही, गिझर आणि काहींकडे एअर कंडिशनर देखील लागलेत. राहतील अगदी छोट्या खोल्यांत पण सगळं काही भरलंय त्या छोट्या घरांत. जर गेल्या काही वर्षांत एवढ्या लोकांकडे एवढी गॅजेट्स आली आहेत, तर उरलेल्या गरिबांकडे देखील येतीलच ना? तुम्ही आपले त्यांना गरीब गरीब म्हणतात; मग ती लोक चढून बसतात आणि सरकारकडून अजून काहीबाही फुकटात पदरात पडून घेतात...’’ माझा एक विद्यार्थी देशातील दारिद्र्य या विषयावरील लेक्चरनंतर मला सल्ला देत होता.
अर्थशास्त्राचा, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स व तत्सम विषयांचा काही अभ्यास नाही, वाचन नाही आणि तरी असे तारे तोडणारे अनेक जण भेटत असतात. विद्यार्थीच नाही तर अगदी मध्यमवर्गीय प्रौढ माणसेदेखील. त्यातील बहुसंख्य स्वतः किंवा त्यांचे वडील अतिशय हलाखीत, चाळीत, निम्न मध्यमवर्गीय वस्तीमध्ये वगैरे वाढलेले असतात. त्यामुळे त्यांच्या गरिबीतून बाहेर येण्याच्या कल्पना टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन असणे किंवा नसणे यापुढे जात नाही. अनेकांना आजच्या गरिबांमध्ये आपल्या भूतकाळाचे प्रतिबिंब दिसते; त्यातून एकप्रकारचा दुस्वास देखील असतो.
आपल्या देशात दारिद्र्यरेषेची व्याख्या दिवसाला किती कॅलरीज शरीराला मिळाल्या अशा संकुचित व्याख्येपासून सुरुवात झाली. गाईने किंवा म्हशीने अमुक एक लिटर दूध देण्यासाठी तिला किती किलो चारा खायला घालायला पाहिजे या धर्तीवर अशा व्याख्या बनतात. माणूस म्हणजे स्वप्नं, माणूस म्हणजे आकांक्षा, माणूस म्हणजे स्वतःचे सुखी कुटुंब तयार करणे, माणूस म्हणजे आपल्या पोटच्या मुलांना राजा किंवा राणी बनवणे, त्यासाठी खस्ता खाणे, माणूस म्हणजे सर्व प्रकारचा उपभोग किमान चाखावासा वाटणे, मौजमजा... अशी व्याख्या केली तर? हे तर खूप पुढचे राहिले; पण गरिबीच्या, दारिद्र्याच्या संकल्पनेवर अजून अजून चर्चा घडवून आणल्या पाहिजेत.
दारिद्र्याच्या व्याख्येमध्ये खालील निकषांचा समावेश का नाही?
- गरीब कुटुंबात एका चौरस मीटरमध्ये किती सभासद कोंबून राहतात?
- गरिबांपैकी किती जणांची आपल्या मालकीची घरे आहेत आणि भाडेतत्त्वावर किती जणांची आहेत?
- गरीब कुटुंबात लग्न झालेल्या तरुण-तरुणींना प्रायव्हसी किती मिळते?
- गरीब कुटुंबे शौच कोठे करतात?
- गरीब कुटुंबातील दरडोई पाण्याची उपलब्धता किती?
- ते जेथे राहतात तेथे सांडपाणी, घनकचरा आणि हवेची गुणवत्ता काय असते?
- गरीब कुटुंबाच्या मासिक मिळकतीपैकी किती टक्के रक्कम वीजबिल, टँकर पाणी, सार्वजनिक वाहतूक यावर खर्च होते?
- स्त्रियांच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण किती आहे?
- गरीब कुटुंबातील सभासदांचा बॉडी मास रेशो किती आहे?
- मध्यम/ उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाच्या तुलनेत गरीब घरातील सभासदांचे सरासरी आयुर्मान किती आहे?
- घरातील शिक्षणाचे प्रमाण, घरात अभ्यास करावासा वाटेल असे वातावरण, अभ्यासाला जागा यांची स्थिती काय आहे?
- गरीब कुटुंबातील माणसे म्हातारी झाली, हातपाय चालेनासे झाले तर ते कोणावर अवलंबून असतात?
- गरीब कुटुंबातील कर्जबाजारीपणा वाढता आहे का कमी होतोय? एकाच वेळी किती जणांकडून ते कर्जे घेतात?
ही तर वानगीदाखल यादी आहे. दमछाक होईल गरिबीच्या, दारिद्र्याच्या अशा निकषांची यादी करायची म्हटली तर. त्यामुळे कोणत्याही सर्व्हेत या निकषांचा समावेशच नसतो, असला तर परिघावर.
कारण सत्तेवर कोणताही पक्ष असो आणि कोणीही पंतप्रधान; आपल्या राज्यात दारिद्र्यरेषेच्या खाली असणाऱ्यांची संख्या घटत आहे हे आणि हेच त्यांना सिद्ध करायचे असते. दारिद्र्यरेषेचे निकष तर तुम्हीदेखील काढू शकता. अट एकच. जसे जंगलात सिंह, हत्ती, हरिण असे प्राणी असतात, त्या धर्तीवर मानवी समाजात श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब असे प्रकार नसतात; नसले पाहिजेत या मूल्यावर विश्वास हवा. अट एकच. स्वतःशी/ स्वतःच्या भौतिक आकांक्षांशी प्रामाणिक राहून मगच गरिबांकडे बघायचे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.