अरुणाचली हा सूर्य तापतो...

पश्‍चिमेला भूतान, पूर्वेला म्यानमार, उत्तरेला चीनव्याप्त तिबेट अशा आंतरराष्ट्रीय सीमांशी जोडलेले हे राज्य भारतातील आसाम (Assam) आणि नागालँडशी जोडलेले आहे.
Arunachal Pradesh
Arunachal PradeshAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

भारताच्या ईशान्येकडील लहान, मात्र तितकेच महत्त्वाचे राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh). या राज्यामधील डोंग (Dong) या लहानशा गावावर भारतातील सर्वांत प्रथम सूर्यकिरणे पडतात. म्हणूनच या राज्याचे नाव ‘अरुणाचल’ पडले. हिमालयीन पर्वतराजीच्या संरक्षणातील या राज्यावर वातावरण बदलांचा प्रभावही अधिक पडतो.

पूर्वी केंद्रशासित असलेल्या या राज्याला २० फेब्रुवारी १९८७ ला राज्याचा दर्जा मिळाला. पश्‍चिमेला भूतान, पूर्वेला म्यानमार, उत्तरेला चीनव्याप्त तिबेट अशा आंतरराष्ट्रीय सीमांशी जोडलेले हे राज्य भारतातील आसाम (Assam) आणि नागालँडशी जोडलेले आहे. या राज्यात तब्बल २६ आदिवासी जाती आणि त्यांच्या १०० पर्यंत उपजाती राहतात. वातावरण बदलाच्या स्थानिक संवेदनशीलतेमध्ये या आदिवासींचे असणे आणि जगणे दोन्हीही अतिशय महत्त्वाचे आहे.

ब्रिटिश अधिकारी हेन्री मॅकमोहन यांनी १९१३-१४ मध्ये त्या वेळी स्वतंत्र असलेल्या तिबेटबरोबर बोलणी करून ८९० किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा ठरवली. तिला ‘मॅकमोहन रेषा’ (McMahon Line) असे म्हणतात. या सीमेवरील तवांग हे या राज्यामधील सर्वांत सुंदर शहर. तेथील बौद्ध मठ (मोनेस्ट्री) या रेषेला लागूनच असल्यामुळे चीनशी असलेल्या सीमेच्या वादामध्ये या शहराचा नेहमीच उल्लेख येतो.

नदीकाठावरील भात शेती होतेय नामशेष...

अरुणाचल प्रदेशमधून वाहणाऱ्या अनेक नद्या आसाममार्गे बांगला देशात जातात. पुढे बंगालच्या उपसागराला मिळतात. तिबेटच्या बर्फाच्छादित पठारावर उगम पावणाऱ्या या नद्या बारमाही असून, सातत्याने वितळणाऱ्या बर्फामुळे प्रवाहाचा वेगही वाढत आहे. आजच्या जागतिक तापमानवाढीच्या काळामध्ये जास्त संवेदनशील नद्यांमध्ये खेमना, सुभानसिरी, ब्रह्मपुत्रा, दिबांग, लोहित आणि नोवादिहिंग यांचा समावेश होतो.

या नद्यांवरच अरुणाचल प्रदेशातील शेती, जैवविविधता आणि जंगलाची समृद्धी जपली जाते. या सर्व नद्या ब्रह्मपुत्रेबरोबरच वाहत आसाममध्ये येतात आणि तिथे तिला मिळतात. यांना अनेक उपनद्याही आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये जंगलतोडीचे प्रमाण अधिक आहे. झाडांचे आच्छादन कमी झाल्यामुळे त्या भागात सूर्यकिरणांचे परावर्तन जास्त होते. अशी परावर्तित किरणे वातावरणही उष्ण करतात. त्याचा अंतिम परिणाम बर्फ वितळून नद्यांना पूर येण्यात होतो. नदीचे पात्र मोठे होत चालले आहे.

Arunachal Pradesh
एकात्मिक सिंचन प्रणालीतून ​शाश्‍वत शेती शक्य: जैन

स्थानिक लोकांच्या मते, या राज्यातील अनेक नद्यांची पात्रे रुंद झाली आहेत. पूर ओसरल्यानंतर नदीने व्यापलेला भूभाग उघडा पडतो. पुन्हा या भागाचे तापमान वाढते. म्हणजे हे चक्र सुरू राहते. पूर्वी या नद्यांच्या काठी शेतकऱ्यांची स्थानिक सुगंधी भाताची शेती फुलत असे.

पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना ‘मनरेगा’अंतर्गत कामे करण्यावाचून पर्यायच उरत नाही. शेतीचा मालक असलेल्यांनाही सामान्य भूमिहीन मजुरांप्रमाणे सरकारी योजनांवर जगण्याची नामुष्की ओढवते. एकूणच राज्याच्या कृषी क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होतो. त्यातच या सर्व शेत जमिनीमध्ये आम्लता वाढत आहे. शेती नापीकच होण्याची शक्यता, भीती वाढत चालली आहे.

अरुणाचल प्रदेशातील सेऊओसा (seuosa) क्षेत्रामधून वाहणाऱ्या पाक्के (pakke) या नदीचा अभ्यास पर्यावरण शास्त्रज्ञांनी केला होता. त्यामध्ये जंगल तोडीमुळे नदी दोन्हीही तीरावर आतपर्यंत पसरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती कायमची नष्ट झाल्याचे आढळले. येथील अपर सियांग (upper Siang) जिल्हा वातावरण बदलासाठी जास्त संवेदनशील झाला आहे. मागील तीन दशकांपासून या जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी पावसाचे प्रमाण वाढतच चालले आहे.

उरलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे भाताचे उत्पादन घसरत आहे. त्यातच जमिनीमध्ये कायम पाणी राहिल्यामुळे नवीन किडी व रोगांचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात पिकणाऱ्या भातावरही (Paddy) ते डल्ला मारतात. येथील सियांग नदी पावसाळ्यात सर्व सीमा ओलांडून तीस ते पस्तीस फूट पाणीपातळी वाढून वाहू लागते. तिच्या काठावर भात शेती (Paddy Cultivation) करणे केवळ अशक्य बनले आहे. २००० ते २०२० या वीस वर्षांमध्ये काहीही बदल झाला नाही.

उलट शेतकऱ्यांच्या सर्व शेतात अजूनही नदीची वाळू पसरलेली आहे. पूर ओसरल्यानंतर वाढणारे तापमान आणि सातत्याने वाढणारा पाऊस यामुळे येथील शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. थोड्या उंचावर शेती असलेल्यांनी स्थानिक संत्रा जातींच्या बागा लावल्या आहेत. या बागांमध्ये पूर्वीचे भात उत्पादक मजुरी करत आहेत.

बदलाचा वेग प्रचंड...

सियांग नदी काठावरील मोईंग (Moying) आणि रामसिंग या गावामधील पारंपरिक शेती करणारे स्थानिक शेतकरी म्हणतात, ‘‘१५ ते २० वर्षांपूर्वी आमच्या शेतामध्ये राबताना समोर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे खुणावत असत. आता दूरपर्यंत बर्फाचा कणही शिल्लक दिसत नाही. बर्फाच्छादित शिखरे असताना शेती आणि हवामान खूपच छान होते.

Arunachal Pradesh
शेतीमाल विक्री व्यवस्थेतील उपाययोजना

पाऊस नेहमी सारखा, तर हिवाळा आणि उन्हाळा आल्हादकारक होता. वर्षातून तीन वेळा पिके व उत्पादन घेत होतो. आता शिखरे बर्फविरहित असली तरी प्रचंड थंडी पडत आहे. उन्हाळा सहनशीलतेच्या बाहेर गेला आहे. पूर्वीच्या स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होत चालल्या असून, बाहेरील वनस्पतींचे वर्चस्व वाढत आहे. त्यांना जनावरेही तोंड लावत नाहीत. फक्त आंबा बागेला थोडा फार फायदा झाला आहे. आंबा भरपूर फळे येऊन चांगले उत्पादन मिळू लागल्याने या भागात आंबा लागवड (Mango Cultivation) वाढू लागली आहे.’’

जैवविविधता घसरत चालली आहे...

रामसिंग (Ramsing) गावामध्ये पूर्वी ‘मोरमा’ या स्थानिक भाताचे सुगंधी वाण हेक्टरी सुमारे १०० क्विंटल उत्पादन देई. हे उत्पादन खालच्या सपाट जागेपेक्षा दोन तीन पटीने जास्त होते. मात्र आता ते अर्ध्यावरच आले आहे. तामी या येथील भरडधान्याचे उत्पादन अर्ध्यापर्यंत घसरले आहे. जमीन तीच, सेंद्रिय खतेसुद्धा (Organic Fertilizers) उपलब्ध असली तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक वातावरण उपलब्ध होत नाही. संत्रा, फणसांची झाडे फळांनी लगडलेली असत. ते उत्पादनही इतके घसरले आहे, की बस्स...

पूर्वी फक्त पावसाळ्यात खूप झरे, धबधबे दिसत. मात्र ते वर्षभर दिसतात. त्यांचा प्रवाहही वाढत चालला आहे, संथ वाहणारे पाणी न राहिल्यामुळे पूर्वी मिळणारे ३० प्रकारचे स्थानिक मासे कमी झाले आहे. नागोकी (ngokiy) सारखे चवदार मासे तर गायबच झाले आहेत. पातूक (patuk) हा येथील रेशीम कीटक बदलत्या वातावरणामुळे कोषच तयार करत नाही. या भागात पूर्वी अनेक धनेश पक्षी, उडत्या खारी दिसत. आता क्वचित कुठेतरी त्यांचा आढळ होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com