
कोल्हापूरला नुकतेच एक कलेक्टर बदलून नवीन आले होते. कलेक्टर पदावर त्यांची ही पहिलीच नेमणूक! पावसाळ्याच्या दिवसांत एका रात्री अचानक पावसाचा जोर अधिकच वाढत गेला.
नद्यांचं पाणी भराभर (River Flood) वाढू लागलं. पंचगंगेला पूर आला आणि वेदगंगेचं पाणी पात्र सोडून बाहेर पडलं. कागलच्या तहसील कचेरीत सगळ्यांची धावपळ उडाली.
सतत तीन दिवस प्रचंड पाऊस (Heavy Rainfall) कोसळत राहिला. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं होतं. घरांची पडझड झाली, कित्येक जनावरं वाहून गेली आणि शेतीची अतोनात हानी (Agriculture Land Damage) झाली होती.
पहाटे कलेक्टर स्वतः कचेरीत आले, शिपायाने वायरलेस संदेश टेबलावर ठेवला. वस्तुस्थितीची थेट माहिती घेतली आणि सूचना दिल्या. मंत्रालयातून आपद्ग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय झाला.
बाधीत लोकांना तातडीने मदत देण्याचे काम कलेक्टरांनी आदेश दिले आणि ते स्वतः गावांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले.
कलेक्टरांची कार दुपारी खानापूर गावांत शिरली. गावातली लहान पोरं गाडीमागे पळू लागली. पाटील, सरपंच, तलाठी यांची धांदल उडाली. गावचे पुढारी बाबासाहेब पुढे झाले आणि हातानेच त्यांनी पडलेल्या घरांची दिशा दाखविली.
चावडीच्या पुढे वळणावर म्हातारी जनाबाई काठी हातात घेऊन भिंतीला टेकून उभी होती. आजूबाजूच्या बायकांकडे हातवारे करून ओरडून सांगत होती, ‘‘मेलं, माझं गरिबाचे घर पडलंय पर ते बघाया हिकडं का येईनात?’’ कलेक्टर घाईघाईनं चावडीकडं निघाले, तशी जनाबाईनं उचल खाल्ली.
भिंतीला मागं जोर देत ती मोठ्याने ओरडून सांगू लागली, ‘‘आम्हा गरिबाचं घर पडून किती नुकसानी झाली? कलेक्टरांचे लक्ष म्हातारीकडे वळले. मामलेदार, तलाठी, गावचे पुढारी साहेबांच्या मागे गेले. कलेक्टरांनी अगदी आदबीनं जनाबाईला विचारलं, ‘‘आजी काय म्हणणं आहे आपलं?’’ ‘‘माझं बी घर पडलंया. परं तलाठी पंचनामा करीत न्हाय.
गरिबाला मदत द्यायची न्हाय का?’’ त्याबरोबर कलेक्टरांचा पारा चढू लागला. तलाठ्याला जवळ बोलावून त्यांनी खडसावून विचारले, ‘‘या बाईच्या घराचा पंचनामा का केला नाही?’’ साहेब, ‘‘तिचे कायबी नुकसान झालेलं नाही.’’
सरपंचांनी मध्येच खुलासा केला. त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी तलाठ्याकडं पाहिलं. त्यावर घाबरलेल्या स्वरात तो म्हणाला, ‘‘साहेब पावसानं तिच्या घराचं खरंच काही नुकसान झालेलं नाही.
कलेक्टर म्हातारीला म्हणाले, ‘‘चल, तुझं घर दाखव बघू.’’ बाहेरून घर चांगलं दिसत होतं. आतल्या खोलीत घेऊन जात म्हातारी साहेबांना म्हणाली, ‘‘साहेब, हे बघा, समदं धान्य भिजून गेलया, रातीचं झोपाया जागा राहिली न्हाय,
तिनं चुलीच्या वरच्या कोपऱ्यात छपराच्या खाली पडलेली भिंत दाखवली. संपूर्ण भिंत पावसानं ओली झाली होती. भिंतीचा, वरचा अंदाजे एक फूटभर रुंदीचा कोपरा पडला होता.
कलेक्टरांनी ते पाहिलं आणि, ‘‘आजी, काही काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळेल,’’ असा दिलासा दिला, तेव्हा म्हातारी सुखावली.
रात्री अनेक गावे फिरून, कलेक्टर बंगल्यावर पोहोचले. तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते. त्यांची आई, ते येण्याचीच वाट पाहत होती. आईनेच जेवताना विषय काढला. ‘‘नुकसान फार झालंय, आई, हजारो घरं पडलीत.’’
असं म्हणत त्यांनी दिवसभर घडलेला वृत्तांत सांगितला. आईला आपल्या मुलाचा अभिमान वाटला. खानापूरच्या म्हातारीची गोष्ट ऐकून तर आईला रडू कोसळलं.’’ ‘‘असे उपयोगी पडावं लोकांच्या, मोठ्यांचे आशीर्वाद घेशील, तर सगळे बरे होईल बघ.’’ असं ती म्हणाली.
इकडे जना म्हातारी खुशीत होती. जरा लवकरच तिनं काट्याकुट्या गोळा केल्या आणि चुलीला जाळ लावला. तव्यावर एक भाकरी टाकून आणि निखाऱ्यावर दुसरी भाकरी हातांनी उभी धरीत ती आपल्या नातवाला म्हणाली,
‘‘आनंदा, जगात वागायचं म्हंजी हुशार व्हायाचं, बाबा! आरं, काठीनं ढकलून ढकलून भिंतीचा कोपरा पाडला तवा कुठं पंचनामा होण्याएवढं भगदाड पडलं.
आता आपल्याला आठ हजार रुपये मदत मिळणार. जगाचं आसं हाय बाबा. असं वागशील तवा तू मोठा होशील.’’
तिचा नातू आनंदा म्हातारीकडं कौतुकानं पाहू लागला. चुलीच्या जाळाच्या प्रकाशात तांबड्या झालेल्या तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसत होतं. तिच्या डोळ्यात चमक होती आणि त्यात आनंदाबद्दल उद्याची आशा भरलेली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.