Farmer Problems: आत्महत्याविरोधी लसीकरण

जेव्हा शेतकऱ्यांसारख्या एका वर्गाचे लोक जणू एखादा साथीचा आजार पसरावा त्याप्रमाणे आत्महत्या करू लागतात, तेव्हा मात्र समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने चालतो आहोत याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे असे म्हणावेसे वाटते.
Farmer Problems
Farmer ProblemsAgrowon

डॉ. हमीद दाभोलकर

स्वतःला जिवापाड जपणारी अनेक माणसे आपण आजूबाजूला बघतो. स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीवसुद्धा घ्यायला न कचरणारी माणसे देखील समाजात दिसून येतात.

या पार्श्‍वभूमीवर जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हाताने संपवून घ्यायचे ठरवते तेव्हा मात्र आपण गोंधळून जातो. तरी देखील जगण्याचा ताण असह्य झाल्यामुळे त्या व्यक्तीने असे केले असेल, अशी आपण स्वतःची समजूत घालतो.

पण जेव्हा शेतकऱ्यांसारख्या एका वर्गाचे लोक जणू एखादा साथीचा आजार पसरावा त्याप्रमाणे आत्महत्या (Suicide) करू लागतात, तेव्हा मात्र समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने चालतो आहोत याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे असे म्हणावेसे वाटते.

गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या देशात तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हाताने संपवले आहे. भारताने लढलेल्या कुठल्याही लढाईत मृत्युमुखी पडलेल्या अथवा दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या किती तरी जास्त भरेल.

असे असताना युद्धासाठी शस्त्र सज्जता व दहशतवादी हल्ल्यांना विरोध यासाठी राष्ट्र म्हणून आपण करीत असलेल्या प्रयत्नांच्या एक शतांश देखील प्रयत्न आपण आपल्या शेतकरी वर्गाचे हे स्वतःला संपवून घेणे थांबवण्यासाठी करतो आहोत का, हा प्रश्‍न आपल्या सर्वांनीच स्वतःला विचारला पाहिजे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या, वेगवेगळी अनुदाने देण्यात आली, पण प्रत्यक्षात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत.

शेतकरी आत्महत्यांना जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतरच्या बदलत्या धोरणांचा एक खूप मोठा संदर्भ आहे. ही धोरणे शेतकरीकेंद्री व्हावीत म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेतच पण त्याबरोबरच हे देखील समजून घेतले पाहिजे, की ही धोरणे बदलणे ही एक प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये कदाचित काही दशकेदेखील जाऊ शकतात.

अशावेळी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आपण मानसशास्त्रीय पातळीवर काय करू शकतो हे समजून घेणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणे म्हणजे जणू काही आत्महत्या प्रतिबंधक विचारांची लस घेतल्यासारखेच आहे.

यामध्ये आत्महत्येचा विचार व्यक्तीच्या मनामध्ये का येतो, याची आपल्याला प्राथमिक का होईना माहिती असणे महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होण्यासाठी काही वैयक्तिक तर काही सामाजिक कारणे असतात.

Farmer Problems
Farmer Suicide : परभणी जिल्ह्यात चार वर्षांत ३०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

समाजातील काही व्यक्तींचा जैविक अथवा मानसिक कारणांमुळे आत्महत्येचे विचार मनामध्ये येण्याकडे कल असतो. ताणतणावाची परिस्थिती वाढल्यास असा कल असलेल्या व्यक्ती आत्महत्या करण्याची शक्यता वाढते.

जागतिकीकरण व उदारीकरणानंतरच्या बदलत्या सामाजिक वास्तवाचा एक मोठा सामाजिक संदर्भ वाढत्या आत्महत्यांना आहे हे आपण नाकारू शकत नाही.

शेतीच्या बदलत्या अर्थकारणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे बदलत्या सामाजिकतेचा व्यक्तीच्या मानसिकतेवर होणारा दुष्परिणाम दाखवून देतात.

बदलती जीवनशैली, कुटुंब व्यवस्थेचे बदलते रूप हे देखील आत्महत्यांच्या मागचे एक सामाजिक करण आहे. टोकाच्या ताणतणावांच्या प्रसंगी कुटुंबातील आधार हा खूप मोलाचा ठरतो अशावेळी बदलत्या कुटुंब व्यवस्थेने निर्माण झालेली पोकळी घातक ठरू शकते.

जैविक कारणांमध्ये काही प्रमाणामध्ये आनुवंशिकता तसेच मेंदूमधील सिटोरोनीनसारख्या रसायनामधील असमतोल अशी कारणे येतात तर मानसिक कारणांमध्ये ‘औदासिन्याचा आजार’ व ‘व्यसनाधीनता’ ही व्यक्तीला आत्महत्येकडे घेऊन जाणारी दोन प्रमुख कारणे समजली जातात. त्याचबरोबर स्वभावामधील टोकाचा उतावळेपणा व राग हा देखील अनेकदा आत्महत्येला कारणीभूत ठरू शकतो. आपण हे लक्ष्यात घेतले पाहिजे.

की शेतीविषयक धोरणांचा प्रभाव हा सर्व शेतकऱ्यांवर पडतो पण त्या मधले काही जण निर्धाराने झुंजायचे ठरवतात तर काही आत्महत्येच्या वाटेने जातात.

ज्या शेतकऱ्यांमध्ये वरील कारणांच्या मुळे झुंजायची क्षमता कमी झालेली असते ते आत्महत्या करण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशा शेतकऱ्यांना आधार देणे हे आपले पहिले कर्तव्य ठरते.

Farmer Problems
Farmer Suicide : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून १८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

योग्य वेळी मिळालेला भावनिक आधार हा अनेक वेळा औषधाच्या इतकाच प्रभावी ठरू शकतो. म्हणून आपल्या आजूबाजूला असा विचार मनात येणारे कोणी असतील तर त्याला भावनिक आधार देणे आणि मानसिक आरोग्याच्या तज्ज्ञाला भेटवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा प्रसंगात आपल्याला उपयोगी पडणारी आणखी काही कौशल्ये पुढच्या भागात बघूया...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com