Nagnathanna Naikwadi : वेटरला जवळ बसवून चहा पाजणारे नागनाथअण्णा!

अण्णांना पहिल्यांदा भेटलो वाळव्यात. घोंगडं टाकून किसन अहिर शाळेत बसले होते. आमच्यात तासभर दिलखुलास गप्पा झाल्या.
Nagnathanna Naikwadi
Nagnathanna Naikwadi Agrowon

लेखन- कुलभूषण बिरनाळे

शून्यातून सुरवात करून देशसेवेचं आणि जनसेवेचं व्रत आपल्या प्राणापेक्षा मोठं समजून जपलेले, राजवैभव हाताशी असताना सुद्धा आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेले आणि मृत्यूनंतरही लोकांच्या चिरंतन स्मरणात राहिलेले अण्णा म्हणजेच जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (Nagnathanna Naikwadi) !

अण्णांना पहिल्यांदा भेटलो वाळव्यात. घोंगडं टाकून किसन अहिर शाळेत बसले होते. आमच्यात तासभर  दिलखुलास गप्पा झाल्या. तिथे साखर कारखान्याचे नवीन तंत्रज्ञान घेवून एका इस्रायली कंपनीचे अधिकारी लोक आले होते. मला मग मराठी आणि इंग्रजी संभाषणासाठी दुभाषाचे काम करायची संधी चालून आली. अण्णा माझ्यावर खूष झाले आणि तिथून आमच्यातल्या स्नेहपर्वाला सुरवात झाली.

एकदा त्यांच्या बरोबर गाडीने येताना एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबलो. अण्णा, मी आणि त्यांच्या गाडीचा  चालक असे तिघे असताना अण्णांनी वेटरला चार चहा आणायला सांगितले. मी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहिलं तर डोळ्यांनीच थोडं थांब असा इशारा केला. वेटर चहा घेऊन आल्यावर त्याला आमच्या बरोबर बसायला सांगून चहा घ्यायला सांगितले. तो काही तयार होईना. संकोचला.

``आरं लेका, दिवसभर आमच्यासारख्या येणाऱ्या-जाणाऱ्या लोकास्नी तू च्या देत ऱ्हाणार, तुला कोण पाजीवनार ? बस हितं.`` वेटर म्हणाला, ``आमचा मालक कावंल मला.`` तसं अण्णा काउंटरवर बसेलेल्या मालकाला बोलवून घेऊन वेटरसाठी चहाची परवानगी मागितली. मालक सहज तयार होईना. वेगवेगळी कारणे देऊन टाळू लागला. तसं न राहवून अण्णांचे चालक म्हणाले. ``ओ मालक, हे नागनाथ अण्णां हायत. किती किरकिर करतायसा, आं ?``

तसा मालक झटकन पुढे आला आणि अण्णांच्या पाया पडला. माफी मागू लागला. मालकाने स्वतः वेटरला समोरच्या खुर्चीवर बसवला. स्वतःही बरोबर बसण्याची अण्णांना विनंती केली. अण्णांनी सहजगत्या मान्य केली. मग अण्णांनी अत्यंत आत्मीयतेने वेटरची, त्याच्या घरच्यांची चौकशी केली. आपला फोन नंबर दिला. काही कमी-जास्त लागलं तर सांगत जा म्हणाले. मालकाला सुद्धा त्याची नीट देखभाल करायची विनंती केली. निघताना मालकाने अण्णांसोबत फोटो काढून घेतला.

अण्णा बंडीच्या खिशातून पैसे काढून बिल देऊ लागले पण मालकाने ते घ्यायला नकार दिला. अण्णांनी त्याला दरडावून बिल घ्यायला लावलं. मी हे पैसे देवासमोर कायमचं ठेवून देईन म्हणत मालक पुन्हा अण्णांच्या पायाशी गेला. अण्णांनी त्याला उठवून छातीशी धरलं. आभाळाएवढं मन असणं म्हणजे काय तर ते हे !

अजून एक असाच प्रसंग आठवतो. साखर कारखान्याचे  काही सभासद शेतकरी अण्णांकडे तक्रार घेवून आले. वर्षभर कष्ट करून आम्ही ऊस पिकवायचा आणि उसाच्या वाड्याचा मोठा हिस्सा उसतोड मजुरांना ज्यास्त का म्हणून द्यायचं असं त्यांच म्हणणं होतं. अण्णांनी शांतपणे सर्वांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. कारखान्याच्या चीफ अकौंटंटला फोन करून असेल तेवढी रोख रक्कम घेऊन त्वरित तिथे यायला सांगितल.

अकौंटंट आल्यावर त्याला आदेश दिला. यां सर्वांच्या वाड्यापाई होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईचा हिशोब करून रोखीने ताबडतोब द्या. अकौंटंट कामाला लागला. मग शेतकऱ्यांकडे वळून अण्णा म्हणाले, आता माझी तुमच्याकडे एक मागणी आहे. तुम्ही सगळेजण फक्त एक महिना त्या उसतोड मजुरांच्या झोपडीत राहायचं, दुसरं काही करायचं नाही. सर्व शेतकऱ्यांनी लाजून माना खाली घातल्या. तसं अण्णां समजुतीच्या स्वरात बोलू लागले.. आरं लेकानों, ही गरीब लोकं पोट भरायला मराठवाडा सोडून तुमच्या गावात येत्यात.

Nagnathanna Naikwadi
Irrigation Scheme : मुख्यमंत्री सिंचन योजनेतून मिळणार वैयक्तिक शेततळे

मुळातली शापित लोकं ही. तुमच्या उसाच्या वाड्याच्या पातीनं अंगाची खांडोळी करून घेत्यात, ऊसाची मोळी उचलून कंबर मोडून घेत्यात आणि मरणाच्या थंडीत चगाळ्याच्या खोपीत कुडकुडत झोपत्यात. तुमची सुबत्ता हुबी हाय ती त्यांच्या कष्टानं. वाडं विकून त्यास्नी उरलेल्या ७ महिन्याची बेजमी कराया लागते. आरं, ती मानसं बी फाटकी आणि त्यांचा संसार बी फाटका. तुमी त्यांच फाटलेलं शिवणार काय अजून त्याचं फाडत बसणार ? सांगा बरं मला...

सगळे शेतकरी माफी मागत अण्णांच्या पाया पडायला वाकले तसे अण्णा बापाच्या मायेनं त्यांच्या पाठीवरनं हात फिरवतात. आपल्या सभासदांच्या मर्जीविरुद्ध जाऊन अनामिक मजुरांचं हित सांभाळणारा असा साखर कारखानदार मी अजून तरी पाहिला नाही. अण्णा राजकारणात सुद्धा सक्रीय होते. दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते पण आपल्या ध्येयवादाशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. `क्रांतिवीर` ते स्वातंत्र्याच्या आधीही होते आणि नंतरही !

अण्णांची मानवतावादी भूमिका खऱ्या अर्थाने वैश्विक होती. किल्लारीच्या भूकंपात अनाथ झालेल्या १११ मुलांना अण्णांनी दत्तक घेतलं होतं. साल २००७-८ च्या दरम्यान अनाथ मुलांसाठी निवासी संकुल सुरु करायचा संकल्प माझ्या मनात अव्याहतपणे घोळत होता. ती संस्था म्हणजे मुलांचं स्वतःचं हक्काचं घर असावं, ते पूर्णपणे लोकसहभागावर आधारित म्हणजे सरकारी निधीशिवाय चालणारं असावं असा माझा संकल्प होता. पण शासकीय लालफितीची भीती आणि सरकारी निधीशिवाय शाश्वतपणे चालवू शकू का या दोन्ही गोष्टींबाबत मनातून साशंक होतो.

मी अण्णांशी या विषयावर बोललो, थोडं घाबरतच. अण्णांनी माझी मानसिक स्थिती ओळखली. म्हणाले, ``अरे, तुम्हीं एवढी प्रामाणिक मानसं. काम एवढं पुण्याईचं. खरं तर देवाचंच काम हे. आणि एवढी भीती कशापायी ? आणि सरकारला काय भ्यायचं ? आम्ही ट्रेन लुटली, जेल फोडली तवा नाही घाबरलो जगावर राज्य केलेल्या ब्रिटीश सरकारला. आता तर आपलं, जनतेचं सरकार हाय, त्यांची भीती कशापाई ? करा सुरु. पण प्रमाणिकपणा जपा. ते जपला की लोकंच तुम्हांला शोधत येतील, तुमची प्रश्न सोडवतील आणि संस्थापण चालवतील.``

आम्हाला अपेक्षित असलेलं पाठबळ, आशीर्वाद मिळाला आणि २००८ साली बालोद्यान या नावाने आम्ही संस्था सुरु केली. अण्णांचा शब्द तंतोतंत खरा ठरत गेला आणि १० वर्षानंतर आजही ठरत आहे. इथे सरकारी मदतीशिवाय ६० अनाथ मुलं आपलं सुंदर आयुष्य घडवत आहेत आणि पुढे शेकडो मुलं अशीच घडत राहतील, हा विश्वास आणि द्रष्टेपना आम्हांला दिला तो अण्णांनी !

Nagnathanna Naikwadi
Glyphosate : राज्यात ‘पीसीओ’ यंत्रणा उभी राहणे शक्य

अण्णा जेवढे कणखर आणि निडर वृत्तीचे होते तेवढेच ते हळवे आणि मनस्वी स्वभावाचे होते. १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या अशाच एका धामधुमीत अण्णा आणि त्यांचे सहकारी सातारा जेल फोडून अंधारात पसार झाले. पोलिसांनी पाठलाग सुरु केला. गोळीबार सुध्दा केला. त्यात त्यांचे जिवलग मित्र किसन अहिर धारातीर्थी पडले. त्यांची आठवण सदैव राहावी म्हणून अण्णांनी सुरु केलेल्या सर्व शिक्षणसंस्था, शेतकरी संस्था, उद्योग संस्थाना आपल्या परममित्राचं नाव दिलं - हुतात्मा किसन अहिर.

पुढे अण्णांकडे राजवैभव चालून आलं असताना सुद्धा शेवटपर्यंत अण्णा एका व्रतस्थ फकिराचं जीवन जगत राहिले. अण्णा झोपायला किसन अहिर शाळेतल्या एका खोलीत असायचे तेही फक्त एका घोंगड्यावर. पुढे अण्णांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला. महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने तर भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. लोकसेवेचं व्रत आणि स्वच्छ चारित्र्य अण्णांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपलं.

२००८ साली शिवाजी विद्यापीठाने दोन कर्तुत्ववान व्यक्तींचा डी. लिट. पदवी देऊन सन्मान केला. त्यातील एक चौथी शिकलेले नागनाथ अण्णा आणि दुसऱ्या उच्चविद्याविभूषित सुधा मूर्ती. इन्फोसिस फाउंडेशनच्या सहसंस्थापक. त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका म्हणूनही प्रसिध्द आहेत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी होत. त्यांचे जावई ऋषी सुनक नुकतेच इंग्लंडचे पंतप्रधान झाले आहेत. तर या सुधा मुर्तींनी डी. लिट. पदवीचं सन्मानपत्र स्वीकारल्यावर ते अण्णांच्या हाती दिलं आणि अण्णांच्या पायावर नतमस्तक झाल्या, सर्वांसमक्ष !

आभाळा एवढ्या उंचीची पण स्वतःशी, समाजाशी आणि आपल्या मातीशी सदैव इमान राखून असणारी अशी माणसं पुन्हा होतील का ? की अशी माणसं इतिहासातच शोधावी लागणार?

नागनाथ अण्णांची आठवण आली की मला कवी नंदन रहाणेची कविता आठवते
जिंकुनी घ्यावे जगाला पण गाव, घर विसरू नये
चुंबूनी यावे नभाला पण ठाव, धर विसरू नये
विश्व हे धुंदावणारे लक्षरंगी मोहगाणे ...
रंगुनी गावे तया पण ... आत्मस्वर विसरू नये !

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com