सबका प्रयास, सबका कर्तव्य!

खास संथाली पद्धतीने विणलेली तिरंगी काठापदराची साडी परिधान केलेल्या मुर्मू यांनी हिंदीतून शपथ घेतली व आपले पहिले १८ मिनिटांचे राष्ट्र-संबोधनही हिंदीतूनच केले.
Draupadi Murmu
Draupadi MurmuAgrowon

नवी दिल्ली ः ‘‘आज भारतात गरीब स्वप्ने पाहू शकतो व पूर्णही करू शकतो हे माझ्या राष्ट्रपतीपदी (President) निवडीने सिद्ध केले आहे, अशी भावना व्यक्त करतानाच, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून सुवर्णमहोत्सवाकडे भारताला स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सबका प्रयास सबका कर्तव्य, या मार्गाने जावे लागेल’’, असा संदेश देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज दिला.

देशाच्या पहिल्या आदिवासी (First Tribal President) आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास रचणाऱ्या मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदी शपथविधीचा सोहळा सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी (ता. २५) सकाळी झाला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. (Draupadi Murmu Took Oath As A President)

खास संथाली पद्धतीने विणलेली तिरंगी काठापदराची साडी परिधान केलेल्या मुर्मू यांनी हिंदीतून शपथ घेतली व आपले पहिले १८ मिनिटांचे राष्ट्र-संबोधनही हिंदीतूनच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची- सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, ही घोषणा पुढे नेताना राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यास, सबका प्रयास, सबका कर्तव्य ही जोड देऊन, विकासाच्या यात्रेत नागरिकांनाही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी लागेल असाही संदेश दिला. आगामी काळात भारत जी-२० गटाचे महासंमेलन आयोजित करणार आहे व संपूर्ण जगाला दिशा देण्याच्या भारताच्या प्रवासातील हा आणखी एक टप्पा असेल असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

Draupadi Murmu
द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शपथविधी सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, कॉँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, यांच्यासह केंद्रीय मंत्री, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील,ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी आदि उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या समारंभास हजेरी लावली. दरम्यान शपथविधी कार्यक्रमानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांना गार्ड ऑफ ऑनर देण्याचा देखणा सोहळाही पार पडला.

मुर्मू यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

स्वातंत्र्योत्तर काळात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती.

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मी राजकारणात आले व या अमृतकाळात मी राष्ट्रपतीपदी पोहोचले हे माझ्यासाठी विलक्षण आहे.

माझ्यासाठी देशातील युवक व महिलांचे हित सर्वोच्च असेल.

हजारो वर्षांपासून निसर्गाशी ताळमेळ राखून जीवन जगणाऱ्या आदिवासी परंपरेत मी वाढली आहे. जंगल व जलाशयांचे महत्त्व मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवले आहे.

अनेक दशकांपूर्वी ओरिसातील रायरंगपूरमधील श्री अरविंद विद्यालयात शिक्षकाच्या रूपात सेवा करण्याची संधी मला मिळाली. आगामी काही दिवसांतच श्री. अरविंद यांची १५० वी जयंती साजरी होणार आहे. त्यांच्या विचारांनी मला कायम प्रेरणा मिळाली आहे.

राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणे हे माझ्या एकटीचे यश नाही तर भारतातील प्रत्येक गरिबाचे हे यश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com