Agriculture Irrigation : शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचं गारूड

तो एक शेतकरी. पाण्यासाठी वेडा झालेला. चोवीस तास त्याच्या डोक्यात पाणी फिरत असतं. त्याला सगळी स्वप्नंही पाण्याचीच पडतात. त्या दिवशी त्याच्या बोअरचं अर्धा इंची पाणी गेलं अन् तो हादरून गेला.
Irrigation
IrrigationAgrowon

तो एक शेतकरी. पाण्यासाठी वेडा झालेला. चोवीस तास त्याच्या डोक्यात पाणी फिरत असतं. त्याला सगळी स्वप्नंही पाण्याचीच पडतात. त्या दिवशी त्याच्या बोअरचं अर्धा इंची पाणी गेलं अन् तो हादरून गेला. आपल्या झाडांचं कसं, नवं जंगल उभारायचंय त्याचं कसं या प्रश्नांनी त्याला अस्वस्थ करून सोडलं. मनातली ही वादळं तो स्वत:च झेलत होता. स्वप्नरंजनात बुडत होता. तो पाण्यापायी भावनेत एवढा भरकटून गेला की, त्याच्या बुध्दीनं काम करणंचं बंद केलं. बस्स त्याला काहीही करून शेतात पाणी आणायचं होतं...

त्यानं नुकत्याच बोअर घेतला होता. अर्धा इंची पाणी बाहेर आलं तेव्हा किती खुष होता तो! कोणी म्हटलं, दिड-दोन इंची तरी पाणी लागायला हवं होतं. तेव्हा तो लगेच उत्तर द्यायचा, ``नाही, मला अर्धा इंचीच पाणी हवं होतं. मला जास्त पाणी नको.`` त्याला वाटायचं की, जास्त पाणी लागलं तर आपलीसुध्दा नियत बदलायची अन् ऊस लावायची इच्छा व्हायची. जमेल तेव्हा विहीरीवर जाऊन बोअरचं पाणी विहीरीत पडतयं का, हे बघणं हेच त्याचं आवडीचं काम. तीन आठवड्यानंतर एके दिवशी हे पाणी बंद झालं. त्याला धक्का बसला. दु:ख झालं. पण विहीरीत दहा-बारा फुट पाणी जमा झालयं म्हणून त्यानं समाधान मानलं.

वरवर पाहता बोअरचं पाणी गेलयं, हे वास्तव त्याने स्वीकारलं होतं. पण त्याच्या डोक्यातून काही केल्या तो विषय जात नव्हता. बोअरची मोटार, आत सोडलेले पाईप, वायर, सहाशे फुटाची पाईपलाईन... हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर नाचत राहायचं. हे सगळं आता निरूपयोगी बनलं होतं. एखादा तीन-चारशे फुटाचा बोअर घेतला आणि त्याला पाणी लागलं तरच हे सगळं पुन्हा वापरात येणार होतं. `आणखी एक बोअर घेऊन बघायला हवा` हा किडा त्याच्या डोक्यात वळवळत होता. आठवडाभराने त्याने एका मित्राला फोन करून बोअरचं पाणी गेल्याचं सांगितलं. मित्र म्हणाला, ``माझ्या माहितीतला कर्नाटकातल एक पाणाडी आहे. त्याचा भू-गर्भ शास्त्राचा चांगला अभ्यास आहे. तो पाण्याचे टप्पे सांगतो. पोकळी किती फुटावर आहे, हे ही त्याला कळतं. मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. माळावर माझ्या बोअरला पाणी लागलंय. मी फोन नंबर देतो. तुम्ही बोलून घ्या...``

Irrigation
Drip Irrigation: नेटाफिम ठिबक सिंचनातून ऊस शेतीचा कायापालट

तसा हा शेतकरी स्वत:ला बुध्दीवादी समजतो. प्रत्येक गोष्ट बुध्दीच्या निकषावर तपासून घेतो, चिकित्सा करतो, पुरावे मागतो. जमिनीखालच्या पाण्याबाबत काही अंदाज बांधता येतात, काही ठोकताळे खरे ठरतात, हे त्याला माहीत होतं. पण जमिनीखाली किती फुटावर पाणी लागेल, हे सांगणं शक्य नाही हे त्याला कळत होतं. पण पाण्यासाठी वेडं झालेलं त्याचं मन हा बुध्दीवाद मान्य करू देत नव्हतं. या अवस्थेतच त्याने पाणाड्याला फोन लावला. पाणाड्याने दुसऱ्या दिवशी यायचं कबुल केलं.

शेतकरी पाण्याची स्वप्नं बघतच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी पाणाडी आला. साधा माणूस. ढगळ कपड्यातला, अघळपघळ बोलणारा. माळकरी. शेतात आल्याबरोबर लिंबाच्या झाडाजवळचा एक पॉईंट पाणाड्याने निश्चित केला. पंचधातू व तांब्याच्या काडीने त्याने दिशा आणि जागा निश्चित केली. त्यानंतर दोन नाण्यांमध्ये एक उभं नाणं धरून तो त्या जागेवर उभा राहिला, तेव्हा मधलं उभं नाणं फिरू लागलं. त्यानंतर त्याने नारळाचा प्रयोग दाखवला. त्या जागेवर हातात धरलेलं नारळ सरळ उभं राहिलं.

Irrigation
Jayakwadi Irrigation Department : जायकवाडी पाटबंधारे विभागात ७८.५७ टक्के पदे रिक्त

पाणाड्याने त्या पॉईंटवर भाकरीचा तवा ठेवायला सांगितला. त्यावर ठेवलेल्या नारळावर दोन्ही पाय ठेऊन शेतकरी बसला. नारळ फिरू लागलं. उलट दिशेनेही नारळ फिरलं. इथं पाणी नक्की लागणार याची शेतकऱ्याला खात्री पटली. त्यानंतर पाणाड्याने लिंब, बोर, पळस व पिचुंडी तिथं असल्याचं दाखवलं. ही एकत्रित झाडं पाण्याची उपलब्धता सांगत असल्याचं पाणाडी बोलला. पाण्यासाठी वेड्या झालेल्या शेतकऱ्याला आता जमिनीखालचं पाणी दिसत होतं. .लाकडी खुंटी ठोकून बोअरचा पॉईंट निश्चित करण्यात आला. पाणाडी म्हणाला, ``८०, १८०, ३४० व ३८० फूट असे पाण्याचे चार टप्पे आहेत. १८० फुटाला पाणी लागलं तर २०० फुटाला बोअर बंद करायचा. काम चालू झालं की फोनवर सतत संपर्कात राहायचं...`` शेतकऱ्याने मान हलवली.

पाणाडी म्हणाला की,तुमच्या बंद पडलेल्या बोअरपर्यंत आपण जाऊत. शेतकरी त्याला घेऊन निघाला. त्या बोअरच्या अलिकडच्या धुऱ्यावर पाणाड्याने आणखी एक पॉईंट काढला. चारी बाजूने झरे आहेत... पाणी वरच आहे... वरच्या पॉईंटपेक्षा हा पॉईंट अधिक पॉवरफुल्ल असल्याचं त्यानं सांगितलं. इथंही तांब्याच्या कांड्या, नाणी, नारळाचा प्रयोग यशस्वी झाला. पाणाड्याने इथले पाण्याचे टप्पे सांगितले. शेतकऱ्याने डायरीवर लिहून घेतलं. ते बंद पडलेल्या बोअरवर गेले. तिथं पाणाड्यानं नाण्याचा प्रयोग केला. नाणं अजिबात फिरलं नाही. पॉईंट चुकलाय. इथं डव्ह होता, पाण्याचा साठा संपलाय....शेतकऱ्याला ते पटलं.

Irrigation
Irrigation Scheme : मुख्यमंत्री सिंचन योजनेतून मिळणार वैयक्तिक शेततळे

पाणाड्याने स्वतःबद्दलची बरीच माहिती शेतकऱ्याला सांगितली. त्याने भूगर्भशास्त्राचा डिप्लोमा केला होता. अनुभवानं स्वत:च्या पध्दती विकसित केल्या होत्या. आतापर्यंत विविध गावात घेतलेल्या बोअरपैकी ९९ टक्के बोअर यशस्वी ठरलीत. अयशस्वी ठरलेले बोअरही, काही प्रयोग करून यशस्वी केल्याचं त्याने सांगितलं. वार, वेळ, दिशा या गोष्टींचा आणि पाणी लागण्या न लागण्याचा काहीच संबंध नाही, असं पाणाडी म्हणाला तेव्हा शेतकऱ्याला पाणाड्याविषयी आदर वाटू लागला. पाणाडी अंधश्रध्दा मानणारा नव्हता. पाणाड्याला योग्य मानधन देऊन शेतकऱ्याने त्याला स्वत: बसस्थानकावर सोडलं.

शेतकरी खुषीत होता. त्याला दोन पॉईंटवर दिड-दोनशे फुटावर पाणी दिसत होतं. कधी एकदा बोअर घेऊन पाणी काढतोय, असं त्याला झालं. बोअरची मशीन सकाळीच आली. खालचा पॉईंट सुरू झाला. शेतकऱ्याने पाणाड्याला फोन लावला, ``मामा, सुरू झाली बघा मशीन.`` ``बरं झालं. फोनवर रिपोर्ट देत राहा मला.`` बघता-बघता ८० फुटाचा पहिला टप्पा ओलांडला. ओली मातीही निघाली नाही. खडकाचा थर कधी बदलतोय, याची वाट बघत भर उन्हात शेतकरी थांबल. टणक पाषाण लागला होता.

नुसता धुरळा. वारं सारख फिरत होतं. थोड्या-थोड्या वेळेला तो धुरळा त्याच्या अंगावर येत होता. उन्हानं अंगाची लाही लाही झाली होती. पण त्याचं सगळं लक्ष बोअर मशीनवर होतं. बोअरने अडिचशे फुटाची खोली ओलांडली तेव्हा त्यानं पाणाड्याला फोन लावला. ``मामा, धुरळा काही बंद होईना बघा.`` मामा बोलला, ``असं कसं व्हालंय? बघा तीनशेला बंद करा, दुसरा लिंबाजवळचा पॉईंट घ्या.`` तीनशेपर्यंत धुरळा उडवल्यावर हा पॉईंट त्याने बंद केला. मशीनवाल्याला सांगितलं की, लिंबाजवळचा पॉईंट घ्यायचाय. पहिला पॉईंट फेल गेला म्हणजे दुसरा नक्की पास होणार अशी ग्वाही त्याचं मन देत होतं. या पॉईंटवर तो स्वतः नारळावर बसला होता. लिंब, पळस, बोर, समदाडीचं झाडं, नाणं फिरणं...सगळं परफेक्ट जुळत होतं.

एकदाची मशीन सुरू झाली. पहिल्या दोन पाईपमध्ये ओली माती आली. शेतकरी खुष झाला. इथं पाणी लागणार याची त्याला खात्री पटली. पाणाड्याला फोन करून कळवलं. मध्येच ट्रकचा डिझेल पाईप गळू लागल्यानं मशीन थांबली. ती रात्री साडे दहा वाजता सुरू झाली. दिवस उन्हात गेल्यानं अन् पळापळीनं शेतकरी थकून गेला होता. आडवा झाला तर लगेच झोपला असता. पण झोपून थोडंच भागणार होतं. पाणी बघायचं होतं त्याला. धुरळा अंगावर येणार नाही, एवढ्या अंतरावर तो बसला. चाळीस फुटापासूनच इथं मांजऱ्या खडक लागला. त्याच्या आशा पल्लवीत झाल्या. मांजऱ्याच्या खाली पाणी असतंय म्हणतात. शंभर फुटानंतर मांजऱ्या जाऊन कडक पाषाण लागला.

पुन्हा धुरळा सुरू. दोनशे, तीनशे फुटावर बोअर गेला तरी धुरळा बंद होत नव्हता. कठीण पाषाण बदलत नव्हता. पाणाड्याने हा बोअर जास्तीत-जास्त ३८० फूट खोलीचा घ्यायला सांगितला होता. शेतकरी आता अस्वस्थ झाला. रात्रीचे दोन वाजले होते. त्याने पाणाड्याला फोन लावला. फोन लागत नव्हता. मशीन ऑपरेटर विचारत होता, ``आगे लेना है क्या? बंद करू मशीन...`` ``और सौ फीट लेव...`` शेतकरी बोलला. चारशे फूट संपता-संपता गिरू लागला. मातीचा थर बदललाय. पुन्हा आशा. त्याने पाणाड्याला फोन केला. ``मामा, चारशे फुटाला गेरू लागलाय. कसं करू?`` ``घ्या आणखी शंभर फूट `` शेतकऱ्यानं ऑपरेटला तसं सांगितलं. मशीन सुरू झाली. पाच-दहा फुटानंतर पुन्हा कडक पाषाण सुरू झाला. पुन्हा नुसता धुरळा अन् मशीनचा कर्कश आवाज.

आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती. त्याआधीच शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी टपकतं होतं. ऑपरेटर जवळ आला तेव्हा तो भानावर आला. ऑपरेटर म्हणत होता, ``पाचसो फीट हो गया. बस करो साब. नही लगता यहां पानी...`` शेतकऱ्यानं फोन लावला, ``मामा, पाचशे फूट गेलं बघा. पाषाण काही बदलायला तयार नाही,काय करू...`` मामा परेशान दिसला. बोलला, ``कमालच हाय. असं कसं होऊलालंय...असं कधीच घडलं नाही...शेवटचं ११० फूट घ्या अन् बंद करा...`` पुन्हा मशीन चालू झाली, धुरळा सुरू झाला. पहाट झाली होती. ६१५ फुटाला धुरळा काढतच मशीन थांबली.

शेतकऱ्यानं फोन लावला, ``मामा, ६१५ फुटाला मशीन थांबलीय. काय करू?`` ``काई काळजी करू नका. ह्या बोअरमध्ये पाणी हाय, मी काढतो. मी निघालावच.`` शेतकऱ्यानं मशीनवाल्याचा हिशोब केला. तेवढ्यात त्याच्या शेजारचा शेतकरी आला. तो म्हणाला, ``आणखी दोन-अडीचशे फूट खाली घ्या. शंभर टक्के पाणी लागतंय. आपल्या भागातली पाण्याची रेंजच ही आहे...`` त्याचा आग्रह बघून शेतकऱ्यानं मशीनवाल्याला विचारलं. पण त्याने ‘नही, हमारे पास ओर पाईप नही...` असं सांगितल्यानं शेतकऱ्याचा नाईलाज झाला. मशीन, माणसं गेली.

पाणाडी त्यादिवशी आला नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. पुन्हा त्याने फोन लावला. ``सध्या भावकीतले लई लगीन हाईत. तेवढे आटोपले की येतो.`` पाणाडी येणार याची शेतकऱ्याला खात्री आहे. शेतकरी दररोज सकाळ-संध्याकाळ दोन्ही बोअरच्या पाईपजवळ कान देऊन पाण्याचे आवाज येतात का, ते पाहतो. मध्येच तो खडा टाकून बघतो. बुडूक बुडूक आवाज आला की खूष होतो. मनातल्या मनात म्हणतो की, पाणी आलंय बोअरमध्ये. बाकी सगळं नॉर्मल आहे त्याचं. पण एवढे पैसे जाऊनही त्याचं पाण्याचं वेड काही गेलेलं नाही. त्याचा कसल्याही चमत्कारावर अजिबात विश्वास नाही, तरी त्याला वाटतंय की, अचानक या बोअरमध्ये पाणी येईल. हे बोअर फेल गेलेत असं त्याला वाटतच नाही. तो पाणाड्याची वाट बघतोय...

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com