कर्जत-जामखेड तालुक्याची दुष्काळी ओळख पुसली जाईल

शरद पवार ः अहल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त चौंडीत अभिवादन
कर्जत-जामखेड तालुक्याची दुष्काळी ओळख पुसली जाईल
Sharad PawarAgrowon

नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात दुष्काळ खूप जुना आहे. एकेकाळी येथील दुष्काळ पाहण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी शेजारच्या तालुक्यात आल्या होत्या. पण इतक्या वर्षांत येथील पाण्याचा प्रश्‍न सुटला नसून दुष्काळ (Drought) हटला नाही. आता रोहित पवार यांनी अहल्यादेवींच्या विचाराने काम सुरू केले असून, कर्जत-जामखेडची दुष्काळी ही ओळख लवकरच पुसली जाईल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.

नगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी (ता. ३१) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा झाला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार संग्राम जगताप, नीलेश लंके, माजी आमदार दादा कळमकर, भूषणराजे होळकर, माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शरद पवार म्हणाले, की अहल्यादेवींची जयंती हा ऐतिहासिक सोहळा आहे. त्यांचे कर्तृत्व नव्या पिढीला या कार्यक्रमातून पोहोचतेय. देशात अनेक महिला होऊन गेल्या पण राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचे स्मरण प्रामुख्याने होते. या तीन महिलांनी मोठे काम केलेय.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की दरवर्षी जिल्हा नियोजन समितीतून पंचवीस लाखांचा निधी दिला जाईल. येथे संग्रहालय उभारले जाईल. त्यासाठी ग्रामविकास व अन्य विभागांतून निधी दिला जाईल. धनगरवाड्यात रस्ते, पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण केले जातील. या वेळी धनंजय मुंडे, दत्ता भरणे, अण्णासाहेब डांगे, भूषणराजे होळकर यांची भाषणे झाली. यावेळी धनगर समाजातील अधिकाऱ्यांचा घोंगडी देऊन शरद पवार यांच्या हस्ते सत्कार केला.

राम शिंदे यांनी केली पहाटे पूजा

माजी मंत्री राम शिंदे हे पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज असल्याचे सांगितले जाते. चौंडीत माजी मंत्री महादेव जानकर यांनी ३१ मे १९९६ पासून पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचा पुण्यतिथी सोहळा सुरू केला. २०१५ नंतर राम शिंदे येथील जयंती महोत्सवाची धुरा सांभाळत होते. मंत्री झाल्यानंतर त्यांनी या सोहळ्याला सरकारी स्वरूप दिले. मात्र कोरोनामुळे हा सोहळा झाला नाही. आता कर्जत-जामखेडला रोहित पवार आमदार असून, त्यांनी यंदा मोठा सोहळा साजरा केला. मात्र चौंडीत राहत असूनही निमंत्रण नसल्याने त्यांनी आज पहाटे साडेपाच वाजताच अहिलेश्‍वराची पूजा केली. नंतर अहल्यादेवींना अभिवादन केले.

गोपीचंद पडळकरांना अडवले

चौंडीत शरद पवार यांच्या उपस्थितीत अहल्यादेवी होळकर यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होत असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांसह चौंडीत जायला निघाले होते. त्यांना पोलिसांनी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे पोलिसांनी अडवले. त्यामुळे पडळकर चांगलेच संतापले होते. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शरद पवार यांचा चौंडीतील कार्यक्रम संपल्यानंतर पडळकर यांचा ताफा सोडून दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com