
भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच आयसीएआर (Icar) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणजे आयएआरआय या संस्थांनी मध्य भारतातील हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी हरभऱ्याचे 'पुसा जेजी १६' (Chana Pusa JG -16 ) हे दुष्काळाला सहनशील वाण विकसित केलयं. हे वाण फ्यूजॅरियम विल्ट म्हणजेच मर आणि स्टंट रोगांना सहनशिल आहे. हे वाण कमी कालावधीचे असून दुष्काळी परिस्थीतीतही प्रति हेक्टरी २ टन उत्पादन देते. त्यामुळे देशातील मध्य विभागातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हे वाण वरदान ठरु शकेल असा दावा आयसीएआर चे संचालक ए. के. सिंग यांनी केलायं.
भारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय कृषी संशोधन संस्था, जवाहरलाल नेहरू कृषी विश्व विद्यालय जबलपूर, राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विश्व विद्यालय, ग्वाल्हेर आणि इक्रीसॅट यांच्या सहकार्याने दुष्काळी परिस्थितीला सहनशिल आणि जास्त उत्पादन देणारे हरभऱ्याचे 'पुसा जेजी १६' हे वाण विकसीत करण्यात आलं आहे. भारताचा मध्य विभाग म्हणजेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भाग, छत्तीसगड, दक्षिण राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या दुष्काळी भागात या वाणामुळे उत्पादकता वाढू शकेल. कारण या भागात अनियमीत पावसामुळे वारंवार दुष्काळी परिस्थिती उद्भवते त्यामुळे हरभऱा उत्पादनात ५० ते १०० टक्क्यांपर्यंत घट येते.
हे वाण मर आणि स्टंट रोगांना प्रतिरोधक आहे. हरभरा पिकात मर रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मर रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच रोपावस्थेत दिसून येतो. हा रोग फ्युजारियम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. मर रोगामुळे उत्पादनात १० ते १०० टक्क्यांपर्यंत घट येते. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया हा एकमेव खात्रीशिर उपाय आहे. प्रादुर्भाव जर थोड्या प्रमाणात असेल तर ट्रायकोडर्माची आळवणी करुन काही प्रमाणात या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. पण प्रभावीपणे नियंत्रण होईलच असे सांगता येत नाही कारण मर हा जमिनीतून पसरणारा बुरशीजन्य रोग असून याचा प्रादुर्भाव जमिनीत ५ ते १५ सेंमी खोलीपर्यंत असू शकतो. आळवणी केलेले द्रावण जमिनीत इतक्या खोलीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बिजप्रक्रिया न करता हरभऱ्याची पेरणी केलेली आहे त्याठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या रोगावर प्रभावी उपाय शोधने अत्यंत गरजेचे होते. म्हणून मर रोगाचा खात्रिशिर नायनाट करण्यासाठी हे वाण उपयुक्त ठरणार आहे.
वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत?
पुसा जेजी - १६ हे वाण जीनोमिक असिस्टंट ब्रिडींग तंत्राचा वापर करून विकसित केलयं. या तंत्रामध्ये आयसीसी - ४९५८ या हरभऱ्याच्या वाणातील दुष्काळी परिस्थितीला सहनशिल जनुकाचा वापर करण्यात आला. अखिल भारतीय समन्वित हरभरा संशोधन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर या वाणाच्या चाचण्या घेतल्या. यातून हे वाण दुष्काळी परिस्थितीला सहनशिल दिसून आले. हे वाण कमी कालावधीचे म्हणजेच ११० दिवसात काढणीला येते. दुष्काळी परिस्थितीतही योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी २ टनापर्यंत उत्पादन मिळते. हे वाण मर आणि स्टंट रोगांना प्रतिरोधक आहे.
'पुसा जेजी - १६' वाण महाराष्ट्रासाठी फायदेशिर आहे का?
महाराष्ट्रात जास्तीत जास्त हरभऱ्याचे क्षेत्र हे संरक्षित ओलीतीखाली येते. त्यामुळे पेरणीपुर्वी, उगवणीनंतर आणि फुलोरा अवस्थेत असे २ ते ३ वेळा पिकाला पाणी दिले जाते. महाराष्ट्रातील हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव ही गंभीर समस्या आहे. यंदा सुद्धा अमरावती भागात मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. जमिनीत ओल कमी असल्यामुळे या रोगाचे नियंत्रण सहजासहजी होत नाही. स्टंट या रोगामध्ये पिकाची वाढ होत नाही. पाने एकाच ठिकाणी आक्रसतात त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया होत नाही आणि पिकाची वाढ थांबते. ज्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. त्यामुळे हे वाण महाराष्ट्रासाठी अतीशय उपयुक्त ठरेल. कारण हे वाण पाण्याची कमतरता, मर तसेच स्टंट रोगाला सहनशिल आहे. अशी माहिती अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे कृषी विद्या विभागाचे प्राध्यापक जितेंद्र दुर्गे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.