प्रयोगशीलवृत्तीमुळे कष्टाला मिळाली ओळख

मनिषा सुभाष इंगळे यांनी जमीन सुपीकता, दर्जेदार फळ, भाजीपाला (Vegetable Production) उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon

मुकुंद पिंगळे

साकुरी निंबायती (ता.मालेगाव,जि.नाशिक) येथील प्रयोगशील महिला शेतकरी मनिषा सुभाष इंगळे यांनी जमीन सुपीकता, दर्जेदार फळ, भाजीपाला उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खते (Organic Fertilizer), कीडनाशकांचा (Pesticides) वापर करत त्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्यास सुरवात केली. याचबरोबरीने गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करत शेती विकासाची दिशा दाखविली आहे.

मनिषा इंगळे यांच्या कुटुंबाची साकुरी निंबायती (ता.मालेगाव,जि.नाशिक) येथील शिवारामध्ये ४.५ एकर शेती आहे. गेल्या सात वर्षांपासून पती सुभाष यांच्यासोबत मनिषा यांनी शेती व्यवस्थापनाला नवी दिशा दिली आहे. २०१५ पर्यंत संपूर्ण क्षेत्रावर डाळिंब लागवड (Pomegranate Cultivation) होती.

मात्र तेलकट डाग रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने २५ टन फळे तोडून फेकून देण्याची वेळ आली. या संकटावर मात करत पुन्हा नव्या उमेदीने मनिषाताई उभ्या राहिल्या. परिसरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर देण्यास सुरवात केली.

मागील दोन वर्षात डाळिंब (Pomegranate) क्षेत्र कमी करून भाजीपाला, हंगामी फळपिके घेण्यास त्यांनी सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे दीड एकर डाळिंब, दीड एकर कापूस, अर्धा एकर बाजरी आणि अर्धा एकर चारा पिके आहेत. गेल्या पाच वर्षांपासून रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) टप्याटप्याने वापर कमी करत सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावर भर दिला आहे.

यामध्ये प्रामुख्याने शेण-गोमूत्र स्लरी, जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क स्वतः तयार करून त्याच्या वापर सुरू केला. सुरवातीला शेतीतून मिळणारे पीक उत्पादन कमी होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढल्याने दरही चांगला मिळत आहे.

दरवर्षी एप्रिलमध्ये कांदा काढल्यानंतर गवार, भेंडी, गिलके, दोडके, मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर लागवड केली जाते. याचबरोबरीने उपलब्ध क्षेत्रानुसार पपई व टरबूज लागवड असते. उत्पादनाला चांगली चव, दर्जा असल्याने ग्राहकांची वाढती मागणी असते. शेणस्लरी आदी सेंद्रिय खतांच्या उत्पादनासाठी शेण, गोमूत्राची आवश्यकता असते. त्यासाठी त्यांनी देशी गायीचे संगोपन केले आहे. संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन केले आहे.

सुधारली शेतीमालाची गुणवत्ताः

डाळिंब बागेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizer) वापर केल्याने जमिनीची सुपीकता वाढली. झाडांची वाढ चांगली झाली. शेण-गोमूत्र स्लरी, जीवामृत, दशपर्णी अर्काच्या वापरामुळे झाडे काटक झाली. फळांची चकाकी, गुणवत्तादेखील सुधारली. बागेत शेणस्लरीचा आळवणीसाठी वापर केल्याने उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढून जमिनीची सच्छिद्रता वाढली. पांढऱ्या मुळांची संख्या आणि शेतातील गांडुळे वाढली आहेत.

जमिनीचा पोत सुधारून जमिनीतील वाफसा टिकून राहात आहे. याचबरोबरीने खर्चामध्ये ४० टक्यांपर्यंत बचत झाली. उन्हाळ कांद्याचे पीक लवकर काढणीस येते. आकार, रंग चांगला तयार होतो, चाळीत कांदा जास्त काळ टिकतो. दर्जेदार डाळिंब फळांना मागील दोन वर्षांत सरासरी ७० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. व्यापारी बागेत येऊन डाळिंब खरेदी करतात, असे मनिषाताई सांगतात.

Pomegranate
Kharip Sowing News: पुणे विभागात खरिपाच्या ६५ टक्के पेरण्या

सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादनः

मनिषाताई पूर्वी पिकांना जीवामृताचा मोठ्या प्रमाणात वापर करायच्या. मात्र हे द्रावण घट्ट असल्याने ठिबकमधून वापर करता येत नव्हता. गेल्यावर्षी त्यांना गुजरातमधील जैविक द्रावण उत्पादनासंबधी प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सुधारित बायोगॅस संयंत्राची उभारणी केली.

यापासून मिळणाऱ्या स्लरीचा वापर त्या पिकांसाठी करतात. जैविक द्रावण उत्पादन प्रकल्पासाठी त्यांनी ५ लाखांची गुंतवणूक केली. यासाठी मालेगाव पंचायत समितीकडून ‘उमेद’ अभियानांतर्गत १ लाख १० हजार रुपये भांडवल ‘कर्ज’ म्हणून मिळाले. या प्रकल्पाची दैनंदिन उत्पादनक्षमता २०० लिटर आहे.

Pomegranate
उत्तर प्रदेशात सरासरीच्या केवळ ४० ते ६० टक्के पाऊस

हे द्रावण ठिबकद्वारे डाळिंब (Pomegranate) बाग, भाजीपाला पिकाला दिले जाते. तसेच गरजेनुसार आळवणी केली जाते. याशिवाय मनिषाताई सेंद्रिय कीटकनाशकांची निर्मिती करतात. त्यासाठी विविध प्रकारच्या २१ प्रकारच्या वनस्पती पाल्यांचा वापर केला जातो. सध्या विविध सेंद्रिय निविष्ठांचा वापर स्वतःच्या शेतीसाठी त्या करतात. तसेच मागणीनुसार परिसरातील शेतकऱ्यांना पुरवठा केला जातो.

Pomegranate
GST On Food: केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचा पाच कोटी व्यवसायिकांना फटका

कुटुंबाची भक्कम साथ:

मनिषाताई दैनंदिन शेती व्यवस्थापनासोबत ‘उमेद’ अभियानात गाव पातळीवर तसेच जिल्ह्यामध्ये प्रशिक्षिका म्हणून काम करतात. यासाठी त्यांना पती सुभाष यांची चांगली साथ मिळाली आहे. सासरे बन्सी, सासूबाई सुशीला यांचेही शेती व्यवस्थापनात योग्य मार्गदर्शन मिळते. शेती नियोजन तसेच महिला बचत गटाच्या प्रगतीसाठी त्यांना कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव आणि ‘उमेद’ अभियानाचे चांगले सहकार्य आहे.

शेती व्यवस्थापनाची वैशिष्टेः

- बाजारपेठेची मागणी अभ्यासून पीक लागवड ते काढणी नियोजन.

- यांत्रिकीकरणावर भर; तणनियंत्रणासाठी आच्छादन, सेंद्रिय निविष्ठांचा जास्तीत जास्त वापर.

- एकात्मिक कीड,रोग नियंत्रणावर भर.

- फळे, भाजीपाल्याचे योग्य विक्री व्यवस्थापन, थेट ग्राहकांना पुरवठा.

- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी नेहमी आग्रही.

अभ्यासूवृत्तीमुळे शेतीमध्ये बदलः

मनिषाताई गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादन, बाजारपेठ व विक्री व्यवस्थापनाचा सातत्याने अभ्यास करतात. यू ट्युबवरील शेतीविषयक माहिती तसेच ॲग्रोवनमधील लेख,यशोगाथांचा अभ्यास करून प्रत्यक्ष शेतीत अवलंब करतात. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, अजंग वडेल (ता.मालेगाव) येथील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेती व्यवस्थापन सुधारणा करीत असतात. नाशिक येथे बँक ऑफ महाराष्ट्र संचलित ‘आरसीटी’ येथे मसाले उत्पादन तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीबाबत ऑनलाइन प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

महिला शेतकरी गटाची स्थापनाः

गावातील महिला शेतकऱ्यांना संघटित करून रसायन अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादन करण्याच्या हेतूने एप्रिल-२०२२ मध्ये मनिषाताईंनी श्री गणेश सेंद्रिय महिला शेतकरी गटाची स्थापना केली. गटातील पंधरा महिला सदस्यांनी विविध भाजीपाला पिकांची लागवड करून आत्तापर्यंत २०० कुटुंबांना भाजीपाला पोचवला आहे. सध्या गावामध्ये ८० परसबाग निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यांनी सदस्यांचा गटामार्फत जीवन विमा उतरविला आहे.

शासनाच्या विविध अनुदानित योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. गटातील सदस्यांना ‘पोकरा’, ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून ठिबक सिंचन, कांदा चाळ, कृषी यांत्रिकीकरण (Farm Mechanization) , फळबाग लागवड (Horticulture Planting) योजनांचा लाभ त्यांनी मिळवून आहे. महसूल विभागाच्या ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेंतर्गत १७ महिलांची ‘सह हिस्सेदार’ म्हणून नावे लावली आहेत. महिलांना प्रोत्साहित करून शेतीमध्ये विविध संधी निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

संपर्क: मनिषा इंगळे, ९६९९२६४०५६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com