पाऊस लांबल्याने तिफण गोठ्यातच

पावसाअभावी राज्यात केवळ एक टक्केच पेरणी
पाऊस लांबल्याने तिफण गोठ्यातच
Seed DrillAgrowon

सोलापूर : पावसाने यंदा ओढ दिल्याने धरणांनी तळ गाठला आहे. जमिनीत ओलावा नसल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीखालील क्षेत्र (Sowing Area) घटले आहे. राज्यात खरिपाचे क्षेत्र (Kharif Acreage) दीड कोटी हेक्टरपर्यंत आहे. १८ जूनपर्यंत मागील वर्षी साडेचार लाख हेक्टरवर पिकांची पेरणी (Crop Sowing) झाली होती. पण, यावर्षी आतापर्यंत एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्के) पेरणी झाली आहे. पावसाने (Rain0 दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तिफण (Seed Drill) गोठ्यातच ठेवली आहे.

राज्यात खरीप हंगामातील तृणधान्याखालील क्षेत्र ३६ लाख ३७ हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र ४१ लाख ५८ हजार हेक्टर, तर कापसाचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टरपर्यंत आहे. ७ जूनपासून राज्यात मॉन्सूनला सुरवात होते आणि त्यामुळे जूनअखेर दरवर्षी जवळपास ५४ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने १७ जूनपर्यंत केवळ एक टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी झाली आहे.

उजनी धरणासह राज्यातील बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षी १७ जूनपर्यंत सरासरी १२०.४ मिलिमीटर पाऊस पडला होता. पण, यंदा जून महिन्यात ९० मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. पाऊस पडल्याशिवाय बळीराजाची चिंता दूर होणार नाही, अशी स्थिती आहे.

जमिनीत किमान ७५ मिलिमीटर ओलावा असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पावसाची वाट पाहावी, तोवर जमिनीची मशागत करून घ्यावी.
बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.

जूनमधील कमी पावसाचे जिल्हे

नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पेरणी खोळंबली आहे.

पीकनिहाय तुलनात्मक पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक...एकूण क्षेत्र...गतवर्षीचे क्षेत्र...यंदाची पेरणी

भात...१४,९७,४४९...३५,१९६...११,८६४

तूर...१२,७५,९७१...२६,५७९...१४

कापूस...४१,८३,८०१२...६९,६४०...५३,२८४

ज्वारी...४,८२,४६१...८१६...०००

बाजरी...६,७१,५९५...७,०२२...०००

मका...८,३८,०६०...६,०९८...११३

उडीद...३,५८,९५३...६,०६५...०००

भुईमूग...१,९८,४३५...६,९९८...२०

सोयाबीन...३८,८४,६३३...४९,९८४...७०६

टक्केवारी...१००...३४...१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com